• जिल्हा विकास आराखडा 2025-26 अंतर्गत हस्तक्षेपांच्या प्रगतीचा आढावा
हिंगोली (जिमाका), दि. 19: महास्ट्राईड प्रकल्प तसेच जिल्हा विकास आराखडा सन 2025-26 अंतर्गत विविध विभागांमार्फत पूर्ण करण्यात आलेल्या हस्तक्षेपांची उपयोगिता प्रमाणपत्रे, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे तात्काळ सादर करावीत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
महास्ट्राईड प्रकल्प तसेच जिल्हा विकास आराखडा सन 2025-26 अंतर्गत विविध विभागांच्या हस्तक्षेपांच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीस सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास बालाजी मरे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, जिल्हा रेशीम विकास अधिकारी, उपायुक्त पशुसंवर्धन, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी, जिल्हा दुग्धव्यवसाय अधिकारी, सहाय्यक आयुक्त मत्स्य विभाग, विभागीय वन अधिकारी, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंते, महावितरणचे अधीक्षक अभियंता, जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, शिक्षणाधिकारी (प्राथमिक व माध्यमिक) तसेच विविध विभागांचे प्रतिनिधी आणि यंत्रणा प्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी महास्ट्राईड प्रकल्प आणि जिल्हा विकास आराखड्यांतर्गत सुरू असलेल्या विविध हस्तक्षेपांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेतला. पूर्ण झालेल्या कामांची उपयोगिता प्रमाणपत्रे, काम पूर्णत्व प्रमाणपत्रे आणि जीपीएस लोकेशनसह छायाचित्रे सादर केल्यास कामांची गुणवत्ता, पारदर्शकता आणि प्रत्यक्ष परिणामकारकतेचे मूल्यमापन अधिक प्रभावीपणे करता येईल, असे त्यांनी सांगितले.
तसेच विविध विभागांनी आपल्या अखत्यारितील हस्तक्षेपांची अद्ययावत माहिती तातडीने उपलब्ध करून द्यावी, जेणेकरून प्रकल्पांच्या अंमलबजावणीवर प्रभावी देखरेख ठेवता येईल आणि विकासकामांना गती देता येईल, असेही त्यांनी नमूद केले.
या बैठकीत सन 2026-27 या आर्थिक वर्षात राबविण्यात येणाऱ्या विकासकामांच्या नियोजनावरही चर्चा करण्यात आली. आगामी वर्षासाठी आवश्यक असलेले प्रस्ताव संबंधित विभागांनी वेळेत सादर करावेत, जेणेकरून विकास आराखड्याची प्रभावी आखणी करता येईल, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिल्या.
जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विविध विभागांनी समन्वयाने कार्य करणे आवश्यक असून, मंजूर कामांची अंमलबजावणी वेळेत आणि गुणवत्तापूर्ण पद्धतीने पूर्ण करण्यावर भर द्यावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.
या बैठकीत विविध विभागांच्या प्रगतीचा आढावा घेऊन आवश्यक सूचना देण्यात आल्या. विकासकामांची उद्दिष्टे वेळेत पूर्ण करण्यासाठी सर्व विभागांनी सक्रिय सहभाग नोंदवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
******
No comments:
Post a Comment