17 August, 2025

विशेष लेख - गरजू रुग्णांना मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाकडून मिळणारी मदत मोलाची

मुख्यमंत्री कार्यालयातील मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षाकडून अनेक दुर्धर आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरिता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत अर्थिक सहाय्य देण्यात येते. या अनुषंगाने मदत मिळविण्यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षामध्ये असंख्य अर्ज प्राप्त होतात. या अर्जाचा पाठपुरावा करण्यासाठी रुग्ण व त्यांचे नातेवाईक मंत्रालयात यावे लागत असे. नागरिकांना या सेवा सहजपणे उपलब्ध व्हाव्यात, नागरिकांचा त्रास वाचण्यासाठी व त्यांना वेळेत मदत मिळण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून दि.01 मे 2025 पासून प्रत्येक जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मुख्यमंत्री सहाय्यता कक्ष स्थापन केले आहेत. यामुळे राज्यातील गरजू रुग्णांना उपचारासाठी प्रत्येक जिल्ह्यातच जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे आणि माहिती सहज उपलब्ध, संलग्न रुग्णालयाची यादी, अर्ज आणि पाठपुराव्यासाठी मंत्रालयात जाण्याची गरज नाही तसेच अर्ज स्वीकृती व सद्यस्थिती याची माहिती पुरवली जाणार आहे. जिल्ह्यात या योजनेचा अनेक गरजू लाभार्थ्यांनी लाभ घेतला असून त्यातील एका लाभार्थ्याचे भाऊ संजय पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया…. माझे भाऊ हिरालाल सुभाष पवार, रा. खंडाळा, ता. हिंगोली, जि. हिंगोली, हा गोरेगाव येते राहत होता. त्यांना व्यवसायासाठी दुचाकीवर प्रवास करत असतांना अपघात झाल्यामुळे त्यांच्या डोक्याला मार लागला होता. त्यांना येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी नेले असता तेथील डॉक्टरांनी सीटी स्कॅन केले. त्यांच्या डोक्याला मार लागला असल्यामुळे नांदेड येथे उपचारासाठी नेण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना यशोसाई हॉस्पिटल येथे तातडीने दाखल करण्यात आले. या गंभीर परिस्थितीत आमची आर्थिक परिस्थिती अत्यंत नाजूक असल्यामुळे आम्ही चिंतेत होतो. तेव्हा आम्हाला मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी योजनेबद्दल कर्मचाऱ्यांनी माहिती दिली. त्यानुसार आम्ही सर्व आवश्यक कागदपत्रांसह हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातील मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता कक्षाकडे आवश्यक कागदपत्रांसह अर्ज सादर केला. यामध्ये आम्हाला या योजनेअंतर्गत 40 हजार रुपये आर्थिक मदत प्राप्त झाली. या मदतीमुळे आम्हाला उपचार सुरू ठेवणे शक्य झाले आणि माझ्या भावाच्या प्रकृतीत सुधारणा झाली. त्यामुळे मी व माझा संपूर्ण परिवार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व कक्ष प्रमुख रामेश्वर नाईक यांचे मनःपूर्वक आभार मानतो. तसेच आमदार तानाजी मुटकुळे यांनीही याबाबत पाठपुरावा करुन मदत मिळवून दिल्यामुळे त्यांचेही मन:पूर्वक आभार मानतो. आपण गरजू रुग्णांसाठी सुरु केलेली ही योजना आमच्यासारख्या अनेक कुटुंबासाठी खूपच मोलाची असल्याचे रुग्णांचे भाऊ संजय पवार यांनी यावेळी सांगितले. संकलन : जिल्हा माहिती कार्यालय, हिंगोली *****

No comments: