09 September, 2019

बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक


बाल न्याय अधिनियम 2015 अंतर्गत स्वयंसेवी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र बंधनकारक

हिंगोली, दि.9: बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 अंतर्गत कलम 41(1) अंतर्गत विधी संघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकांसाठी कार्यरत व इच्छूक असणाऱ्या राज्यातील सर्व स्वयंसेवी व शासकीय संस्थांना नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्राच्या अनुषंगाने राज्यातील स्वयंसेवी संस्थांना ऑनलाईन अर्ज करण्याकरिता मुदतवाढ देण्यात आली होती. ज्या स्वयंसेवी संस्थेनी दिलेल्या मुदतवाढीच्या कालावधीमध्ये  ऑनलाईन क्र. 714 ते 993 असे एकूण 280 संस्थेची अर्ज सादर केले होते. सदर प्रस्तावाची छाननी करण्यात आली असून प्रस्तावामध्ये आढळून आलेल्या त्रुटीची पुर्तता करुन घेणेबाबत व संस्थेस प्रत्यक्ष भेट देऊन तपासणी अहवाल दिनांक 18 सप्टेंबर, 2019 पूर्वी महिला व बालविकास आयुक्तालय, महाराष्ट्र राज्य 28 राणीचा बाग, पुणे-1 येथे सादर करण्याबाबत कळविले आहे.
****



जनावरांच्या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिकरणचे प्रमाणपत्र आवश्यक


जनावरांच्या वाहतुकीसाठी सक्षम प्राधिकरणचे प्रमाणपत्र आवश्यक


हिंगोली, दि.9: जनावरांची वाहतुक करण्यापूर्वी आपल्या वाहनांमध्ये केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 च्या नियम 125 ई च्या तरतुदीनुसार वाहनांच्या बांधणीमध्ये सुयोग्य बदल करुन आपल्या वाहनाच्या नोंदणी प्राधिकरणाकडे अर्ज करुन विशेष परवाना प्राप्त करुन घ्यावे.
The prevention of cruelty to Animals (Transport of Animals on Foot) Rules 2001 च्या नियम 96 च्या तरतुदीनुसार वाहनातून जनावरांची वाहतुक करताना वाहतुकदाराने सक्षम प्राधिकरण तथा Animal Welfare Board of India यांनी तसेच केंद्र शासनाने प्राधिकृत केलेल्या अधिकारी, व्यक्ती किंवा प्राणी कल्याण संस्था यांनी जारी केलेले प्रमाणपत्र सोबत बाळगावे. हे प्रमाणपत्र जारी केले नसल्यास जनावरांची वाहतुक करण्यास वाहतुकदाराने नकार देणे अपेक्षित आहे.
            तसेच The Prevention of cruelty to Animals (Transport of Animals on Foot) Rules 2001 या कायदा व नियमांच्या तरतुदींचे काटेकोरपणे पालन केल्याखेरीज जनावरांची वाहतुक करण्यात येऊ नये, उक्त तरतुदींचे पालन न केल्यास संबंधित कायदे नियमातील तरतुदीनुसार संबंधितांविरुध्द कायदेशीर करवाई करण्यात येईल, असे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे.
****


07 September, 2019




जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांना अभिवादन
           
        हिंगोली,दि.07: जिल्हाधिकारी कार्यालयात उमाजी नाईक यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस अप्पर जिल्हाधिकरी जगदिश मिनियार यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) गोवींद रणवीरकर, महिला व बाल विकास अधिकारी व्ही. जी. शिंदे, नायब तहसिलदार रघुनाथ मिटकरी, नायब तहसिलदार राज गळगे यांच्यासह मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीतील विविध  कार्यालय प्रमुख व कर्मचारी यांनी ही उमाजी नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.
000000


31 August, 2019






महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'माविम' देणार बाजारपेठ
-‘माविम’ अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे
हिंगोली, दि.31: महिला बचत गट आता परंपरागत उत्पादनाच्या चाकोरीतून बाहेर पडून विविध उत्पादनांची निर्मिती करत आहेत. महिला बचतगटांनी दर्जेदार उत्पादने दिली तर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळ घेणार असल्याचे प्रतिपादन 'माविम' च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी केले.
येथील रामलिला मैदानावर महिला व बालविकास आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी आयोजित ‘नारी सन्मान सोहळा’ कार्यक्रमात ज्योतीताई ठाकरे बोलत होत्या. यावेळी  जिप अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार सर्वश्री रामराव वडकुते, तान्हाजी मुटकुळे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रेणुका जाधव, जिप सदस्या श्रीमती मंगलाताई कांबळे, श्रीमती रुपालीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, श्रीमती राजश्री पाटील,  माविमचे हिंगोली जिल्हा समन्वयक विलास जगताप यांच्यासह नांदेडचे जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड, लातूरचे जिल्हा समन्वयक मन्सुर पटेल, सेवासदनच्या श्रीमती मिरा कदम,  यांच्यासह मोठ्या संख्येने बचत गटांच्या महिलांची उपस्थिती होती.
यावेळी ज्योतीताई ठाकरे म्हणाल्या की, बचतगटांच्या महिलांनी मागील काही वर्षांत प्रगती साधली असून स्वत: बरोबरच कुटुंब आणि समाजाच्या विकासातही त्यांचा हातभार लागत आहे. महिलांना माविम बरोबरच घरातील मंडळीकडूनही पाठबळ मिळत असून प्रेम, वात्सल्य व ममता माविमच्या वातावरणात महिलांना जानवत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
महिला या उसनवार घेतलेला प्रत्येक पैसा विश्वासाने, काटकसरीने परत करत असतात त्यानुसार माविमच्या बचत गटांची बँकाकडून सुमारे 2 हजार 700 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे व त्या कर्जाची 100 टक्के परतफेड केली असून बँकांनी माविमच्या बचत गटांना सढळ हाताने कर्ज देण्याचे आवाहन माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे यांनी यावेळी केले.
          गाव,  वस्त्या, तांड्यातील महिलांनी आपले कौशल्य दडपून न ठेवता त्याला व्यासपीठ, बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावा. महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे 200 महिला बचत गटांना ॲमेझॉनवरील ऑनलाईन विक्रीमध्येही व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले.  तसेच माविमच्या विविध बचत गटांच्या माध्यमातून पुरग्रस्त नागरिकांसाठी प्रयेकी बचत गट एक रुपये प्रमाणे सुमारे 14 लाख 21 हजार 288 रुपये मदत दिल्याचे यावेळी श्रीमती ठाकरे यांनी सांगितले.
            राज्यातील प्रत्येक महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी व महिलांना योग्य तो सन्मान मिळावा हेच माविमचे उद्दिष्ठ आहे. माविम ही महिलांसाठी कार्य करणारी शिखर संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटातील महिलांनी आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच आपली संस्कृती व जबाबदारी जपावी ही इच्छाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार रामराव वडकुते, तान्हाजी मुटकुळे यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली. यावेळी कार्यक्रमास हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, लातूर या जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सहभाग नोंदवून आपले स्टॉल लावले होते.
यावेळी ज्योतीताई ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते हिरकणी महाराष्ट्राची या पुरस्कारांसाठी निवड झालेल्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी ज्योतीताई ठाकरे यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलची पाहणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे विभागीय साधन व्यक्ती केशव पवार,यांनी केले तर माविमचे जिल्हा समन्वयक विलास जगताप यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
* 'माविम' च्या नुतन इमारतीचे ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन : प्रारंभी लिंबाळा येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन 'माविम' च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच  यावेळी  पात्र लाभार्थ्यांना सुमारे 3 कोटी 47 लाख रुपयांचे कृषि व्यवसायावर आधारीत यांत्रिकीकरणांचे अवजारे वितरण ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार, माविमचे जिल्हा समन्वयक विलास जगताप, माविमच्या जिल्ह्यातील विविध बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  
****




शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी समान निधी योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन


शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयानी समान निधी योजनेसाठी
अर्ज सादर करण्याचे आवाहन
    
