08 March, 2018


महिला सक्षम झाल्यास समाज आणि राष्ट्र बलवान होऊ शकते
                                          अप्पर जिल्हाधिकारी जे.जी. मिनियार
हिंगोली,दि.8: आज 8 मार्च, जगभरात महिला दिवस साजरा केला जातो. महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याकरीता महिलांना समान न्याय, हक्क, अधिकार व सन्मान देवूनच महिला सक्षम झाल्यास समाज आणि राष्ट्र बलवान होऊ शकते, असे प्रतिपादन अप्पर जिल्हाधिकारी जे.जी. मिनियार यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील डि.पी.सी. सभागृहात जिल्हा प्रशासन व जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी निवडणूक उपजिल्हाधिकारी गोविंद रणवीरकर, रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी, उपजिल्हाधिकारी (सामान्य) पी. एस. बोरगावकर, पोलीस उपअधिक्षक (गृह) श्रीमती सुजाता पाटील, तहसिलदार श्रीमती प्रतिभा गोरे, तहसिलदार गजानन शिंदे, जिल्हा जात पडताळणी समितीच्या अध्यक्षा श्रीमती छाया कुलाल, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक संचालक श्रीमती रेणुका तम्मलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (म. बा.) गणेश वाघ, ॲडव्होकेट श्री. घुगे, डॉ. गोपाल कदम, डॉ. श्रीमती देशमुख, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी श्री. शिंदे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी आणि कर्मचारी महिला उपस्थित होत्या.
यावेळी श्री. मिनियार पुढे म्हणाले की, जागतिक महिला दिनानिमित्त महिलांची एकूणच परिस्थिती आणि त्यांचे समाजातील स्थान याबद्दल नेहमी चर्चा चालू असते. महिला स्वत:च्या अस्तित्वाची जाणीव करुन देण्यासाठी आज प्रत्येक क्षेत्रात पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. महिला सक्षमीकरणात सर्वात महत्वाची बाब म्हणजे तिला माणुस म्हणुन जगण्याची संधी देऊन तिला तिचे व्यक्तिमत्व विकसित करण्यास समाजातून प्रोत्साहन मिळणे आवश्यक आहे. आजच्या स्पर्धेच्या युगात आपल्या कार्यक्षमतेच्या जोरावर महिला सर्व क्षेत्रात अव्वल आहेत. मात्र प्रत्येक स्त्रीने आर्थिक स्वावलंबी असणे आवश्यक आहे. मात्र प्रत्येक महिलांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. महिलांच्या सामाजिक आर्थिक स्थितीत सुधारणा करण्याकरीता महिलांना समान न्याय, हक्क, अधिकार व सन्मान मिळणे आवश्यक आहे.
यावेळी सुजाता पाटील म्हणाल्या की, महिलांवरील अत्याचार थांबवून महिलांना जागरुक करून समाजात सक्षम करणे आवश्यक आहे. समाजामध्ये महिलांना शिक्षण देऊन पुरुष आणि महिला यांच्यातील दरी कमी करण्याबरोबरच कायद्याच्या शिक्षणाविषयी महिलांनी वळावे. असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.
तहसिलदार प्रतिभा गोरे म्हणाल्या की, महिलांकडे पुरुषांचा बघण्याचा दृष्टीकोन बदलून समाजामध्ये होत असलेले बालविवाह थांबवण्याचे काम अधिकाऱ्यांबरोबरच महिलांचे सुध्दा आहे. तसेच पुरुष आणि स्त्री यांच्यामध्ये समानता येऊन गुणवत्तापूर्ण शिक्षण, आरोग्य, यामध्ये भेदभाव न करता बचतगटाच्या माध्यमातून आर्थिक सक्षमीकरण करणे आवश्यक आहे.
निवडणूक उपजिल्हाधिकारी श्री. रणविरकर म्हणाले की, महिलांनी मतदार नोंदणी करून ज्या महिलांचे नावे मतदार यादीत नाही अशा महिलांना मार्गदर्शन करून प्रत्येक महिलांची मतदार नोंदणी करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच महिला मतदारांची मतदार नोंदणीची टक्केवारी वाढविण्याचे त्यांनी यावेळी आवाहन केले.
 सामान्य उपजिल्हाधिकारी श्री. बोरगावकर म्हणाले की, पुर्वी महिलांना समाजामध्ये दुय्यम प्रतीचे स्थान होते. महिलांना सतीप्रथा, बालविवाह, केशवपन, एवढ्या समस्यांना सामारे जावे लागत असत. परंतू महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षि कर्वे यांनी महिलांच्या शिक्षणाविषयी कार्य करुन महिलांची स्थिती सुधारली. संविधानात महिलांविषयी महत्वाचे कलम आहे. ज्यामध्ये कलम 13, कलम 14, कलम 15-1, कलम 15-3, कलम 21, 23, 39-अ, कलम 51 तसेच महिलांच्या आरक्षणाविषयी झालेल्या घटनादुरूस्ती 73 व 74 बाबत ही मार्गदर्शन केले.
तसेच महिलांना सक्षमीकरण करण्यासाठी महिलांना पुरुषांनी निर्णय प्रक्रियेत सामावून घेण्याचे आवाहन ही यावेळी त्यांनी केले.
10 ते 19 वर्षाच्या किशोरवयीन मुलींसाठी प्रश्नोतराच्या स्वरुपात मार्गदर्शन करून महिलांना सकस आहार देण्याचे आवाहन डॉ. गोपाल कदम यांनी यावेळी केले. यावेळी श्रीमती डॉ. देशमुख यांनी महिलांच्या प्रजननाबाबत आणि गरोदर असल्यावर घ्यावयाची काळजी याविषयी मार्गदर्शन केले. ॲडव्होकेट श्री. घुगे यांनी महिलांसाठी असलेल्या कायद्याविषयी जनजागृती करणे आवश्यक असून महिलांनी देखील कायद्याबाबत माहिती करुन घ्यावे, असे आवाहन केले.
यावेळी निवडणूक विभागाकडून घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेच्या शालेय विद्यार्थींनींना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरीत करण्यात आले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संरक्षण अधिकारी श्रीमती सुर्यवंशी तर आभार नायब तहसिलदार श्री. गळगे यांनी मानले.
***** 

No comments: