01 August, 2025

नवतंत्रज्ञानाच्या आधारे महसूल विभागाची कार्यक्षमता वाढविण्यावर प्रशासनाचा राहणार भर - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• अधिकारी -कर्मचा-यांचे सेवापुस्तक आता ऑनलाईन मिळणार • जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते महसूल सप्ताहास सुरुवात हिंगोली, दि. 01 (जिमाका): बदलत्या काळानुसार लोकहिताची कामे करताना महसूल विभागासमोर नवनवी आव्हाने उभी राहत आहेत. त्या आव्हानांवर मात करण्यासाठी नवतंत्रज्ञानाच्या आधारे महसूल विभागाची कार्यक्षमता वाढविण्यावर जिल्हा प्रशासनाने भर द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित महसूल दिनाच्या उद्घाटन कार्यक्रमात ते अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन करताना बोलत होते. व्यासपीठावर जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्हा पुरवठा अधिकारी आप्पासाहेब पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे आणि सहजिल्हा निबंधक तथा मुद्रांक जिल्हाधिकारी संजय सुंकवाड उपस्थित होते. महसूल दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी ‘महसूल विभागाच्या सर्व पातळ्यांवरील समित्यांमधून जिल्ह्याच्या प्रशासनात विश्वासार्हता निर्माण झाली असून, त्यामागे खात्यातील प्रत्येक अधिकाऱ्याची निष्ठा आणि सेवाभाव आहे.’ अशा शब्दांमध्ये महसूल खात्याच्या कार्यक्षमतेचे आणि नवोपक्रमांचे त्यांनी कौतुक करत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. प्रशासनाच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे हिंगोली जिल्हा ई-फेरफाराच्या नोंदी घेण्यात मराठवाडा विभागात प्रथम आला असून, यापुढेही महाराष्ट्रासाठी हिंगोली जिल्हा हा आदर्श जिल्हा ठरावा, यासाठी सर्वांनी एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन त्यांनी केले. महसूल विभागात सुरू असलेल्या माहिती तंत्रज्ञानाच्या नवनवीन बाबींचा वापर करून नवोपक्रमांवर भर द्यावा. सध्याची यंत्रणा मोबाईल-आधारित होत असताना महसूल सेवादेखील लाभार्थ्यांपर्यंत मोबाईलवर डिजिटली स्वरुपात पोहोचविण्याचे धोरण आवश्यक आहे. यामुळे नागरिकांना योजनांचा थेट व पारदर्शक लाभ मिळू शकेल, असेही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाने अधिकारी-कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक ऑनलाइन करण्याचा उपक्रम हाती घेतला असून, महसूल प्रशासनातील उपजिल्हाधिकारी ते गावपातळीवरील सर्व कर्मचाऱ्यांचे सेवा पुस्तक डिजीटल स्वरुपात जतन करण्यात येणार आहे. भूसंपादन, पुरवठा, प्रलंबित प्रकरणे व कोर्टाच्या नोंदी यांचे डिजिटल संग्रह तयार करण्याचे काम महसूल पातळीवर सुरू असून, ही प्रक्रिया भविष्यातील संदर्भांसाठी अत्यंत उपयुक्त ठरेल, असेही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले. शासनाच्या विविध योजना लाभार्थ्यांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांची यादी, लाभांची सद्यस्थिती व अपूर्ण सेवांचा मागोवा ठेवणारी यंत्रणा विकसित केली जात आहे. आपल्या विभागातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी हा कार्यक्षमतेचा आदर्श आहे. कामातील अनुभव व कर्तव्यनिष्ठा यामुळेच महसूल विभाग हा विश्वासाचा आधार बनला आहे, अशा शब्दांत जिल्हाधिकारी गुप्ता यांनी उपस्थितांचे मनोबल वाढविले. महसूल प्रशासन नागरिकांना अनेक सुविधा पुरवित आहे. त्यामुळे काळानुरुप आधुनिकतेची कास धरून शासनामार्फत नागरिकांना पुरविल्या जाणाऱ्या विविध समाजाभिमुख सेवांचा लाभ देण्याचे काम महसूल प्रशासनाने करावे, असे सांगून पुरस्कारप्राप्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी कौतुक केले. महसूल प्रशासन हे राज्य शासनाचे केंद्रीय खाते असून, ते शासनाचा कान, नाक व डोळा बनून काम पाहते. त्यामुळे दैनंदिन काम करताना सर्वांनी त्यांना मिळणाऱ्या पगारात सर्व खर्च भागवावा. तसेच इतर कोणत्याही मोहाला बळी न पडण्याचे आवाहन अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी उपस्थितांना केले. निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी प्रास्तविकातून महसूल विभागाने वर्षभरात केलेल्या कामाची व या महसूल सप्ताह अभियानात करण्यात येणाऱ्या कामाची माहिती दिली. सूत्रसंचालन आम्रपाली चोरमारे यांनी केले तर उपस्थितांचे आभार तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी मानले. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते वर्षभरात उत्कृष्ट कामगिरी पार पाडल्याबद्दल वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, हिंगोलीचे तहसीलदार श्रीकांत भुजबळ, जिल्हाधिकारी यांच्या स्वीय सहायक श्रीमती रंजना कोठाळे यांच्यासह विविध महसूल कर्मचाऱ्यांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमात उपविभागीय अधिकारी, तहसीलदार, मंडळ अधिकारी, तलाठी यांच्यासह महसूल विभागातील विविध स्तरांवरील अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते. असा राहणार महसूल सप्ताह महसूल विभागाच्या योजनांचा लाभ आणि माहिती जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी यंदा 1 ते 7 ऑगस्ट 2025 दरम्यान महसूल सप्ताह राबविला जाणार आहे. सर्व उपविभागीय अधिकारी स्तरावर आज महसूल दिन साजरा करून या सप्ताहाचा शुभारंभ करण्यात आला. 2 ऑगस्ट रोजी सन 2011 पूर्वीपासून शासकीय जागेवर अतिक्रमण करून राहणाऱ्या पात्र कुटुंबांना अतिक्रमित जागांचे पट्टे वाटप करण्याची कार्यवाही होईल. 3 ऑगस्ट रोजी पाणंद आणि शिवार रस्त्यांची मोजणी करून त्यांच्या दुतर्फा वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जाईल. 4 ऑगस्ट रोजी नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान प्रत्येक मंडळानिहाय राबवले जाईल. 5 ऑगस्ट रोजी विशेष सहाय्य योजने अंतर्गत डीबीटी न झालेल्या लाभार्थ्यांना घरभेटी देऊन अनुदान वाटप केले जाईल. 6 ऑगस्ट रोजी शासकीय जमिनीवरील अतिक्रमणे हटवून त्या अतिक्रमणमुक्त करण्याबरोबरच शर्तभंग झालेल्या जमिनींबाबत नियमानुसार निर्णय घेतले जातील. 7 ऑगस्ट रोजी वाळू धोरणाची अंमलबजावणी आणि नवीन मानक कार्यप्रणालीचा पूर्वाभ्यास घेतला जाईल, तसेच महसूल सप्ताहाचा समारोप होईल. ******

No comments: