• मूग व उडीद पीक स्पर्धेसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ
हिंगोली (जिमाका), दि. 4 : राज्यात पीक उत्पादकता वाढविण्यासाठी विविध प्रयोग करणाऱ्या व उत्कृष्ट उत्पादन घेणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी कृषी विभागामार्फत दरवर्षी पीक स्पर्धा आयोजित करण्यात येते. खरीप हंगाम 2026 साठी अन्नधान्य, कडधान्य व गळीतधान्य पिकांची पीक स्पर्धा जाहीर करण्यात आली असून, शेतकऱ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्याचे आवाहन कृषी विभागाने केले आहे.
खरीप हंगाम 2026 पासून पीक स्पर्धेचे अर्ज स्वीकारण्यासाठी स्वतंत्र ऑनलाइन संगणक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. प्रशासकीय कामकाजात पारदर्शकता आणि गतिमानता आणण्याच्या उद्देशाने ही ऑनलाइन प्रणाली कार्यान्वित करण्यात आली आहे. या स्पर्धेत तालुका, जिल्हा आणि राज्य अशा तीन स्तरांवर स्पर्धक शेतकऱ्यांची निवड करण्यात येणार आहे.
खरीप हंगामातील भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, मूग, उडीद, सोयाबीन, भुईमूग आणि सूर्यफूल या एकूण 11 पिकांसाठी पीक स्पर्धा घेण्यात येणार आहे. सर्वसाधारण तसेच आदिवासी गटातील शेतकऱ्यांना या स्पर्धेत सहभागी होता येणार आहे.
पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्याच्या स्वतःच्या नावावर जमीन असणे व तो स्वतः त्या जमिनीची लागवड करीत असणे आवश्यक आहे. एका वेळी एका पिकासाठीच स्पर्धेत सहभागी होता येईल. तसेच संबंधित पिकाखाली स्वतःच्या शेतात किमान 40 आर क्षेत्रावर सलग लागवड असणे आवश्यक आहे.
मूग व उडीदसाठी 10 ऑगस्टपर्यंत अर्जाची संधी
मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख यापूर्वी 31 जुलै 2026 निश्चित करण्यात आली होती. मात्र, यावर्षी प्रथमच पीक स्पर्धेचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने स्वीकारण्यात येत असल्याने ‘एक वेळची विशेष बाब’ म्हणून मूग व उडीद पिकांसाठी अर्ज करण्यास 10 ऑगस्ट 2026 पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.
भात, ज्वारी, बाजरी, मका, नाचणी (रागी), तूर, सोयाबीन, भुईमूग व सूर्यफूल या पिकांसाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख 31 ऑगस्ट 2026 ही आहे.
पीकनिहाय सर्वसाधारण गटासाठी प्रवेश शुल्क 300 रुपये, तर आदिवासी गटासाठी 150 रुपये राहणार आहे. स्पर्धेत विजेत्या शेतकऱ्यांना तालुका, जिल्हा आणि राज्यस्तरावर बक्षिसे देण्यात येणार आहेत.
तालुकास्तरावर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकासाठी अनुक्रमे 5 हजार, 3 हजार व 2 हजार रुपये, जिल्हास्तरावर 10 हजार, 7 हजार व 5 हजार रुपये, तर राज्यस्तरावर अनुक्रमे 50 हजार, 40 हजार व 30 हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे.
पीक स्पर्धेसाठी अर्ज करताना जमीन ओळखपत्र, निर्धारित प्रवेश शुल्क भरल्याची चलन/पावती, जात प्रमाणपत्र (आदिवासी असल्यास) आणि बँक खाते चेक/पासबुक तपशील आवश्यक आहे.
जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पीक स्पर्धेत सहभागी होण्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावरील ‘पीक स्पर्धा’ टॅबवर जाऊन ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन कृषी विभागामार्फत करण्यात आले आहे. पीक स्पर्धेबाबत अधिक माहितीसाठी संबंधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा.
*****
No comments:
Post a Comment