26 August, 2025
कुटुंब आधारित स्कीम लिंकेज कार्यशाळा संपन्न
हिंगोली (जिमाका), दि.26 : प्रत्येक बालकासाठी एक प्रेमळ कुटुंब या कार्यक्रमावर आधारित पर्यायी संगोपनाबाबत जिल्हास्तरावर व संस्थास्तरावर विविध उपक्रम राबविण्यात येतात. कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी संगोपन प्रणाली बळकटीकरणाची अंमलबजावणी करण्यासाठी महिला व बालविकास विभाग, मिरॅकल फाऊंडेशन इंडिया आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने कुटुंब आधारित पर्यायी संगोपन हा कार्यक्रम जिल्ह्यात राबविण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील गरजू कुटुंबाच्या सक्षमीकरणासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, जिल्हा बालसंरक्षण कक्ष व मिरॅकल फाऊंडेशन इंडिया यांच्या समन्वयाने जिल्ह्यात उपलब्ध असणाऱ्या विविध शासकीय योजनांबाबत बालगृहातील प्रवेशित बालकांच्या पालकांना माहिती होण्यासाठी एकदिवसीय स्कीम लिंकेज कार्यक्रम शासकीय विश्रामगृह येथे नुकताच घेण्यात आला.
यावेळी स्कीम लिंकेज कार्यक्रमाचा उद्देशाबाबत माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर.दरपलवार यांनी दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी केले. तसेच मिरॅकल फाऊंडेशन इंडियाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी सोनाली तिवाटने यांनी स्कीम लिंकेज कार्यक्रमांतर्गत कुटुंब सक्षमीकरण आणि कुटुंब आधारित पर्यायी संगोपन प्रणाली बळकटीकरणाची अंमलबजावणी याबाबत सविस्तर माहिती दिली.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.आर.दरपलवार तर प्रमुख पाहूणे म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (बा.क.) विजय बोराटे, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालय, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, शिक्षणाधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, मिरॅकल फाऊंडेशन इंडियाच्या सहायक कार्यक्रम अधिकारी सोनाली तिवाटने, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाच्या सर्व विभागाच्या प्रमुखांनी संबंधित विभागाच्या विविध शासकीय योजनांबाबत मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण तर आभार प्रदर्शन सोनाली तिवाटने यांनी केले. यावेळी बाल कल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे, जिल्ह्यातील हिंगोली, कळमनुरी, वसमत, सेनगाव, औंढा नागनाथ या तालुक्यातील सर्व अंगणवाडी पर्यवेक्षिका, सरस्वती मुलींचे निरीक्षणगृह व बालगृहाचे अधीक्षक शंकर घ्यार, श्री स्वामी समर्थ बालगृहाचे अधीक्षक रमेश पवार, चाईल्ड हेल्प लाईन (1098) चे प्रकल्प समन्वयक संदिप कोल्हे, समुपदेशक अंकुर पाटोडे, केस वर्कर तथागत इंगळे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील संरक्षण अधिकारी संस्थात्मक गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, बालगृहातील प्रवेशित बालकांचे पालक आदी उपस्थित होते.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment