18 August, 2025
तोष्णीवाल महाविद्यालयात गुरुवारी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व सेनगाव येथील तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली जिल्ह्यातील नोकरी इच्छूक उमेदवारांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होण्याच्या दृष्टिने गुरुवार (दि. 21) रोजी तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे.
या रोजगार मेळाव्यात एस.के. सेप्टी विंग्स (पि) लिमिटेड (के.एल.ग्रुप/ॲमेझान) हैद्राबाद, आर्मस इंडिया प्रा.लि. वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, व्हेरॉक इंजिनअरींग लि. छत्रपती संभाजीनगर, नम्र फायनान्स लिमिटेड नाशिक, सुप्रीम इंडस्ट्रीज प्रा.लि.जळगाव, स्वतंत्र मायक्रो फायनान्स हिंगोली/वाशिम, मुथ्थुट फायनान्स हिंगोली, चैतन्या इंडिया फिन क्रिडेट लिमिटेड प्रा.लि.हिंगोली/कळमनुरी/सेनगाव, ग्लोबल पब्लीक स्कूल पिंपळखुटा हिंगोली, चंद्रा इलेक्ट्रीकल्स ॲन्ड इलेक्ट्रॉनिक्स वाळूज एमआयडीसी छत्रपती संभाजीनगर, भारतीय जीवन विमा निगम हिंगोली अशा महाराष्ट्रातील नामांकित कंपन्या व हिंगोली जिल्ह्यातील शासनाचे विविध महामंडळ रोजगार मेळाव्यात सहभागी होणार आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवीधर या शैक्षणिक अर्हतेनुसार 250 पेक्षा अधिक रिक्त पदे https://rojgar.mahaswyam.gov.in व www.ncs.gov.in या संकेतस्थळावर अधिसूचित केली आहेत. आपल्या शैक्षणिक पात्रतेनुसार पदांची खात्री करून ऑनलाईन अर्ज करून स्वत: मूळ कागदपत्रांसह तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव येथे गुरुवार, (दि. 21) रोजी सकाळी 10 वाजता स्वखर्चाने उपस्थित राहावे. याबाबत काही अडचण आल्यास 02456-224574 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सहायक आयुक्त बा. सु. मरे यांनी केले आहे.
******
हिंगोली जिल्ह्यात सरासरी 27 मिमी पाऊस
हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.5 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त 35 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी 14.1 मि.मी. पाऊस पडला आहे.
जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 32.2 (554.3), कळमनुरी 29.1 (689.2), वसमत 14.1 (645.4), औंढा नागनाथ 23.9 (645.2) आणि सेनगाव तालुक्यात 35 (560.6) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे.
हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2025 ते 18 ऑगस्ट, 2025 पर्यंत सरासरी 615.8 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 114.1 अशी आहे.
******
17 August, 2025
ग्रामीण रस्ते व पुल तात्काळ पूर्ववत करण्याबाबत तहसीलदाराच्या कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना सूचना
हिंगोली, दि.17 (जिमाका) : औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांनी आज जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता (बांधकाम) यांना आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 नुसार अतिवृष्टीमुळे झालेल्या रस्त्यांची व पुलांची दुरुस्ती करण्याबाबतच्या सूचना केल्या.
त्या अनुषंगाने औंढा नागनाथ तालुक्यात 16 ऑगस्ट रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे काही रस्ते व पुल नादुरुस्त झाले आहेत. वाहतुकीस अयोग्य झाले आहेत. दुरुस्ती न करता या रस्त्याचा वापर केल्यास अपघात होण्याची शक्याता नाकारता येत नाही. त्यामुळे
औंढा नागनाथ ते देरगाव, रांजाळा ते वडद, येहळेगाव ते निशाना, असोला तर्फे लाख ते लक्ष्मण नाईक तांडा या गावांचे संपर्क प्रस्थापित करण्यासाठी व अपघात टाळण्यासाठी आपल्या अधिनस्त सर्व रस्ते व पुलांचे सर्वेक्षण तात्काळ करुन हे रस्ते व पूल नागरिकांना वापरण्यासाठी पूर्ववत करण्याचे सांगितले आहे.
******
विशेष लेख - गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मिळणारी मदत मोलाची
मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात यावे लागत असे. नागरिकांना या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, नागरिकांचा त्रास वाचण्यासाठी व त्यांना वेळेत मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.01 मे 2025 पासून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन केले आहेत.
यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यातच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सहज उपलब्ध, संलग्न रुग्णालयाची यादी, अर्ज आणि पाठपुराव्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही तसेच अर्ज स्वीकृती व सद्यस्थिती याची माहिती पुरवली जाणार आहे.
जिल्ह्यात या योजनेचा अनेक गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यातील एका लाभार्थ्याचे भाऊ संजय पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया….
माझे भाऊ हिरालाल सुभाष पवार, रा. खंडाळा, ता. हिंगोली, जि. हिंगोली, हा गोरेगाव येते राहत होता. त्यांना व्यवसायासाठी दुचाकीवर प्रवास करत असतांना अपघात झाल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्यामुळे नांदेड येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना यशोसाई हॉस्पिटल येथे तातडीने दाखल करण्यात आले. या गंभीर परिस्थितीत आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे आम्ही चिंतेत होतो. तेव्हा आम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेबद्दल कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार आम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांसह हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. यामध्ये आम्हाला या योजनेअंतर्गत 40 हजार रुपये आर्थिक मदत प्राप्त झाली.
या मदतीमुळे आम्हाला उपचार सुरू ठेवणे शक्य झाले आणि माझ्या भावाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे मी व माझा संपूर्ण परिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच आमदार तानाजी मुटकुळे यांनीही याबाबत पाठपुरावा करुन मदत मिळवून दिल्यामुळे त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो. आपण गरजू रुग्णांसाठी सुरु केलेली ही योजना आमच्यासारख्या अनेक कुटुंबासाठी खूपच मोलाची असल्याचे रुग्णांचे भाऊ संजय पवार यांनी यावेळी सांगितले.
संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली
*****
16 August, 2025
ईसापूर धरणातून पाण्याचा विसर्ग सोडणार; नदीकाठच्या गावातील नागरिकांनी पात्रात उतरू नये
हिंगोली, दि.१६ (जिमाका) आज पहाटे तीन वाजल्यापासून ईसापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार स्वरुपात पाऊस सुरू आहे. त्यामुळे धरणाच्या वरील बाजूस असलेल्या जयपूर बंधा-याच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. त्यानुषंगाने येणारा येवा लक्षात घेऊन १६ ते ३१ ऑगस्ट २०२५ साठी मंजूर द्वार प्रचालनानुसार धरण पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याच्या दृष्टीने अतिरिक्त पाणी ईसापूर धरणाच्या सांडव्याची वक्र द्वारे आज, शनिवार, (दि.१६) रोजी सकाळी ९ वाजता उघडून पैनगंगा नदी पात्रात सोडण्यात येणार आहे.तरी पैनगंगा नदीकाठच्या गावातील नागरिकांनी नदी पात्रात न उतरण्याचे आवाहन ईसापूर धरण पूरनियंत्रण कक्षाकडून कळविण्यात आले आहे.
*****
15 August, 2025
आता हवी ती शासकीय कागदपत्रे मागवा आपल्या घरी
• हिंगोलीत सेवादूत प्रणालीतून 'शासन आपल्या दारी' उपक्रमास पालकमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
• पालकमंत्री श्री झिरवाळ यांच्याकडून जिल्हाधिकाऱ्यांचे विशेष कौतुक
• राज्यात सेवादूत उपक्रम राबविणार
• व्हॉट्स अँप चँट बोट्सवर ऑनलाईन करा अर्ज
• कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध
• नागरिकांचा वाचणार वेळ
हिंगोली (जिमाका), दि.15 : जिल्ह्यातील नागरिक व्हॉट्स अँप टेक्नोसेव्ही झाल्यामुळे त्यांना बदलत्या काळानुसार ऑनलाईन घरपोच सेवा मिळवून देण्यासाठी 'सेवादूत हिंगोली' प्रणाली व व्हॉटस्अप चॅटबोटच्या माध्यमातून शासन आपल्या दारी या अनोख्या उपक्रमाचा प्रारंभ पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित कार्यक्रमात झाला.
यावेळी व्यासपीठावर सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना उपस्थित होते.
राज्यात प्रथमच अनोख्या पद्धतीने घरबसल्या ऑनलाईनरित्या नागरिकांना सेवा पुरविण्यात येत असून, सद्यस्थितीत जिल्हा प्रशासनातील 13 विभागाच्या सेवा या प्रणालीतून पुरविण्यात येत आहेत. ही सेवा व्हॉट्स अँप व संकेतस्थळावर उपलब्ध असून, टप्प्याटप्प्याने सर्वच सेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाने दोन मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींची सेवा घेतल्याचे ते म्हणाले.
हिंगोली जिल्हा प्रशासनाने सेवादूत प्रणालीतून 'शासन आपल्या दारी' उपक्रमास पालकमंत्र्यांच्या हस्ते सुरुवात केली. हा उपक्रम सुरु केल्याबद्दल पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांचे विशेष कौतुक करत अन्न व औषध प्रशासन विभागाच्या सेवाही तात्काळ ऑनलाईन सुरु करण्याच्या सूचना दिल्या. तसेच सेवादूत उपक्रम राज्यातील इतरही जिल्ह्यात राबविणार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
ही सेवा व्हॉट्स अँप चँट बोट्स (9403559494) आणि संकेतस्थळावरही सुरू असून, नागरिकांना ऑनलाईन अर्ज करून कागदपत्रांसाठी आवश्यक पुराव्यांचीही माहिती एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. त्यामुळे अर्जदाराचा वेळ आणि पैसा वाचणार असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी सांगितले.
या उपक्रमाच्या माध्यमातून अर्जदार नागरिकांना हवी असलेली सेवा, लागणारी आवश्यक कागदपत्रे, ती सादर करण्यासाठी अपॉईंटमेंट घेण्याची वेळ आणि सेवा पुरविण्यासाठी शासनाने निर्धारित केलेले शुल्क याची माहितीही मिळणार असून ही माहिती भरल्यानंतर नोंदणीकृत आपले सरकार सेवा केंद्र चालक आपल्याला फोन करून आपण निवडलेल्या वेळेस व दिवशी आपल्या घरी येऊन आपण निवडलेल्या सेवेसाठी सर्व प्रक्रिया आपल्या घरीच पूर्ण करून घेतील तसेच निवडलेल्या सेवेसाठी लागणाऱ्या शुल्काची आणि कागदपत्रांची माहिती सुद्धा आपल्याला नोंदणी करत असतानाच मिळणार आहे. तेवढेच शुल्क आपणास आपल्या घरी येणाऱ्या आपले सरकार सेवा केंद्र धारकाला द्यावयाचे आहे. त्याचप्रमाणे आपण निवडलेली प्रमाणपत्रे शासनाच्या नियमानुसार तयार झाल्यानंतर आपल्या घरी तोच आपले सरकार सेवा केंद्राधारक घरपोच आणून देणार असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांना सांगितले.
तक्रार प्रणालीही आता व्हॉट्स अँप
'सेवादूत हिंगोली' या उपक्रमाप्रमाणेच अर्जदार नागरिकांच्या तक्रारींचे जलद निवारण, प्रशासनातील विश्वास व पारदर्शकता वाढवणे तसेच हिंगोलीला तक्रारमुक्त जिल्हा बनविण्यासाठी व्हॉटस्अप बेस तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. यासाठी 8545088545 हा व्हॉट्सअप क्रमांक विकसित करण्यात आला आहे. ही प्रणाली आजपासून सुरु होणार आहे.
या प्रणालीवर नागरिकांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अधिकृत व्हॉट्सॲप क्रमांकावर "Hi" असा मेसेज पाठवायचा. त्यानंतर तुमच्यासमोर एक मेनू येईल, ज्यात तक्रार नोंदविण्याचा पर्याय असेल. तुम्ही ज्या खात्याबाबत तक्रार करीत आहात ती निवडून तक्रारीचे तपशील, फोटो किंवा कागदपत्रे असल्यास ती अपलोड करता येतील. तक्रार आपोआप संबंधित विभागाकडे पाठवली जाईल. आठ दिवसांच्या आत समस्येवर कारवाई करून त्याचा अहवाल तुम्हाला व्हॉट्सॲपवर मिळणार आहे. कुठूनही, कधीही तक्रार नोंदवण्याची सुविधा असल्यामुळे वेळ आणि प्रवासाचा खर्च वाचतो. पारदर्शक प्रक्रिया असून प्रत्येक टप्प्याची माहिती व्हॉट्सॲपवर तक्रार क्रमांक (ट्रैकिंग आयडी) मिळतो, ज्यामुळे प्रगती पाहता येते. यामुळे शासन व नागरिक यांच्यात थेट संवाद साधता येणार आहे.
से टू हाय कलेक्टर - लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन
केसेसची संभाव्य सुनावणीची वेळ पक्षकार तसेच वकिलांना उपलब्ध होऊन त्यांच्या वेळेचे योग्य नियोजन करता यावे यासाठी जिल्हा प्रशासनामार्फत से टू हाय कलेक्टर-ईक्यूजे कोर्ट लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन तयार करण्यात आले आहे. या माध्यमातून केसच्या आदल्या दिवशी सायंकाळी 6.30 वाजता केसेसचा बोर्ड सॉफ्टवेअर व मोबाईल अप्लिकेशनवर उपलब्ध होणार आहे. या सॉफ्टवेअर व मोबाईल अप्लिकेशन हिंगोली जिल्ह्यातील जिल्हाधिकारी कार्यालय, अपर जिल्हाधिकारी कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, तहसील व मंडळ अधिकारी कार्यालयाकडून वापरण्यात येणार आहे. यामध्ये महसूल अर्धन्यायिक, राष्ट्रीय महामार्ग लवाद, पुरवठा विभाग, सरफेशी (बॅकेशी निगडीत प्रकरणे), राज्य उत्पादन शुल्क इत्यादी विभागांची प्रकरणे हाताळली जाणार आहेत.
*****
कल्याणकारी योजना सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध - पालकमंत्री
• स्वातंत्र्य दिनाचा मुख्य शासकीय ध्वजारोहण पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते उत्साहात
• निर्भया पथक व अँनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्र्यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ
• स्वातंत्र्यदिनानिमित्त तंबाखू मुक्त व अवयवदाची घेतली शपथ
हिंगोली (जिमाका), दि.15: सर्वसामान्यांच्या हितासाठी शासन अनेक महत्त्वपूर्ण योजना राबवित आहे. याचा लाभ सर्वसामान्य नागरिकापर्यंत पोहोचविण्यासाठी शासन कटिबद्ध असून नवभारताचे स्वप्न साकारण्यासाठी भारतमातेची एकजुटीने सेवा करुयात, असे प्रतिपादन राज्याचे अन्न व औषध प्रशासन, विशेष सहाय्य मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी यावेळी केले.
भारताच्या 79 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. त्यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ बोलत होते.
यावेळी मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे हळद संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष आमदार हेमंत पाटील, आमदार सर्वश्री. तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू उर्फ चंद्रकांत नवघरे, सर्वश्री माजी आमदार गजानन घुगे, रामराव वडकुते, संतोष टारपे, जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, सहायक जिल्हाधिकारी योगेश मीना, अपर पोलीस अधीक्षक कमलेश मीना, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह विभागप्रमुख, अधिकारी -कर्मचारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार राज्यातील औंढा नागनाथसह पाच ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांची प्रभावी आणि वेगाने अंमलबजावणी व्हावी, यासाठी पाच वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा हिंगोलीच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांची नियुक्त करण्यात आल्या असून, या कामांचा अहवाल मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांना सादर करतील. औंढा नागनाथ ज्योतिर्लिंगाचा विकास आराखडा 15 कोटी रुपयांचा आहे. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील विविध कामांना गती मिळावी, ही कामे दर्जेदार आणि गतीने व्हावीत, यासाठी मंत्रालयीन स्तरावरून समन्वय, संनियंत्रणासाठी अधिकारी नियुक्तीचा निर्णय पहिल्यांदाच घेण्यात आला असल्याचे सांगून यावर्षीही जिल्ह्यात “हर घर तिरंगा”हे अभियान राबविण्यात आले असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
"सेवादूत हिंगोली" ही वेब प्रणाली तसेच व्हाटस् अप चाटबोटच्या माध्यमातून नागरिकांना शासनाची हवी असलेली योजना, विविध कागदपत्रे सुलभरित्या घरपोच मिळणार आहे. तसेच लाईव्हबोर्ड सॉफ्टवेअर आणि मोबाईल अप्लिकेशन, से टू हाय- व्हॉटस्अप (8545 08 8545) बेस तक्रार निवारण प्रणाली विकसित केली आहे. ही सेवा नागरिकांच्या समस्या जलद, पारदर्शक आणि सोयीस्कर पद्धतीने सोडविण्यात उपयोगात येणार असल्याचे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.
तसेच यावेळी नानाजी देशमुख कृषि संजीवनी प्रकल्प टप्पा-2, प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना, कृषी यांत्रिकीकरणाच्या विविध योजनेंतर्गत शेतकऱ्यांना कृषी व कृषीपूरक व्यवसायासाठी आवश्यक असणारी औजारे, एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान योजना, प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना, डॉ.पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनाचा लाभ जिल्ह्यातील लाभार्थ्यांना देण्यात आल्याची माहिती दिली. तसेच मा. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे (हळद) हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत हळदीच्या आधुनिक वाणाचे संशोधन व विस्ताराचे कार्य केंद्राच्या माध्यमातून तज्ज्ञांनी केलेल्या प्रयत्नामुळे ‘वसमत हळद’या नावाने हिंगोलीच्या हळदीला भौगोलिक मानांकनाचा दर्जा मिळाला आहे.
हिंगोली येथे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कार्यान्वित झाले असून 100 विद्यार्थ्यांनी प्रवेशसुद्धा घेतल्याचे सांगितले. जिल्हा रुग्णालयात लवकरच हृदयरोग उपचारासाठी “कॅथ लॅब” कार्यान्वित होणार आहे. तसेच क्रिटिकल केअर ब्लॉक तसेच स्त्री रुग्णालय लवकरच रुग्णसेवेत सुरु होईल, असे सांगून गंभीर रुग्णांच्या अचूक निदानासाठी लवकरच एमआरआय सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचे पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी यावेळी सांगितले.
जिल्हा रुग्णालयातील बालरोग विभागातील विभागासाठी “मुस्कान प्रमाणपत्र”मिळवणारा हिंगोली पहिला जिल्हा ठरला आहे. तर पोषण व पुनर्वसन केंद्र, बालरोग विभागास राज्य स्तरावरील द्वितीय पारितोषिक प्राप्त झाले आहे. या केंद्रामुळे कुपोषित बालकास लाभ मिळणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
मागील वर्षी नैसर्गिक आपत्तीच्या नुकसानीपोटी डीबीटीद्वारे 333 कोटी 15 लक्ष वाटप तर चालू वर्षी जवळपास 4 कोटी रुपयाचा निधी वितरणाची कार्यवाही सुरु असल्याचे त्यांनी सांगितले.
सामाजिक न्याय व विशेष सहाय्य योजनेंतर्गत हिंगोली जिल्ह्यात विविध योजना गरजू व पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येत आहेत. शासकीय वसतीगृह, निवासी शाळा, स्वाधार योजना, रमाई आवास घरकुल योजनांचीही माहिती त्यांनी दिली.
शेतकऱ्यांना अखंडीत वीज पुरवठा करण्यासाठी पंतप्रधान कुसूम योजना व मागेल त्याला सौरकृषी पंप योजना, मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना 2.0, प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना, 33/11 केव्ही उपकेंद्राच्या देण्यात आलेल्या लाभाचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयामार्फत ई-साक्ष चा वापर ग्रामीण भागात फक्त हिंगोली जिल्ह्यामध्ये यशस्वीरित्या राबविल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
आपला जिल्हा, राज्य आणि देशासमोर अनेक समस्या एकजुटीने सोडविण्याला प्राधान्य असल्याचे पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांनी आपल्या शुभेच्छा संदेशपर भाषणातून सांगितले.
पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्या हस्ते विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल पुरस्कार प्रदान करण्यात आले. त्यामध्ये नक्षलग्रस्त भागात विशेष कामगिरी केल्याबद्दल वसमत ग्रामीण पोलीस स्टेनशनचे पोलीस उपनिरीक्षक एकनाथ डक, सायबर सेलचे पोलीस अंमलदार दत्तात्रय नागरे यांना सेवा पदक तसेच सहायक पोलीस निरीक्षक शिवसांब घेवारे, दिलीप मोरे, माधव जिव्हारे, रविकिरण खंडारे यांचा सन्मान करण्यात आला. 100 दिवसाच्या मोहिमेत दुसऱ्या टप्प्यातील मूल्यमापनात राज्यात तृतीय क्रमांक मिळविल्याबद्दल जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, प्रथम क्रमांक मिळविलेल्या उप अभियंता एम. एस. देशमुख, सहायक निबंधक सहकारी संस्था श्री. कलटेवाड, वसमत तालुका क्रीडा अधिकारी निलकंठ श्रावण, तृतीय क्रमांक मिळविलेल्या वसमत पंचायत समितीचे प्रफुल्ल तोटेवाड, कुरुंदा पोलीस स्टेशनचे रामदास निरदोडे, वसमत पशुधन विकास अधिकारी संजय सावंत, उर्ध्व पैनगंगा प्रकल्प विभागाचे उपअभियंता शेख सलीम, कळमनुरी यांचा प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच अबॅकस राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विक्रम करणाऱ्या विद्यार्थी, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानात सन 2023-24 या वर्षात उत्कृष्ट काम केलेल्या घोटा, बोरी सावंत, दाताडा खु. या ग्रामपंचायतीस अनुक्रमे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक मिळाल्याबद्दल प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. किडनी व नेत्रदान केलेल्या अवयतदात्यांचाही यावेळी पालकमंत्री श्री. झिरवाळ यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला. तसेच पूर्व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात गुणवत्ता यादीत आलेल्या विद्यार्थी व पालकांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. प्रधानमंत्री आवास योजना व राज्य पुरस्कृत आवास योजना ग्रामीणचा जिल्हास्तरीय पुरस्काराचे वितरणही यावेळी करण्यात आले.
यावेळी पोलीस विभागातर्फे दाखल झालेल्या निर्भया पथकाला तसेच देसाई फाऊंडेशन ट्रस्ट व उगम ग्रामीण विकास संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या अँनिमियामुक्त हिंगोली अभियान जनजागृती रथाला पालकमंत्री श्री. झिरवाळ यांनी हिरवी झेंडी दाखवून शुभारंभ केला. तसेच यावेळी पालकमंत्री यांच्या उपस्थितीत तंबाखू मुक्त व अवयवदाची शपथ देण्यात आली.
देशसेवेसाठी हौतात्म्य पत्करलेल्या शहिदांच्या वीर पिता, वीर माता, वीर पत्नी यांचा सन्मान करण्यात आला. यावेळी विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थिनी आणि नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
*****
Subscribe to:
Posts (Atom)









