31 August, 2019






महिला बचत गटांच्या उत्पादनांना 'माविम' देणार बाजारपेठ
-‘माविम’ अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे
हिंगोली, दि.31: महिला बचत गट आता परंपरागत उत्पादनाच्या चाकोरीतून बाहेर पडून विविध उत्पादनांची निर्मिती करत आहेत. महिला बचतगटांनी दर्जेदार उत्पादने दिली तर त्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्याची जबाबदारी महिला आर्थिक विकास महामंडळ घेणार असल्याचे प्रतिपादन 'माविम' च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांनी केले.
येथील रामलिला मैदानावर महिला व बालविकास आणि महिला आर्थिक विकास महामंडळ यांनी आयोजित ‘नारी सन्मान सोहळा’ कार्यक्रमात ज्योतीताई ठाकरे बोलत होत्या. यावेळी  जिप अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार सर्वश्री रामराव वडकुते, तान्हाजी मुटकुळे, महिला व बालकल्याण सभापती श्रीमती रेणुका जाधव, जिप सदस्या श्रीमती मंगलाताई कांबळे, श्रीमती रुपालीताई पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी.तुम्मोड, श्रीमती राजश्री पाटील,  माविमचे हिंगोली जिल्हा समन्वयक विलास जगताप यांच्यासह नांदेडचे जिल्हा समन्वयक चंदनसिंह राठोड, लातूरचे जिल्हा समन्वयक मन्सुर पटेल, सेवासदनच्या श्रीमती मिरा कदम,  यांच्यासह मोठ्या संख्येने बचत गटांच्या महिलांची उपस्थिती होती.
यावेळी ज्योतीताई ठाकरे म्हणाल्या की, बचतगटांच्या महिलांनी मागील काही वर्षांत प्रगती साधली असून स्वत: बरोबरच कुटुंब आणि समाजाच्या विकासातही त्यांचा हातभार लागत आहे. महिलांना माविम बरोबरच घरातील मंडळीकडूनही पाठबळ मिळत असून प्रेम, वात्सल्य व ममता माविमच्या वातावरणात महिलांना जानवत असल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.
महिला या उसनवार घेतलेला प्रत्येक पैसा विश्वासाने, काटकसरीने परत करत असतात त्यानुसार माविमच्या बचत गटांची बँकाकडून सुमारे 2 हजार 700 कोटी रुपयांचे कर्ज घेतलेले आहे व त्या कर्जाची 100 टक्के परतफेड केली असून बँकांनी माविमच्या बचत गटांना सढळ हाताने कर्ज देण्याचे आवाहन माविमच्या अध्यक्षा श्रीमती ठाकरे यांनी यावेळी केले.
          गाव,  वस्त्या, तांड्यातील महिलांनी आपले कौशल्य दडपून न ठेवता त्याला व्यासपीठ, बाजारपेठ उपलब्ध करुन द्यावा. महिला बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करुन देण्यासाठी सुमारे 200 महिला बचत गटांना ॲमेझॉनवरील ऑनलाईन विक्रीमध्येही व्यासपीठ उपलब्ध करुन देण्यात आले.  तसेच माविमच्या विविध बचत गटांच्या माध्यमातून पुरग्रस्त नागरिकांसाठी प्रयेकी बचत गट एक रुपये प्रमाणे सुमारे 14 लाख 21 हजार 288 रुपये मदत दिल्याचे यावेळी श्रीमती ठाकरे यांनी सांगितले.
            राज्यातील प्रत्येक महिलांची आर्थिक स्थिती सुधारावी व महिलांना योग्य तो सन्मान मिळावा हेच माविमचे उद्दिष्ठ आहे. माविम ही महिलांसाठी कार्य करणारी शिखर संस्था असल्याचे त्यांनी सांगितले. बचत गटातील महिलांनी आर्थिक स्थिती सुधारण्याबरोबरच आपली संस्कृती व जबाबदारी जपावी ही इच्छाही यावेळी त्यांनी व्यक्त केली. यावेळी आमदार रामराव वडकुते, तान्हाजी मुटकुळे यांनीही मार्गदर्शनपर भाषणे केली. यावेळी कार्यक्रमास हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, लातूर या जिल्ह्यातील महिला बचत गटांनी सहभाग नोंदवून आपले स्टॉल लावले होते.
यावेळी ज्योतीताई ठाकरे व मान्यवरांच्या हस्ते हिरकणी महाराष्ट्राची या पुरस्कारांसाठी निवड झालेल्या बचत गटांचा सत्कार करण्यात आला. प्रारंभी ज्योतीताई ठाकरे यांनी महिला बचत गटांच्या स्टॉलची पाहणी केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक माविमचे विभागीय साधन व्यक्ती केशव पवार,यांनी केले तर माविमचे जिल्हा समन्वयक विलास जगताप यांनी आभार मानले. यावेळी मोठ्या संख्येने महिलांची उपस्थिती होती.
* 'माविम' च्या नुतन इमारतीचे ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन : प्रारंभी लिंबाळा येथील महिला आर्थिक विकास महामंडळ कार्यालयाच्या नुतन इमारतीचे उद्घाटन 'माविम' च्या अध्यक्षा ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच  यावेळी  पात्र लाभार्थ्यांना सुमारे 3 कोटी 47 लाख रुपयांचे कृषि व्यवसायावर आधारीत यांत्रिकीकरणांचे अवजारे वितरण ज्योतीताई ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, जिल्हा पोलीस अधिक्षक योगेश कुमार, माविमचे जिल्हा समन्वयक विलास जगताप, माविमच्या जिल्ह्यातील विविध बचत गटांच्या महिलांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.  
****




No comments: