23 May, 2017

पालकमंत्री दिलीप कांबळे यांचा हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम
हिंगोली दि. 23 : राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भुकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे हे दि. 25 मे, 2017 रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. पालकमंत्री यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे असणार आहे.
गुरूवार दि. 25 मे, 2017 रोजी सोईनुसार शासकीय वाहनाने परभणी येथून हिंगोलीकडे प्रयाण. शासकीय विश्रामगृह हिंगोली येथे आगमन व राखीव. शासनाने आयोजित केलेल्या शिवार संवाद कार्यक्रमास उपस्थिती. सोईनुसार हिंगोली येथे राखीव व मुक्काम.


***** 
जिल्ह्यातील सात गावासाठी नवीन विंधन विहिरीच्या प्रस्तावास मान्यता
हिंगोली, दि. 23 : पाणी टंचाई अंतर्गत हिंगोली तालूक्यासाठी 05 तर कळमनूरी तालूक्यासाठी 02 अशा एकूण  07 गावाकरीता नवीन विंधन विहिरींच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता दिली आहे. यामध्ये हिंगोली तालुक्यातील 1) आठरवाडी 2) जांभरुन तांडा 3) राहोली खु. 4) हिवराबेल आणि 5) अंभेरी कळमनुरी तालुक्यातील 1) सालापूर 2) पिंप्री बु. अशा एकुण 07 गावांसाठी 07 नवीन विंधन विहिरी व हातपंपाचे कामाचे प्रशासकीय मान्यतेसाठी प्रत्येकी 49 हजार 605 याप्रमाणे 03 लाख 47 हजार 235 रुपये निधीच्या प्रस्तावास जिल्हा प्रशासनाने मान्यता प्रदान केली आहे. सदरील 07 गावांमध्ये जर यापुर्वी विंधन विहीरी घेण्यात आल्या असतील तर प्रामुख्याने त्याची दुरूस्ती शक्य असेल तर दुरूस्त करावे या अटीस अधिन राहून या प्रशासकीय मान्यता देण्यात आल्या आहेत.

*****  

22 May, 2017

दोन ग्रामपंचायत सदस्यांचे सदस्यत्व रद्द
            हिंगोली,दि.22: जिल्हाधिकारी यांनी न्यायालयात दाखल केलेल्या प्रकरणात विहित मुदती जात वैधता प्रमाणपत्र सादर न केल्याने ग्रामपंचायत देवजना ता. कळमनुरी ग्रामपंचायत सदस्य श्री. राजेश तुळशीराम धोत्रे आणि ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभाबाई दिलीप कल्याणकर या दोन ग्रामपंचायत सदस्यांचे महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1958 चे कलम 10-1 अ अन्वये सदस्यत्व रद्द करण्यात आले असल्याचे उपजिल्हाधिकारी (सा.प्र.) हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

***** 

20 May, 2017

उत्तराखंड येथे गेलेल्या भाविक व पर्यटकांच्या नातेवाईकांनी
नियंत्रण कक्षाकडे संपर्क साधण्याचे आवाहन
हिंगोली दि. 20 : उत्तराखंड येथील दि.१९ मे, २०१७ रोजी सायंकाळी जोशीमठ जवळ भूस्खलन होऊन हजारो पर्यटक अडकले असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. त्यानुसार हिंगोली जिल्ह्यातून उत्तराखंड येथे गेलेल्या पर्यटकांना मदत तसेच इतर सुविधा प्राप्त करून देण्यासाठी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी उत्तराखंड येथे गेलेल्या नागरीकांची माहिती कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्र परिवार यांनी जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्ष दुरध्वनी क्र. ०२४५६-२२२५६० व  भ्रमणध्वनी ९५२७०४४१७१ या क्रमांकावर  देण्याचे आवाहन केले आहे.
            सदरील भूस्खलनाची माहिती मिळताच जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय नियंत्रण कक्षामार्फत ट्रॅव्हल्स कंपनी, यात्रा आयोजक, सोशल मिडिया तसेच स्थानिक नागरीक यांच्यामार्फत उत्तराखंड येथे गेलेल्या नागरीकांची माहिती घेण्यात आली होती. त्यानुसार माहिती मिळताच जिल्हाधिकारी श्री. भंडारी तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी नियंत्रण कक्षामार्फत जिल्ह्यातून उत्तराखंड येथे गेलेल्या पर्यटकांशी, यात्रा आयोजक व ट्रॅव्हल्स कंपनी यांना संपर्क साधला. त्यानुसार पर्यटकांची विचारपूस करून कोणतीही अडचण नसल्याचे तसेच सुखरूप असल्याचेही पर्यटकांमार्फत कळविण्यात आले आहे. यात्रा आयोजक व ट्रॅव्हल्स कंपनी यांना पर्यटकांची काळजी घेण्याबाबत तसेच जिल्हा प्रशासनाच्या संपर्कात राहण्यासाठी यावेळी सूचित करण्यात आले आहे, असे आवाहन जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
****

 

अवैध खतांचा साठा व बोगस बियाणे विक्री धारकांवर कारवाई करण्यात येणार

  -- जिल्हाधिकारी अनिल भंडारी

  • कृषी केंद्रानी ई-पॉस मशिनद्वारे खत विक्री करावी
हिंगोली, दि.20: शेतकऱ्यांना खतांचा तुटवडा भासणार नाही. पुरेशा प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध होणार असून येणाऱ्या खरीप हंगामासाठी जिल्हा प्रशासनामार्फत खतांचे आणि बियाणांचे नियोजन करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना  दर्जेदार व उत्तम प्रतीचे खते व बियाणे उपलब्ध होणार आहेत.  अप्रमाणित खते व बियाणे विक्री करणाऱ्या विक्री धारकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी संबंधित विभाग प्रमुखांना दिले. 
आज श्री. भंडारी यांनी जिल्ह्यातील रिसाला बाजार येथील माऊली कृषी केंद्राचे गोदाम व प्रकाश ट्रेडींग कंपनीला प्रत्यक्ष भेट देवून पाहणी केली. यावेळी त्यांनी ई-पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना खत विक्री कशा प्रकारे केली जाणार आहे याचीही माहिती घेतली. दि. 1 जून, 2017 पासून जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्रानी ई-पॉस मशिनद्वारे शेतकऱ्यांना खत विक्री करावी अशा सूचना हि त्यांनी व्यापाऱ्यांना दिल्या. तसेच उपस्थित व्यापाऱ्यांच्या समस्या ही त्यांनी यावेळी जाणून घेतल्या.
यावेळी रेल्वे रेक पॉईंट येथुन करण्यात येणाऱ्या खतांचा व बियाणांचा पुरवठ्याच्या देखील श्री. भंडारी रेल्वे रेक पॉईंट येथे जावून पाहणी केली. तसेच सदर खते व बियाणे पावसामुळे भिजू नयेत यासाठी काय उपाय योजना करता येतील याची पाहणी केली. तसेच खते व बियाणे भिजू नये याकरीता लवकरात लवकरण सोयी सुविधा उपलबध करुन देण्याबाबत जिल्हाधिकारी श्री. भंडारी यांनी रेल्वे विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली.
यावेळी जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी अंकुश डुबल, कृषी अधिकारी पंकज राठोड व उत्तम वाघमारे तसेच कृषी विक्रेते संघटनेचे जिल्हाध्यक्ष नंदकिशोर शर्मा, महाराष्ट्र फर्टिलायझर्स असोशिएशनचे सहसचिव आनंद निलावार, हिंगोली व्यापारी महासंघाचे सहसचिव श्री. मानका व द्वारकादास झंवर आदिंची यावेळी उपस्थिती होती. 

****


दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त निवासी उपजिल्हाधिकारी यांनी दिली प्रतिज्ञा

हिंगोली, दि.20: तत्कालीन पंतप्रधान राजीव गांधी यांच्यावरील दहशतवादी हल्ल्याचा विरोध म्हणून ‘दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिवस’ पाळण्यात येतो. या दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी जिल्हा प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रतिज्ञा दिली.
यावेळी रोहयो उपजिल्हाधिकारी खुदाबक्ष तडवी यांच्यासह वरिष्ठ अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.
दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेण्यात आलेली प्रतिज्ञा

आम्ही, भारताचे नागरिक, आपल्या देशाच्या अहिंसा व सहिष्णूतेच्या
परंपरेविषयी दृढ निष्ठा बाळगून याद्वारे, सर्व प्रकारच्या दहशतवादाचा व
हिंसाचाराचा आमच्या सर्व शक्तीनिशी मुकाबला करण्याची गांभीर्यपूर्वक
प्रतिज्ञा करत आहोत. आम्ही प्रतिज्ञा करतो की, आम्ही सर्व मानवजातीमध्ये
शांती, सामाजिक एकोपा आणि सामंजस्य टिकवू व वर्धिष्णू करु, तसेच मानवी
जिवीत आणि मूल्ये धोक्यात आणणाऱ्या विघटनकारी शक्तींचा प्रतिकार करु.
*****

 

19 May, 2017

‘चला गावाकडे जाऊ-ध्यास विकासाचा घेऊ’ मोहिमेचे आयोजन

  • जिल्ह्यात 20 ते 29 मे, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार मोहिम
हिंगोली, दि.१९: राज्य  शासनाच्यावतीने विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून, यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा जलसंधारणच्या महत्वाच्या योजनाचा समावेश आहे. सदर योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामांना पावसाळा सुरु होण्यापूर्वी गती मिळावी याकरीता जिल्ह्यात दि. २० ते २९ मे या कालावधीत ‘चला गावाकडे जाऊ-ध्यास विकासाचा घेऊ’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात येत असून, सन २०१५-१६ व २०१६-१७ मधील जलयुक्त शिवार अभियानातील उर्वरित कामे आणि २०१७-१८ करीता निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे पावसाळ्यापूर्वी तयार करून कामे पूर्ण करणे हा मुख्य उद्देश या मोहिमेचा राहणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांबरोबरच ‘चला गावाकडे जाऊ, विकासाचा ध्यास घेऊ’ या अभिनव उपक्रमातही सर्वांनी सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे.
विभागात गाव व शहरांची स्वच्छता, तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे करणे, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवाराची कामे, महिलांच्या सबलीकरणाचे उपक्रम, घरकूल, वैयक्तिक शौचालये, वैयक्तिक सिंचन विहीरी इत्यादी विषयाच्या विकास कामांत क्रांतीस्वरूप उठाव सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तसेच यात आणखी मोठ्या प्रमाणावर भर पडावी व विभागातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या जन्मागावाची सेवा करण्याची किंबहुना अल्पप्रमाणात का हाईना ऋण फेडण्याची संधी मिळावी यासाठी शासनाच्या विकासात्मक योजनांत प्रात्यक्षिकरित्या सहभाग नोंदवावा.
सदर मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तालुक्यातील एकूण गावांची विभागणी प्रत्येकी सलग दोन दिवस याप्रमाणे दिनांक निहाय चार टप्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा उदा. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रामसंपर्क अधिकारी यांच्यावर सदर मोहिमेचे नियोजन करण्याची जबाबदारी राहणार आहे.
            तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे त्यांच्या गावातील त्यांना ज्ञात असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कोणत्या तारखेस गावात मोहिम राबविण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देणार आहे. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी त्यांच्या गावातील दोन दिवसीय कामाचे योग्य ते नियेाजन करुन याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, युवक संघ, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना सहभागी करुन घ्यावे.
            सदर मोहिमेच्या कालावधीत तालुका संपर्क अधिकारी व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही गावांना भेटी देवून मोहिमेची पाहणी करणार आहेत. तसेच ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जन्मगाव या विभागात नाही, त्यांनी या विभागातील त्यांच्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या किंवा सहकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गावात जावुन मोहिमेत सहभागी व्हावे. तर शहरी भागात जन्मगाव असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शहरातील त्यांच्या प्रभागात (वॉर्डात) मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
           

*****