हिंगोली (जिमाका), दि. 3 : राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशांतील आधुनिक कृषी तंत्रज्ञानाची माहिती मिळावी, तसेच शेतीमालाची निर्यात, कृषीमाल प्रक्रिया व बाजारपेठेतील मागणी याबाबतचे ज्ञान आणि क्षमता वृद्धिंगत व्हावी, यासाठी कृषी विभागामार्फत ‘राज्य पुरस्कृत शेतकऱ्यांचे देशाबाहेरील अभ्यास दौरे योजना सन 2026-27’ राबविण्यात येत आहे.
या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना विकसित देशांतील आधुनिक तंत्रज्ञान, शेती पद्धती, कृषी प्रक्रिया व शेतमाल निर्यातीबाबत प्रत्यक्ष माहिती मिळणार आहे. तसेच विविध देशांतील विकसित शेती तंत्रज्ञानाची माहिती घेऊन त्याचा राज्यातील शेतीमध्ये उपयोग करण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळणार आहे.
शेतकऱ्यांचे ज्ञान व क्षमता वृद्धिंगत करण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे परदेशात अभ्यास दौरे आयोजित करण्याबाबत मार्गदर्शक सूचना प्राप्त झाल्या आहेत. त्यानुसार युरोप व चीन या देशांची निवड करण्यात आली आहे. युरोपमध्ये फलोत्पादन, सेंद्रिय शेती तसेच दुग्धोत्पादन, तर चीनमध्ये विविध कृषी तंत्रज्ञान, पीक उत्पादकता वाढविण्यासाठी लागणारे तंत्रज्ञान आणि कृषी एक्स्पो ही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत.
हिंगोली जिल्ह्यासाठी 5 शेतकऱ्यांसाठी भौतिक लक्ष्य प्राप्त झाले असून, त्यामध्ये 1 महिला शेतकरी, 1 केंद्र/राज्य विविध कृषी पुरस्कार प्राप्त अथवा पीकस्पर्धा विजेता आणि 3 इतर शेतकरी अशा लाभार्थ्यांचा समावेश करण्यात येणार आहे.
परदेशातील अभ्यास दौऱ्यासाठी शासनाकडून एकूण खर्चाच्या 50 टक्के किंवा 2 लाख रुपये यापैकी कमी असलेली रक्कम देय राहणार आहे. शेतकऱ्यांची निवड जिल्हास्तरीय समितीमार्फत करण्यात येणार आहे.
हिंगोली जिल्ह्यातील इच्छुक शेतकऱ्यांनी अर्ज, वैध पारपत्र (पासपोर्ट), फार्मर आयडी, सातबारा व 8-अ उतारा, आधारकार्ड, शैक्षणिक प्रमाणपत्र व बँक खात्याचा तपशील या कागदपत्रांसह संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात दि. 17 ऑगस्ट 2026 पूर्वी अर्ज सादर करावा.
प्राप्त अर्जांमधून सोडत काढून लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. या अभ्यास दौऱ्याचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना मिळावा यासाठी इच्छुक शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.
******
No comments:
Post a Comment