03 May, 2017

जलयुक्त शिवार अभियान आणि मागेल त्याला शेततळे योजनेतील कामे पूर्ण करा

-विभागीय आयुक्त श्री.पुरोषोत्तम भापकर
हिंगोली, दि.3: जिल्ह्यात  जलयुक्त शिवार अभियानाची कामे आणि मागेल त्याला शेततळे या योजने अंतर्गत करण्यात येणारी कामे योग्य नियोजन करुन वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश मराठवाडा विभागाचे विभागीय आयुक्त डॉ.  पुरोषोत्तम भापकर यांनी दिले.
मराठवाडा विकासात्मक विविध विकास कार्यक्रम विशेष मोहिम स्वरुपात राबविण्याबाबत येथील नगर परिषदेच्या कल्याण मंडपम्म येथे आयोजित करण्यात आलेल्या जिल्ह्यातील महसूल, सिंचन, कृषी, पंचायत या विभागातील ग्रामस्तर ते जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या आयोजित आढावा बैठक तथा कार्यशाळेत डॉ. भापकर हे बोलत होते. यावेळी सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, संतोष टारफे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अप्पर आयुक्त फड आणि सहाय्यक आयुक्त दिलीप हाके  यांची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी डॉ. भापकर म्हणाले की, मागेल त्याला शेततळे योजनेतंर्गत शेततळे उपलब्ध करुन देण्यासाठी प्रत्येक गावात कँम्प आयोजित करावेत. तसेच सदर कँम्प आयोजित करुन एकाच दिवशी अर्ज घेणे व त्याबाबत कार्यवाहीची पूर्तता करावी. तसेच शेतकऱ्यांना फळबाग लागवडीसाठी प्रोत्साहीत करण्यात यावे. मनरेगा योजनेचे स्वरुप पूर्णत: बदलले असून, मागेल त्याला काम या योजनेमार्फत कामे देण्यात येणार आहेत. मनरेगा अंतर्गत होणारी सर्व कामे ग्रामसेवक ते उपजिल्हाधिकारी स्तरीय सर्वच अधिकारी व कर्मचारी यांनी योग्य नियोजन करुन, 100 टक्के उद्दिष्ट पूर्ण करावे. ज्या ठिकाणी ग्रामसभा झालेल्या नसतील, त्याठिकाणी ग्रामसभेचे आयोजन करुन शासनाच्या कल्याणकारी योजना गावा-गावात पोहचविण्याचा प्रयत्न करावा. जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी तसेच तालुका कृषी अधिकारी, कृषी सहाय्यक तसेच अधिकारी-कर्मचारी यांनी लोकप्रतीनीधी तसेच नागरिक यांच्याशी समन्वय ठेवून कामाचे नियोजन करीत दर्जेदार कामे वेळेत पूर्ण करावीत.
तसेच रोजगार हमी योजनेच्या कामात गती वाढविण्याचे सांगून जलयुक्त शिवार अभियानातून मराठवाड्याच्या पाण्याचा प्रश्न मिटविण्यास मदत होत आहे. तसेच जलयुक्त शिवार अभियानातंर्गची आणि मागेल त्याला शेततळे या योजनेतंर्गतची सर्व काम 31 मे पर्यंत पूर्ण करावीत. स्वच्छ महाराष्ट्र अभियाना अंतर्गत हागणदारीमुक्तीच्या उद्दिष्टपूर्ती करण्याच्या दृष्टीने प्रयत्न करण्याच्या सूचना ही डॉ. भापकर यांनी यावेळी दिल्या.

भविष्यात तीन हजार शेततळे निर्माण करुन शेतकऱ्यांना शेतीसोबत अतिरिक्त उत्पादन करण्यासाठी मागेल त्याला शेततळेतंर्गत ज्या शेततळ्यात तीन महिन्यापेक्षा जास्त किंवा सहा महिन्यांपर्यंत पाणी टिकून राहते अशा शेतकऱ्यांना मत्स्यबोटकली देण्यात येईल. या व्यवसायापासून किमान एका महिन्याला एका शेतकऱ्यास वीस ते पंचवीस हजार रुपये उत्पन्नमिळण्याचीही अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच प्रशासनाने नैसर्गिक आपत्ती मध्ये सुध्दा मदतीसाठी कटिबध्द राहण्याचेही आवाहन त्यांनी यावेळी केले. कृषी विभागाने जिल्ह्यात मोठ्याप्रमाणावर फळबाग शेती लागवड करण्याबाबत विशेष  कार्यक्रम राबविण्यात यावा. असेही डॉ. भापकर यावेळी म्हणाले.
यावेळी विविध विभागाचे विभाग प्रमुख, ग्रामसेवक, तलाठी, तालुका कृषि अधिकारी, कृषी सहाय्यक यांच्याशी  विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांनी मुक्तपणे संवाद साधून विविध विषयावर मार्गदर्शन केले. तसेच त्यांच्या अडचणींचीही सोडवणूक केली असून सर्वांनी आता जोमाने कामाला लागावेत, असेही त्यांनी सांगितले.
तसेच ग्रामपंचायत यंत्रणांचा सहभाग वाढवून महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेच्या मजूरीचे प्रदान विहीत कालावधीत करावेत. सदर प्रदाने बँक / पोस्ट ऑफिसमध्ये आधारद्वारे अदा करण्यात येणार आहे. योजनेत परिवर्तन करण्यासाठी वैयक्तिक लाभांच्या योजनावर भर व प्रत्येकाला रोजगाराची हमी , जॉबकार्ड वितरण व नुतणीकरण याबाबतही त्यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
यावेळी सहाय्यक आयुक्त दिलीप हाके म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना तुती लागवडीसाठी प्रोत्साहीत करुन त्यांना कशाप्रकारे  देता येईल यासाठी प्रयत्न करण्याची आवश्कता आहे.  
जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय नागरी उपजिविका अभियान, स्वच्छ भारत मिशन, वृक्षारोपन, 7/12 संगणकीकरण, स्वस्त धान्य दुकानाच्या ई-पॉज मशिन व ईपीडीएस याबाबत यावेळी डॉ. भापकर यांनी सविस्तर आढावा घेवून मार्गदर्शन केले
कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील यांनी केले तर आभार अप्पर आयुक्त विजयकुमार यांनी मानले.
यावेळी जिपचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. देशमुख, ग्रामीण विकास यंत्रणेचे नईम कुरेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, तहसीलदार विजय अवधाने, तहसीलदार डॉ. प्रतिभा गोरे, तहसीलदार श्रीमती वैशाली पाटील, तहसीलदार उमाकांत पारधी, तहसीलदार श्याम मदनुरकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पा. व स्व.) श्रीमती दिपाली कोतवाल, मुख्याधिकारी रामदास पाटील तसेच जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी, नायब तहसीलदार, ग्रामसेवक, तलाठी, मंडळ अधिकारी आदि विविध विभागाचे अधिकारी / कर्मचारी आदिंची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
****










 

No comments: