19 June, 2026

महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षेसाठी कडक सुरक्षा व्यवस्था

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महाटीईटी) 2026 ही परीक्षा दिनांक 28 जून 2026 रोजी राज्यातील 37 जिल्ह्यांतील 1729 परीक्षा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार असून परीक्षा पारदर्शक, निकोप व गैरप्रकारमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून व्यापक सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे.

परीक्षेसाठी पेपर-1 साठी 701 आणि पेपर-2 साठी 1028 केंद्रांवर एकूण 18,717 सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येणार आहेत. सर्व उमेदवारांची हँड हेल्ड मेटल डिटेक्टरद्वारे तपासणी, बायोमेट्रिक पडताळणी आणि फेस रेकग्निशन करण्यात येणार आहे. मोबाईल, स्मार्ट वॉच, कॅल्क्युलेटरसह कोणतेही इलेक्ट्रॉनिक साहित्य परीक्षा केंद्रात नेण्यास सक्त मनाई आहे.

परीक्षा केंद्रांवरील सीसीटीव्ही यंत्रणा कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित असून राज्य व जिल्हास्तरीय नियंत्रण कक्षातून थेट निरीक्षण करण्यात येणार आहे. बोगस उमेदवार, डुप्लिकेट अर्ज, मॉर्फ केलेले फोटो तसेच इतर गैरप्रकार रोखण्यासाठी ‘फोटो व्ह्यू’ प्रणालीचा वापर करण्यात येणार आहे.

उमेदवारांनी आधारकार्ड, पॅनकार्ड, मतदान ओळखपत्र किंवा ड्रायव्हिंग लायसन्स यापैकी कोणतेही एक मूळ फोटो ओळखपत्र सोबत आणणे आवश्यक आहे. पेपर-1 साठी सकाळी 8.30 वाजेपर्यंत आणि पेपर-2 साठी दुपारी 12.30 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रवेशपत्रे 16 जून 2026 पासून उमेदवारांच्या लॉगिनमध्ये उपलब्ध करून देण्यात आली असून ती वेळेत डाउनलोड करून घ्यावीत. परीक्षेबाबत केवळ महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या अधिकृत संकेतस्थळावरील माहितीलाच ग्राह्य धरावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी केले आहे.

******

No comments: