01 February, 2019

अटल महाआरोग्य शिबीराची ‍विविध माध्यमातून जनजागृती






अटल महाआरोग्य शिबीराची विविध माध्यमातून जनजागृती
·         महाआरोग्य शिबीराचा लाभ घेण्यासाठी नागरिकांना नोंदणी करुन पूर्व तपासणी करुन घेण्याचे आवाहन
हिंगोली,दि.1: येणाऱ्या 10 फेब्रुवारी रोजी हिंगोली येथील रेल्वे स्थानक जवळ अटल महाआरोग्य शिबिराचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरात विविध आजाराने त्रस्त रुग्णांवर नामांकित तज्ज्ञ डॉक्टारांकडून विनामुल्य उपचार करण्यात येणार आहेत. या महाआरोग्य शिबीराचा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना लाभ मिळावा याकरिता जिल्ह्यात विविध माध्यमातून जनजागृती करण्यात येत आहे. जिल्ह्यातील सर्व शाळेत इयत्ता 1 ली ते 5 वी विद्यार्थ्यांसाठी आपले आरोग्य तर इयत्ता 6 वी ते 8 वी करीता आरोग्य विषयक सवयी आणि इयत्ता 9 वी ते 12 वी करीता 21 व्या शतकातील निरोगी भारत या विषयावर निबंध व वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. सर्व शाळांमध्ये मुख्याध्यापक,शिक्षक आणि प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहचविण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. मेथा येथे आयोजित तीन दिवसीय जिल्हास्तरीय स्काऊट व गाईड मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून यात सहभागी स्काऊट व गाईड यांना या शिबीराची माहिती देण्यात आली आहे.
तसेच 31 जानेवारी रोजी हिंगोली आणि सेनगाव येथे  ग्रामसेवक आणि अंगणवाडी कार्यकर्ते यांची बैठक घेवून त्यांना शिबीराचे स्वरुप प्रत्येक अधिकारी कर्मचारी यांच्या जबाबदाऱ्या, कर्तव्य आणि करावयाची प्रचार प्रसार याबाबतची माहिती यावेळी देण्यात आली.
या आरोग्य शिबीरापूर्वी जिल्ह्यातील प्रत्येक गावात आणि शहराच्या प्रत्येक प्रभागात आरोग्य विषयक ज्या नागरिकांच्या समस्या आहेत अशा रुग्णांची 2 फेब्रूवारी पर्यंत माहिती संकलीत करण्यात येत आहे. सदर माहिती प्राप्त झाल्यानंतर 3 ते 9 फेब्रूवारी या कालावधीत अटल महाआरोग्य सप्ताह राबवून सर्व रुग्णांची जवळच्या आरोग्य केंद्रात पूर्व तपासणी करण्यात येणार आहे. तसेच 10 फेब्रूवारी रोजी हिंगोली येथील रेल्वे स्टेशन जवळ आयोजित महाआरोग्य शिबीरात या रुग्णांवर नामांकित डॉक्टरामार्फत विनामुल्य उपचार केले जाणार असून गरजू रुग्णांनी नोंदणी करावी.
तसेच महाआरोग्य शिबीराचा सर्व नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात येत आहे.

****

No comments: