11 October, 2021

 



नवमतदारांनी पुढे येऊन मतदार नोंदणी करावी

जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे मतदार जनजागृती शिबिरात आवाहन

 

हिंगोली, (जिमाका) दि. 11 : प्रत्येक मताला अमूल्य अशी किमंत आहे. त्यामुळे नवमतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पुढे येऊन मतदार नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज आयोजित केलेल्या मतदार जनजागृती शिबिरात केले.

येथील एनटीसी परिसरात आई जगदंबा मातेच्या प्रांगणात आई जगदंबा नवरात्र महोत्सव समिती व मतदान नोंदणी अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या संयुक्त विद्यमाने नवमतदार जनजागृती व मतदार नोंदणी, दुरुस्ती शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. यावेळी तहसीलदार नवनाथ वगवाड , माजी जिल्हा परिषद सदस्य मालती कोरडे, नायब तहसीलदार अनिता वडवाळकर यांच्यासह समितीचे पदाधिकारी , निवडणूक विभागाचे कर्मचारी उपस्थित होते . 

याप्रसंगी बोलताना श्री. पापळकर पुढे म्हणाले, नवमतदारांनी 1 जानेवारी, 2022 पर्यंत ज्यांचे वय 18 वर्ष पूर्ण होत आहे अशा तरुणांनी, युवतींनी मतदान नोंदणी करावी, असे सांगून यासाठी निवडणूक विभागाने स्वतंत्र  व्हीएचए ॲप विकसित केला असून या ॲपचा उपयोग करुन नवमतदारांनी ऑनलाइन नाव नोंदणी करावी. तसेच या ॲपच्या माध्यमातून नावाची दुरुस्तीही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

आई जगदंबा नवरात्र महोत्सव  समितीच्या वतीने गणेश उत्सव असो की नवरात्र या काळात विविध सामाजिक उपक्रम आयोजित करतात. यामध्ये रक्तदान, आरोग्य जनजागृती विषयक उपक्रम, कोरोना योद्धा सन्मान सोहळा, कोरोना प्रतिबंधित लसीकरण, आदी व अन्य सामाजिक  उपक्रम राबविल्याबद्दल जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी समिती पदाधिकारी यांचे कौतुक केले.

या शिबिरात 22 नवमतदारानी नोंदणी केली आहे. तसेच 150 पेक्षा अधिक मतदारांनी मतदार यादीतील नावे दुरुस्तीसाठी अर्ज नोंदणी केली आहे.

या नवंमतदार नोंदणी व जनजागृती शिबिरात नोंदणी  केलेल्या अनिकेत मुसळे, सिमरप्रीत कौर जसबीरसिंग अलग, श्रुती बत्तलवाडीकर , प्रीतम धुत या मतदारांचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सन्मान चिन्ह देऊन सत्कार केला.

या शिबिरासाठी मतदान नोंदणी अधिकारी कार्यालयातील श्री. गोळेगावकर , श्री. कुबडे, श्री.बोरसे, फरजन , बीएलओ एन.टी.शेख आदींनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक कल्याण देशमुख यांनी केले तर तहसीलदार नवनाथ वगवाड यांनी आभार मानले. शिबिर यशस्वीतेसाठी नवरात्र महोत्सव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

****

No comments: