18 October, 2019

मतदानासाठी अकरा कागदपत्रे ग्राह्य छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यावरही मतदान करता येणार


मतदानासाठी अकरा कागदपत्रे ग्राह्य
छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यावरही मतदान करता येणार

            हिंगोली, दि. 17 :  छायाचित्र असलेले मतदान ओळखपत्र नसल्यासही मतदार मतदान करु शकतात. त्यासाठी विविध अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात यावीत, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाने दिल्या आहेत. मात्र त्यासाठी मतदार यादीत नाव असणे गरजेचे आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी  स्पष्ट केले आहे.
भारत निवडणक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांमध्ये पारपत्र (पासपोर्ट), वाहनाचालक परवाना,     केंद्र/राज्य शासन/सार्वजनिक उपक्रम/सार्वजनिक मर्यादित कंपनी यांचे छायाचित्र असलेले ओळखपत्र, बँक/पोस्टाद्वारा वितरित छायाचित्र असलेले पासबुक, पॅनकार्ड, रजिस्टर जनरल ऑफ इंडिया यांचेद्वारा नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, मनरेगा अंतर्गत निर्गमित जॉबकार्ड, भारत सरकारच्या श्रम मंत्रालयाच्या योजने अंतर्गत देण्यात आलेले हेल्थ इन्शुरन्स स्मार्ट कार्ड, छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन कागदपत्र आणि खासदार व आमदार यांचे अधिकृत ओळखपत्र आणि आधार कार्ड मतदारांना ओळख पटविण्यासाठी ग्राह्य केली आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
            मतदाराचे नाव ज्या ठिकाणी मतदान करीत आहे त्या मतदार यादीत आहे, परंतु त्याच्याकडे अन्य विधानसभा मतदार संघाच्या मतदार नोंदणी अधिकाऱ्यांने वितरित केलेले छायाचित्रासह मतदार ओळखपत्र असल्यास ते स्वीकारले जाईल. मतदार ओळखपत्रावरील विसंगत छायाचित्रामुळे मतदाराची ओळख पटविणे शक्य नसल्यास अशा मतदारास भारत निवडणूक आयोगाने ग्राह्य केलेल्या 11 कागदपत्रांपैकी एक ओळखीचा पुरावा म्हणून सादर करणे आवश्यक आहे, असेही  श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले.

‘ओळखीचा पुरावा म्हणून
मतदार चिठ्ठी ग्राह्य नाही’

मतदारांना छायाचित्र असलेले ओळखपत्र वितरीत करण्यात आले आहे. मतदारांकडे आधारकार्डही  असून अन्य अकरा प्रकारची कागदपत्रे ओळखीचा पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात आली आहेत. त्यामुळे मतदारांना छायाचित्रासह असलेली मतदार चिठ्ठी  ओळख पटविण्यासाठी मतदान केंद्रावर ग्राह्य मानली जाणार नाही, असा निर्णय भारत निवडणूक आयोगाने घेतला आहे. त्यामुळे ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह  मतदार ओळखपत्र किंवा भारत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या 11 अतिरिक्त ओळख कागदपत्रापैकी एक कागदपत्र सोबत आणावे.
      प्रवासी भारतीय मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी त्यांचा केवळ मूळ पासपोर्ट आवश्यक राहील, असेही श्री.  जयवंशी यांनी  स्पष्ट केले आहे.

*****

आपला नारा....मतदान करा... मतदान जनजागृतीसाठीच्या सायकल रॅलीला हिंगोलीत प्रतिसाद


आपला नारा....मतदान करा...


मतदान जनजागृतीसाठीच्या सायकल रॅलीला हिंगोलीत प्रतिसाद

        हिंगोली, दि. 17 : आपला नारा....मतदान करा.....अशा घोषणांसह  मतदारांत  जागृती करण्यासाठी  आयोजित सायकल रॅलीला आज हिंगोलीत चांगला प्रतिसाद मिळाला.
            रॅलीची सुरुवात सकाळी साडेसहा वाजता जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयापासून झाली. पोलीस अधीक्षक योगेशकुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदीश मिणियार, मुख्याधिकारी शैलेश फडसे यांनी हिरवा झेंडा दाखवून रॅलीला सुरुवात केली.
            सायकल रॅली जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय ते  पाण्याची टाकी- जिल्हा न्यायालय-माधव हॉस्पीटल-शिवाजी चौक-पोस्ट ऑफिस-जवाहर रोड-गांधी चौक-कापड गल्ली-दत्त मंदिर-मंगळवारा-पोळा मारुती-हरण चौक-इंदिरा गांधी चौक या मार्गे जाऊन शिवाजी महाराज पुतळा या ठिकाणी आली. यादरम्यान रॅलीत सहभागी झालेल्या सायकल स्वारांनी नागरिकांशी संवाद साधून मतदानाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी मतदान करा....राष्ट्रीय कर्तव्य पार पाडा..., आपला नारा...मतदान करा....अशी घोषवाक्ये देण्यात आली.
रॅलीचा समारोप जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ  झाला.   मतदारांनी येत्या 21 तारखेला मतदानासाठी घराबाहेर पडून राष्ट्रीय कार्यात सहभाग नोंदवावा असे आवाहन श्री. जयवंशी यांनी केले. याप्रसंगी जिल्हा शिक्षण अधिकारी संदीप सोनटक्के, मुख्याधिकारी शैलेश फडसे, योगविद्या प्रतिष्ठानचे सुभाष तापडिया, मनमोहन सोनी, रत्नाकर महाजन, दिनशे होकर्णे, ज्ञानेश्वर मुरुळे, रामेश्वर झंवर, हनुमान केडीया, अजय गौड, राधेशाम कुमावत किशोर दोडल आदी सहभागी झाले.
नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी उमेश हेबांडे, देविसिंह ठाकूर, बाळू बांगर, रघुनाथ बांगर, माधव घुगे, संदीप घुगे, उत्तम टेमकर, कैलास थिट्टे, सुनील चव्हाण, गजानन बांगर, विनय साहू यांनी नियोजन केले.

15 October, 2019

आयोगांच्या सूचनांचे काटेकोर पालन करा - जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या सूक्ष्म निरीक्षकांना सूचना


आयोगांच्या सूचनांचे
काटेकोर पालन करा



जिल्हाधिकारी जयवंशी यांच्या सूक्ष्म निरीक्षकांना सूचना

          हिंगोली, दि. 15 : भारत निवडणूक आयोगाच्या सूचनांचा अभ्यास करा. त्यानुसार कामकाज करा. कामकाज करताना सूक्ष्म निरीक्षकांनी काटेकोर पालन करा, अशा सूचना जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिलहधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे दिल्या.
            जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघातील नियुक्त करायच्या सूक्ष्म निरीक्षकांचे आज प्रशिक्षण झाले. त्यावेळी श्री. जयवंशी यांनी या सूचना दिल्या. यावेळी भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षक डॉ. रेणू राज, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर आदी उपस्थित होते.
            सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान सुरू होण्यापूर्वी मॉक पोल काळजीपूर्वक पार पाडायचे आहे. मॉक पोल झाल्यानंतर प्रत्यक्ष मतदानाच्या सुरवात होण्यापूर्वी मॉकपोल न चुकता डिलीट करावा. व्हिव्हिपॅट आणि ईव्हीएम यांची जोडणी करताना काळजी घ्यावी, अशा सूचना श्री. जयवंशी यांनी दिल्या.
            सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवण्याबरोबरच विविध प्रकारचे फॉर्म अचूकपणे भरावेत. या फॉर्ममध्ये माहिती भरताना आयोगाच्या सूचना काळजीपूर्वक वाचाव्यात. शंका असल्यास शंकाचे निरसन करुन घ्यावे,  असे श्री. जयवंशी यांनी सांगितले.
            श्री. नंदकर यांनी सूक्ष्म निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांनी टपाल मतदानासाठी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांना आजच मागणी कळवावी, असे सांगितले.
            मतदान आणि मतमोजणीच्या दुसऱ्या दिवशी सुट्टी मिळावी, अशी काही बॅक अधिकारी-कर्मचारी यांनी मागणी केली. त्यावर निवडणूक कामकाजावर असणाऱ्या अधिकारी-कर्मचारी यांना दुसऱ्या दिवशी बँक अथवा त्यांच्या कार्यालयात गैरहजर राहण्यासाठी परवानगी देण्याबाबत कळविण्यात येईल, असे जिल्हाधिकारी जयवंशी यांनी सांगितले. त्याचबरोबर सूक्ष्म निरीक्षकांचे मानधन रोखीने तात्काळ दिले जाईल, असेही श्री. जयवंशी यांनी स्पष्ट केले.
*****

वाचनामुळे व्यक्तिमत्व समृध्द : जिल्हाधिकारी


वाचनामुळे व्यक्तिमत्व
समृध्द : जिल्हाधिकारी

          हिंगोली, दि. 15 : दररोज किमान दहा मिनिटे वाचन करा. वाचनामुळे मानवाचे व्यक्तिमत्व समृध्द होते, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे केले.
            माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंती दिनानिमित्त आज वाचन प्रेरणा दिन आयोजित केला गेला. जिल्हा प्रशासनातर्फे डॉ. कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
            यावेळी अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
*****

वाहनांची तपासणी बारकाईने करा खर्च निरीक्षक जुंगीओ यांच्या सूचना





वाहनांची तपासणी
 बारकाईने करा
खर्च निरीक्षक जुंगीओ यांच्या सूचना

          हिंगोली, दि. 14 : मतदानाची तारीख अवघ्या सात दिवसांवर आल्यामुळे वाहनांची तपासणी अधिक बारकाईने करा. संशयास्पद वाहतुकीवर नजर ठेवून तपासणी करा, अशा सूचना भारत निवडणूक आयोगाचे खर्च निरीक्षक नानगोथुंग जुंगीओ यांनी आज येथे दिल्या.
            खर्च निरीक्षक जुंगीओ यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात खर्च विषयक समन्वय अधिकारी यांची आढावा बैठक घेतली. त्यावेळीस त्यांनी या सूचना दिल्या. यावेळी खर्च विषयक समितीचे जिल्हा समन्वय अधिकारी डॉ. देविदास हिवाळे, संपर्क अधिकारी गणेश वाघ, वसमत, कळमनुरी आणि हिंगोली मतदार संघातील खर्च समन्वय अधिकारी आणि भरारी पथकाचे अधिकारी उपस्थित होते.
            खर्च निरीक्षक नानगोथुंग जुंगीओ यांनी सांगितले की, मतदानाची तारीख जसजशी जवळ येईल तसे बेकायदेशीर वाहतूक होण्याची शक्यता आहे. या वाहतूकीव्दारे मतदारांना प्रलोभन देण्यासाठी पैसे अथवा वस्तूंची वाहतूक होऊ शकते. त्यामुळे आता संशयास्पद वाहतूकीवर बारकाईने लक्ष ठेवा. त्याचबरोबर वाहनांच्या तपासणीवेळी नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्या.
            फ्लाईंग स्क्वॉड, स्टॅटिक सर्व्हेलन्स टीम यांना आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा पुरविण्यात याव्यात, अशा सूचना श्री. जुंगीओ यांनी समन्वय अधिकारी श्री. हिवाळे यांना केल्या.
*****

07 October, 2019

समन्वयाने अचूक काम करा जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना









समन्वयाने अचूक काम करा
जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या नोडल अधिकाऱ्यांना सूचना

      हिंगोली, दि.7: जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघातील निवडणूक प्रक्रिया निर्भय, मुक्त आणि शांततामय वातावरणात पार पाडण्यासाठी  सर्व नोडल अधिकारी आणि पथके यांनी समन्वयाने अचूक काम करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी रुचेश जयवंशी यांनी आज येथे दिल्या.
        जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज नोडल अधिकारी यांची आढावा बैठक झाली. या बैठकीत जिल्हाधिकारी जयवंशी यांनी वरील सूचना दिल्या. बैठकीस निवडणूक निरीक्षक डॉ. रेणू राज, कायदा व सुव्यवस्था निरीक्षक दिपक कुमार, पोलीस अधीक्षक योगेश कुमार, अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राजू नंदकर आदी उपस्थित होते.
       जिल्हाधिकारी रूचेश जयवंशी यांनी निवडणूक  निरीक्षक डॉ. रेणू राज आणि श्री. दीपक कुमार यांना जिल्हा प्रशासनाने स्थापन केलेली विविध पथके आणि त्यांच्या कामकाजाच्या पध्दतीबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले, निवडणुकीसाठी आवश्यक असणाऱ्या पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या आहेत. तीनही मतदारसंघात अधिकारी-कर्मचारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे.अधिकारी आणि कर्मचारी यांची प्रशिक्षण सुरु आहेत. जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेबाबत पोलीस प्रशासनाकडून खबरदारीचे उपाय घेण्यात आले आहेत.
        जिल्ह्यातील तीन मतदारसंघातील मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी स्वीप अंतर्गत विविध उपक्रम राबवले जात आहेत. नवरात्र उत्सव, दसरा महोत्सव येथे मतदार जनजागृतीचे कक्ष सुरु करण्यात आले आहेत. लोकसभा निवडणुकीत कमी मतदान झालेल्या बूथवर जाणीव जागृती केली जावी, यासाठी कला पथकांच्या माध्यमातून मतदार जागृती केली जात आहे, अशी माहिती त्यांनी बैठकीत दिली.
        निवडणूक निरीक्षक डॉ. रेणू राज यांनी ईव्हीएम मशीन, व्हीव्हीपॅट ची तयार आयोगाच्या निर्देशानुसार करावी. मतदारांना व्होटर स्लिप  वितरीत करण्यात याव्यात, अशा सूचना दिल्या.
         प्रारंभी सर्व नोडल अधिकारी यांनी निवडणूक निरीक्षकांना परिचय देऊन निवडणूक कालावधीत देण्यात आलेल्या जबाबदारीची थोडक्यात माहिती दिली. बैठकीत उपजिल्हाधिकारी गोविंद रणविरकर, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, स्वीपचे नोडल अधिकारी गणेश शिंदे, सहायक आयुक्त भाऊसाहेब चव्हाण, कोषागार अधिकारी पी.व्ही. पुंडगे, स्थानिक निधी लेखा परीक्षा विभागाचे सहायक संचालक महेश देशमुख, उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक एम.पी. राऊत आदी उपस्थित होते.
       



06 October, 2019

मतदार जागृती कक्षाचे दसरा महोत्सवात उद्घाटन


मतदार जागृती कक्षाचे



दसरा महोत्सवात उद्घाटन

हिंगोली, दि.5 : येथील रामलीला मैदानावरील दसरा महोत्सवात मतदार जनजागृती कक्षाचे उदघाटन करण्यात आले.
 जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्या हस्ते उदघाटन झाले. अतिरिक्त जिल्हाधिकारी जगदीश मिनीयार, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, मुख्याधिकारी शैलेश फडसे, शिक्षणाधिकारी  संदीपकुमार सोनटक्के,  स्वीपचे नोडल अधिकारी  गणेश शिंदे, समाज कल्याण आयुक्त भाऊराव चव्हाण आदी यावेळी उपस्थित होते.
 या कक्षातून प्लास्टिक मुक्ती स्वच्छता जाणीव जागृती तसेच मतदार जाणीव जागृती याबाबत संदेश देण्यात येतो.  याठिकाणी सेल्फी पॉईंट तयार करण्यात आलेले असून मी मतदान करणारच आपणही करावे, असे आवाहन करणारा फलक आहे. स्वाक्षरी मोहीमसाठीही ही सोय करण्यात आलेली आहे.  नगरपरिषद हिंगोली व जिल्हास्तरीय स्वीप समिती यांच्या संयुक्त विद्यमाने हा कक्ष दसरा संपेपर्यंत कार्यान्वित असणार आहे, असे श्री. गणेश शिंदे यांनी सांगितले.