       हिंगोली, दि.31 :  ग्रंथालय संचालनालय मुंबई यांच्या मार्फत राज्यातील सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांसाठी भारत सरकारच्या सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठाण, कोलकाता त महाराष्ट्र राज्य मुंबई यांच्या संयुक्त विद्यमानाने समान निधी योजनेतंर्गत इमारत बांधकाम , व ईमारत विस्तार व नुतनीकरण या योजनेसाठी तब्बल 10 लाख रुपयाचा निधी दिला आहे.
राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना  ग्रंथालय संचालनालया मार्फत दरवर्षी अर्थसहाय्य देण्यात येते. त्या संदर्भातील नियम ,अटी व अर्जाचा नमुना  www.rrrlf.nic.in  या प्रतिष्ठाणच्या संकेत स्थळावर उपलब्ध आहे. तरी इच्छुकांनी तो या संकेतस्थळावरुन उपलब्ध किंवा Download करुन घ्यावा. समान निधी योजना (Maching Schemes) 2018-19 साठी , राज्य शासनाच्या 50%  प्रतिष्ठाणच्या 50% अर्थसहाय्य सार्वजनिक ग्रंथालयांना इमारत बांधकाम / विस्तार व नुतनीकरण अर्थसहाय्य कमाल मर्यादा 10 लाख रूपये मर्यांदित निधीची उपलब्धता होऊ शकते. या योजनांसाठी करावयाचा अर्जासाठी राजा राममोहन रॉय ग्रंथालय प्रतिष्ठानच्या योजनांबाबत इच्छुकांनी संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच अधिक माहितीसाठी प्रतिष्ठानचे www.rrrlf.nic.in संकेतस्थळ पहावे. ग्रंथालयांनी समान निधी योजनेतंर्गत इमारत बांधकाम, विस्तार व नुतणीकरणासाठीचा प्रस्ताव विहित नमुन्यात पध्दतीत आवश्यक त्या सर्व कागतपत्रासह इंग्रजी,हिंदी भाषेत चार प्रतीत संबंधित जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास दि.16 सप्टेंबर 2019 पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवावेत. असे अवाहन सुभाष हि.राठोड, प्र.ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, नगर भवन, मुंबई व जिल्हा ग्रंथालय अधिकारी मि.गो.सोनकांबळे हिंगोली यांनी सर्व शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना केले आहे.
000000
    


खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणीकरीता मुदतवाढ



खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणीकरीता मुदतवाढ

            हिंगोली,दि.31:  खाजगी संवर्गातील ऑटोरिक्षा परवान्यावर नोंदणी करण्यासाठी दि 19 ऑगस्ट, 2019 रोजीच्या शासन निर्णयानुसार दि. 31 डिसेंबर 2019 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. या शासन निर्णयामधील अटी व शर्तीनुसार खाजगी नोंदणी झालेल्या ऑटोरिक्षा ह्या फक्त महानगरपालिका क्षेत्र वगळून इतर क्षेत्रात परवान्यांवर नोंदणी करता येतील. अधिक माहितीसाठी उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे कक्ष क्र. 14 (परवाना विभाग) या ठिकाणी संपर्क साधावा .
            जिल्ह्यातील ऑटोरिक्षा चालकांनी याची नोंद घेऊन उप प्रादेशिक परिवहन कार्यालय, हिंगोली येथे अर्ज करुन परवाने घेण्यात यावेत असे आवाहन उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
****



29 August, 2019

31 ऑगस्ट 2019 रोजी महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ



31 ऑगस्ट 2019 रोजी महिला व आर्थिक विकास महामंडळाच्या
नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ
           
            हिंगोली,दि.29: येथील महिला व आर्थिक विकास महामंडळ यांच्या लिंबाळा मक्ता येथे बांधण्यात आलेल्या नुतन इमारतीचा उद्घाटन समारंभ दिनांक 31 ऑगस्ट 2019 रोजी सकाळी 10 ते 10.30 वाजता पार पडणार आहे.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा श्रीमती ज्योतीताई ठाकरे तर अध्यक्ष श्रीमती शिवराणीताई नरवाडे, अध्यक्षा जिल्हा परिषद, हिंगोली  तर हिंगोली लोकसभा मतदार संघाचे खासदार हेमंत पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार सर्वश्री रामराव वडकुते,विप्लव बाजोरीया, विक्रम काळे, सतीष चव्हाण, जयप्रकाश मुंदडा, तानाजी मुटकुळे, संतोष टारफे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी,  मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार, उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक महिला आर्थिक विकास महामंडळ श्रीमती श्रध्दा जोशी उपस्थित राहणार आहेत.
तसेच या कार्यक्रमामध्ये सकाळी 10.30 ते 11.30  वाजे दरम्यान मानव विकास मिशन कार्यक्रम सन 2018-19 अंतर्गत गाव समिती मधील महिलांना कृषी औजार बँकेचे वाटप व मान्यवरांचे मार्गदर्शन, दुपारी 1 ते 3.00 वाजे दरम्यान नारी सन्मान सोहळा – उत्कृष्ट उद्योजक महिला व बचत गटांचा सत्कार, बंजारा महिला बचत गटांचा सांस्कृतिक कार्यक्रम (स्थळ : रामलीला मैदान, हिंगोली) या महिला मेळाव्याकरिता बचत गटातील 8 हजार महिला उपस्थित राहणार आहेत. तसेच महिलांनी उत्पादीत केलेल्या वस्तुंचे निवडक स्टॉल लावण्यात येणार आहेत.
00000