26 August, 2025

निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• अनुकंपा नियुक्तीसाठी 29 ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन • तक्रार निवारण प्रणालीवरील प्राप्त तक्रारीचा तातडीने निपटारा करावा-जिल्हाधिकारी • महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करावा हिंगोली (जिमाका), दि. 26 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव आयपासवर अपलोड करुन तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले. जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे रमेश भडके यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते. जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव जीओ टॅगसह तात्काळ सादर करावेत. विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव वेळेत करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. दायित्वाचे प्रस्ताव आय-पास प्रणालीवर अपलोड करुन निधी मागणीसाठी तात्काळ सादर करावेत. इमारती व रस्त्याला युनिक आयडी देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी विविध विकास कामाचे जिओ टॅगसह प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले. यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. अनुकंपा नियुक्तीसाठी 29 ऑगस्ट रोजी विशेष शिबिराचे आयोजन अनुकंपा नियुक्तीसाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांसाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहे. यासाठी प्रतीक्षा यादीतील उमेदवारांना आवश्यक त्या शैक्षणिक कागदपत्रासह दि. 29 ऑगस्ट, 2025 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय येथे उपस्थित राहण्याबाबत संबंधित यंत्रणेने पत्राद्वारे सूचित करावे. उमेदवारांला पत्र वेळेत मिळेल याची दक्षता घ्यावी आणि त्याचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयास गुरुवारपर्यंत सादर करावा. तक्रार निवारण प्रणालीवरील प्राप्त तक्रारीचा तातडीने निपटारा करावा-जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी कार्यालयाने सर्वसामान्य नागरिकांसाठी तक्रारी निवारण प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या तक्रार निवारण प्रणालीवर प्राप्त तक्रारीचा निपटारा करण्यासाठी युजर आयडी, पासवर्ड व डॅशबोर्डची लिंक पाठविण्यात येणार आहे. सर्व विभाग प्रमुखांनी या प्रणालीवर प्राप्त तक्रारीचा तातडीने निपटारा करावा. याचा दरमहा आढावा घेण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी सांगितले. महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करावा महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करण्यासाठी महिला व बालविकास विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी, शिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी आणि आरबीएसकेच्या जिल्हा समन्वयकाकडून आढावा घेण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी गरोदर माता व बालकांना देण्यात येणारे उपचार, लसीकरण, त्यांना वाटप केलेले कार्ड याची गावनिहाय माहिती तसेच जिल्ह्यातील महिलांची एकूण संख्या याची अद्यावत एक्सेलशीट तयार करुन महिला सुदृढीकरण व बालक कुपोषण इंटीग्रेटेड डेटा विकसित करावा, अशा सूचना दिल्या. ***

No comments: