15 May, 2017

आपत्कालीन परिस्थितीत समन्वय ठेवून काम करावे
--- जिल्हाधिकारी अनिल भंडारी
        हिंगोली, दि. 15 :- जिल्ह्यातील सर्व शासकीय विभागांनी संभाव्य आपत्तीची परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी परस्परांत योग्य समन्वय ठेवून कार्यक्षमपणे काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात मान्सूनपूर्व आढावा बैठक आणि नैसर्गिक आपत्तीमुळे होणारी हानी कमी करण्याच्या दृष्टीने व योग्य प्रतिसाद योजनेची पूर्व तयारीबाबत आयोजित करण्यात आलेल्या बैठकित ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारीअधिकारी डॉ.एच.पी. तुम्मोड, निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी विवेक काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, औंढा तहसीलदार श्याम मदनुरकर, कळमनुरी तहसीलदार श्रीमती प्रतिभा गोरे, सेनगाव तहसीलदार वैशाली पाटील,जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. आकाश कुलकर्णी, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. जी.बी. जोगदंड, वरिष्ठ भुवैज्ञानिक सी.डी. चव्हाण, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभाग क्र. 4 जे. डी. सर्वे , जिल्ह्यातील सर्व गटविकास अधिकारी तसेच विविध विभागाचे विभाग प्रमुख आदींची यावेळी उपस्थिती होती.
                जिल्हाधिकारी अनिल भंडारी म्हणाले की, हिंगोली जिल्ह्यातील तालुकानिहाय पुर प्रवण गावांची माहिती एकत्रित करुन त्याबाबतचा आराखडा तयार करावा व संभाव्य काळात चांगला पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळालावधीमध्ये आपत्तीमध्ये तातडीने माहिती उपलब्ध होणे व त्यावर कार्यवाही करणे या बाबींना अधिक महत्व असणार आहे. त्यासाठी आवश्यक असणाऱ्या दळणवळणाच्या सुविधा कार्यान्वित करण्यात याव्यात. तसेच मनुष्यबळ व पुर परिस्थितीत आवश्यक साधन सामग्री सज्ज ठेवण्यात यावी. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या काळात काय करावे व काय करु नये याबाबतही मार्गदर्शन करण्यात यावे. स्वंयसेवी संस्था, मंडळे प्रशिक्षित करुन त्यांचीही या कामात मदत घेण्यात यावी. नैसर्गिक आपत्तीच्या बाबतीत तहसील कार्यालयाच्या तसेच इतर कार्यालयाच्या परिसरात घडीपत्रके व पोस्टर्स ठळक स्वरुपात लावण्यात यावेत. व त्याबाबत जनजागृती करण्यात यावी.
तालुकास्तरावर नियंत्रण कक्षाची 24 तास कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. तालुक्यातील विविध विभागामध्ये समन्वय राखणे जेणेकरुन सक्षमपणे आपत्तींचा प्रतिसाद देता येऊ शकेल. शोध व बचाव पथक व तालुका आपत्ती व्यवस्थापन समिती गठीत करुन त्यांची माहिती तात्काळ कार्यालयास सादर करण्यात यावी. तालुका व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात यावा, अशा सुचना सर्व तहसीलदार यांना जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी केल्या.
नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन केंद्राचा दुरध्वनी क्रमांक

                तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातंर्गत टंचाई परिस्थितीच्या अनुषंगाने व नैसर्गिक आपत्तीमध्ये मदतीसाठी जिल्हा प्रशासनाच्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापन कक्षास सपंर्क साधावा. दुरध्वनी क्रमांक 02456-222560 असा आहे.  
भ्रमणध्वनी दुरध्वनी पुस्तिकेचे विमोचन
जिल्ह्यातील महत्वाच्या अधिकारी / कर्मचारी यांचे भ्रमणध्वनी / दुरध्वनी पुस्तिकेचे व आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शिका पुस्तिकेच जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी सदरकरणाद्वारे जिल्ह्यातील मान्सुनपूर्व करावयाच्या तयारीबाबत सादरीकरण केले.
या बैठकीस जिल्हय़ातील सर्व  विभाग प्रमुखांची उपस्थिती होती. यावेळी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी रोहीत कंजे यांनी आभार मानले.   
****


 

No comments: