17 October, 2026

विद्यार्थ्यांनी ध्येय निश्चित करून नियोजनबद्ध अभ्यास करावा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

तोष्णीवाल महाविद्यालयात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन; गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार
हिंगोली १७ ऑक्टोबर (जिमाका) : सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात विद्यार्थी-शिक्षक-पालक मेळावा, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा सत्कार समारंभ उत्साहात संपन्न झाला. यावेळी  जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत जीवनात यशस्वी होण्यासाठी निश्चित ध्येय आणि नियोजनबद्ध अभ्यास आवश्यक असल्याचे प्रतिपादन केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री गजानन शिक्षण प्रसारक मंडळ, येलदरी कॅम्पचे अध्यक्ष बी. आर. तोष्णीवाल होते. प्रमुख अतिथी व मार्गदर्शक म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता उपस्थित होते. यावेळी मंडळाचे उपाध्यक्ष सुभाषअप्पा एकसिंगे, महाविद्यालय विकास समितीचे अध्यक्ष रमणजी तोष्णीवाल, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर, गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. आर. ए. जोशी, कार्यक्रम समन्वयक डॉ. आर. एस. गोरे, पालक प्रतिनिधी शंकरराव तुकाराम नानवटी व प्रतिभा लिंबाजी कदम उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉ. तळणीकर यांनी प्रास्ताविकातून महाविद्यालयातील विविध अभ्यासक्रम, सामाजिक उपक्रम तसेच सनदी व प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनपर व्याख्यानांची माहिती दिली. प्रा. टी. यू. केंद्रे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला.

इंटरनेटवरील माहितीचा योग्य वापर करून अभ्यासाचे नियोजन करा
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून त्यांच्याशी संवाद साधला. जीवनात यशस्वी होण्यासाठी ध्येय निश्चित करून त्यानुसार अभ्यासाचे नियोजन करणे आवश्यक आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करताना संबंधित परीक्षेचा अभ्यासक्रम समजून घ्यावा आणि इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीचा योग्य वापर करावा. उपलब्ध पुस्तके व अभ्याससाहित्याच्या मदतीने नियोजनबद्ध अभ्यास केल्यास ध्येय गाठणे सोपे होते. बदलत्या काळाची गरज ओळखून विद्यार्थ्यांनी संगणक प्रोग्रामिंगसारखी कौशल्येही आत्मसात करावीत, असे त्यांनी सांगितले.

अध्यक्षीय समारोपात बी. आर. तोष्णीवाल यांनी विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हे महाविद्यालयाचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांनी केवळ पोलीस भरतीपुरते मर्यादित न राहता भारतीय प्रशासकीय सेवा (आयएएस) आणि भारतीय पोलीस सेवा (आयपीएस) यांसारख्या उच्च पदांचे ध्येय ठेवून महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षांची तयारी करावी. पालकांनीही आपल्या पाल्याच्या शैक्षणिक प्रगतीबाबत जागरूक राहून त्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमाच्या पुढील टप्प्यात गुणवंत विद्यार्थी व खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. डॉ. दत्ता सावंत यांनी सूत्रसंचालन केले, तर डॉ. शंकर पजई यांनी आभार मानले. कार्यक्रमाला विद्यार्थी, पालक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.

No comments: