04 August, 2026

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर शिष्यवृत्ती अर्जासाठी विद्यार्थ्यांनी नोंदणी करावी

 

विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात थेट शिष्यवृत्तीची रक्कम जमा होणार


हिंगोली (जिमाका), दि. 4 : महाराष्ट्र राज्यातील विविध विभाग तसेच इतर मागास विभागामार्फत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या विविध शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यासाठी महाडीबीटी 2.0 ही नवीन प्रणाली शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे. या प्रणालीद्वारे विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ घेता येणार असून, शिष्यवृत्तीची लाभाची रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये जमा होणार आहे. 

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर मॅट्रिकोत्तर व मॅट्रिकपूर्व अशा विविध शिष्यवृत्ती व शुल्क प्रतिपूर्ती योजनांचा समावेश करण्यात आला आहे. मॅट्रिकोत्तर योजनांमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती, राजर्षी छत्रपती शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती, व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी निर्वाह भत्ता, तसेच विविध प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षण व परीक्षा शुल्क योजनांचा समावेश आहे.

मॅट्रिकपूर्व योजनांमध्ये इयत्ता 5 वी ते 9 वीमधील इतर मागास प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, इयत्ता 8 वी ते 10 वीतील विद्यार्थ्यांसाठी तसेच अनुसूचित जाती व विमुक्त जाती-भटक्या जमाती प्रवर्गातील मुलींसाठी सावित्रीबाई फुले शिष्यवृत्ती, सैनिक शाळेतील प्रशिक्षण योजना, माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी गुणवत्तापूर्ण शिष्यवृत्ती, तसेच पीएम-यशस्वी मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती यांचा समावेश आहे.

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर नोंदणी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी महा आयडी नव्याने तयार करणे बंधनकारक आहे. मागील पोर्टलवरील युजर आयडी व पासवर्ड यापुढे ग्राह्य राहणार नाही. विद्यार्थ्यांनी आधार क्रमांकासोबत आधार पोर्टलवर नोंदणीकृत मोबाईल क्रमांक, ई-मेल व बँक खात्याची अद्ययावत माहिती ठेवावी. तसेच जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र व शैक्षणिक गुणपत्रके आदी आवश्यक कागदपत्रे पीडीएफ स्वरूपात तयार ठेवावीत. 

नूतनीकरणाच्या तसेच नवीन अर्जासाठी नवीन महा आयडी आधार लॉगिन करणे आवश्यक असून, नूतनीकरण करणाऱ्या विद्यार्थ्यांनी लॉगिन केल्यानंतर ‘माझा अर्ज नूतनीकरण करा’ हा पर्याय निवडावा.

महाविद्यालयांनी विद्यार्थ्यांना महाडीबीटी 2.0 पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी व अर्ज करण्यासाठी आवश्यक सहकार्य करावे. विद्यार्थ्यांना प्रवेशाच्या वेळी आकारण्यात येणारे शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क, पात्र योजनांनुसार शासनाकडून मिळणाऱ्या शुल्क प्रतिपूर्तीच्या रकमेच्या अनुषंगाने आकारावे.

महाविद्यालयांनी आपले नाव, अभ्यासक्रम, अभ्यासक्रमांची मान्यता, प्रवेश क्षमता तसेच विविध आदेश शुल्क रचना इत्यादी माहिती पोर्टलवर अचूकपणे मॅप करून घेणे आवश्यक आहे. 

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर महाविद्यालयांसाठी उपलब्ध असलेल्या एकमेव लॉगिनद्वारे महाविद्यालयाच्या प्रणालीमध्ये प्रवेश करता येणार आहे. जुन्या लॉगिन पासवर्डबाबत अडचण असल्यास संबंधित शैक्षणिक विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर आधार आधारित लॉगिन करून आवश्यक माहिती भरावी. लॉगिन केल्यानंतर पात्र योजनांची यादी उपलब्ध होईल. विद्यार्थ्यांनी संबंधित योजनेसमोरील 'अप्लाय'वर क्लिक करून शैक्षणिक व आवश्यक कागदपत्रांची माहिती भरून अर्ज ऑनलाइन सादर करावा. आवश्यक कागदपत्रे अपलोड करून अर्जाची प्रत प्रिंट अथवा पीडीएफ स्वरूपात जतन करून ठेवावी. 

विद्यार्थ्यांनी आधार कार्ड, जात प्रमाणपत्र, उत्पन्नाचा दाखला, अधिवास प्रमाणपत्र, शैक्षणिक गुणपत्रिका तसेच आधार संलग्न बँक खात्याची माहिती अद्ययावत ठेवावी. विशेषतः शिष्यवृत्तीची रक्कम थेट आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार असल्याने एनपीसीआय मँपींग वा आधार संलग्न पूर्ण असणे आवश्यक आहे.

महाडीबीटी 2.0 पोर्टलच्या वापराबाबत अडचण आल्यास विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयाशी संपर्क साधावा. तांत्रिक अथवा प्रशासकीय अडचणींसाठी पोर्टलवर लॉगिनमधून स्क्रीनशॉटसह तक्रार नोंदविण्याची सुविधाही उपलब्ध आहे.

महाडीबीटी 2.0 पोर्टलवर विद्यार्थ्यांनी वेळेत नोंदणी करून पात्र शिष्यवृत्ती योजनांसाठी अर्ज करावा, असे आवाहन सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्यामार्फत करण्यात आले आहे. 

******

No comments: