19 May, 2017

‘चला गावाकडे जाऊ-ध्यास विकासाचा घेऊ’ मोहिमेचे आयोजन

  • जिल्ह्यात 20 ते 29 मे, 2017 या कालावधीत राबविण्यात येणार मोहिम
हिंगोली, दि.१९: राज्य  शासनाच्यावतीने विविध महत्वाकांक्षी योजना राबविण्यात येत असून, यामध्ये जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, आणि गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार अशा जलसंधारणच्या महत्वाच्या योजनाचा समावेश आहे. सदर योजने अंतर्गत सुरु असलेल्या कामांना पावसाळा सुरु होण्यापूर्वी गती मिळावी याकरीता जिल्ह्यात दि. २० ते २९ मे या कालावधीत ‘चला गावाकडे जाऊ-ध्यास विकासाचा घेऊ’ ही मोहिम राबविण्यात येणार आहे.
‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणावर देण्यात येत असून, सन २०१५-१६ व २०१६-१७ मधील जलयुक्त शिवार अभियानातील उर्वरित कामे आणि २०१७-१८ करीता निवडण्यात आलेल्या गावांचे आराखडे पावसाळ्यापूर्वी तयार करून कामे पूर्ण करणे हा मुख्य उद्देश या मोहिमेचा राहणार आहे. जलयुक्‍त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, गाळमुक्त धरण, गाळयुक्त शिवार या शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांबरोबरच ‘चला गावाकडे जाऊ, विकासाचा ध्यास घेऊ’ या अभिनव उपक्रमातही सर्वांनी सहभागी होऊन शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना मिळवून देण्यात येणार आहे.
विभागात गाव व शहरांची स्वच्छता, तलाव, बंधाऱ्यातील गाळ काढणे, वृक्ष लागवडीसाठी खड्डे करणे, मागेल त्याला शेततळे, जलयुक्त शिवाराची कामे, महिलांच्या सबलीकरणाचे उपक्रम, घरकूल, वैयक्तिक शौचालये, वैयक्तिक सिंचन विहीरी इत्यादी विषयाच्या विकास कामांत क्रांतीस्वरूप उठाव सुरू झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे तसेच यात आणखी मोठ्या प्रमाणावर भर पडावी व विभागातील सर्व अधिकारी / कर्मचाऱ्यांना त्यांच्या जन्मागावाची सेवा करण्याची किंबहुना अल्पप्रमाणात का हाईना ऋण फेडण्याची संधी मिळावी यासाठी शासनाच्या विकासात्मक योजनांत प्रात्यक्षिकरित्या सहभाग नोंदवावा.
सदर मोहिम यशस्वीरित्या राबविण्यासाठी तालुक्यातील एकूण गावांची विभागणी प्रत्येकी सलग दोन दिवस याप्रमाणे दिनांक निहाय चार टप्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी व तालुका कृषी अधिकारी यांनी उपविभागीय अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. प्रत्यक्ष काम करणारी यंत्रणा उदा. उपविभागीय अधिकारी, उपविभागीय कृषी अधिकारी, तहसीलदार, गटविकास अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, मंडळ अधिकारी, तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक, ग्रामसंपर्क अधिकारी यांच्यावर सदर मोहिमेचे नियोजन करण्याची जबाबदारी राहणार आहे.
            तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक हे त्यांच्या गावातील त्यांना ज्ञात असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून कोणत्या तारखेस गावात मोहिम राबविण्यात येणार आहे, याबाबतची माहिती देणार आहे. तसेच तलाठी, ग्रामसेवक, कृषी सहाय्यक यांनी त्यांच्या गावातील दोन दिवसीय कामाचे योग्य ते नियेाजन करुन याकरीता स्थानिक लोकप्रतिनिधी, समाजसेवक, ज्येष्ठ नागरिक, बचत गट, युवक संघ, ग्रामस्थ, विद्यार्थी यांना सहभागी करुन घ्यावे.
            सदर मोहिमेच्या कालावधीत तालुका संपर्क अधिकारी व इतर सर्व वरिष्ठ अधिकारी त्यांच्या कार्यक्षेत्रातील काही गावांना भेटी देवून मोहिमेची पाहणी करणार आहेत. तसेच ज्या अधिकारी / कर्मचाऱ्यांचे जन्मगाव या विभागात नाही, त्यांनी या विभागातील त्यांच्या नातेवाईकांच्या, मित्रांच्या किंवा सहकारी अधिकारी / कर्मचाऱ्यांच्या गावात जावुन मोहिमेत सहभागी व्हावे. तर शहरी भागात जन्मगाव असलेल्या अधिकारी / कर्मचाऱ्यांनी त्यांच्या शहरातील त्यांच्या प्रभागात (वॉर्डात) मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.
           

*****  

No comments: