22 August, 2019

प्रधानमंत्री मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पेन्श्न · 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सजा निहाय ‍‍मेळाव्याचे आयोजन



प्रधानमंत्री मानधन योजने अंतर्गत शेतकऱ्यांना पेन्श्न
·   23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सजा निहाय ‍‍मेळाव्याचे आयोजन

हिंगोली,दि.22: केंद्र शासनाने देशातील शेतकऱ्यांसाठी प्रधानमंत्री शेतकरी मानधन योजना सुरू केली आहे. या योजनेमध्ये 18 ते 40 वयोगटातील 2 हेक्टरपर्यंत शेती असलेले सर्व अल्पभूधारक शेतकऱ्यांचा सहभाग असणार आहे. या योजनेत भाग घेणार्‍या शेतकर्‍यांना वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यानंतर दरमहा 3,000 रुपयांची मानधन (पेन्शन) मिळणार आहे. यात लाभधारक शेतकर्‍याचा मृत्यू झाल्यास त्याच्या पत्नीला सुद्धा निवृत्ती वेतन मिळण्याची तरतूद या योजनेत करण्यात आली आहे. या योजनेत दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत शेतकर्‍यांना सहभागी होता येणार आहे. त्यासाठी शेतकर्‍यांनी आपले सरकार सेवा केंद्र/सामायिक सुविधा केंद्र यांच्याकडे स्वतःचा 7/12 चा उतारा, 8 अ, आधार कार्ड, बँकेचे पासबुक, मोबाइल क्रमांक माहितीची कागदपत्र घेऊन संपर्क साधावा.
या योजनेत भाग घेण्यासाठी राष्ट्रीय निवृत्तीवेतन योजना, कर्मचारी राज्य विमा निगम योजना, कर्मचारी फंड ऑर्गनायझेशन योजना व यासारख्या इतर कोणत्याही सामाजिक सुरक्षा योजनातंर्गत लाभ घेणारे शेतकरी अपात्र असतील. प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना, प्रधानमंत्री लघु व्यापारी मानधन योजना याचबरोबर उच्च आर्थिक स्थितीतील शेतकरी या योजनेत भाग घेण्यास पात्र नाही. 
केंद्र शासन लाभार्थी हप्त्या इतकीच रक्कम हप्ता म्हणून जमा करणार आहे. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेचे लाभार्थी त्यांना मिळणार्‍या आर्थिक साहाय्यातून वरील मानधन योजनेतील लाभार्थी हिस्सा भरण्यासाठी बँकेचे अर्ज् भरून देत या योजनेत सहभागी होऊ शकतील. लाभार्थी शेतकर्‍यास पेन्शन कार्ड देखील मिळणार असून अधिक महितीसाठी शेतकर्‍यांनी आपल्या संबंधित तलाठी, कृषी सहायक, ग्रामसेवक यांच्याशी संपर्क साधावा. प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेत जिल्ह्यातील जास्तीत-जास्त पात्र शेतकऱ्यांना सहभागी करुन घेण्यासाठी जिल्ह्यात दि. 23, 24 आणि 25 ऑगस्ट रोजी सज्जानिहाय (तलाठी कार्यालय) ‍‍मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना वृद्धापकाळात त्यांचे आणि कुटुंबाचे आर्थिक उत्पन्न सुरक्षित करण्यासाठी ही अत्यंत महत्त्वपूर्ण योजना असल्याने अधिकाधिक शेतकर्‍यांनी या योजनेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांनी केले आहे.
****


No comments: