12 August, 2025

पालक सचिव रिचा बागला यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राचा आढावा

• सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करण्याच्या दिल्या सूचना हिंगोली(जिमाका), दि. 12: महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रापैकी असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव रिचा बागला यांनी ऑनलाईन बैठकीत सविस्तर आढावा घेतला. यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.जी. पोत्रे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक संचालक अमोल गोटे, वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत औंढा नागनाथ परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, भक्त निवास, स्वच्छता, सौंदर्यीकरण, परिसर विकास तसेच पर्यावरणपूरक विकास यावर विशेष चर्चा करण्यात आली. तसेच याचा आराखडा तयार करताना जिल्हाधिकारी व सर्व संबधितांनी सोमवारी औंढा नागनाथ तीर्थक्षेत्राला भेट देवून या ठिकाणी विकास कामे करण्याबाबतचा अभ्यास करावा. तसेच देशातील व राज्यातील इतर तीर्थक्षेत्राचे अवलोकन करुन जागतिक दर्जाचे उत्तम तीर्थस्थळ बनविण्यासाठी सर्वसमावेशक विकास आराखडा तयार करावा, अशा सूचना पालक सचिव रिचा बागला यांनी दिल्या. भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्तावित विकासकामांमध्ये विलंब होता कामा नये. धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून या तीर्थक्षेत्राचा योग्य तो विकास करून औंढा नागनाथ हे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे आकर्षण बनावे, यावर भर द्यावा, असे निर्देश पालक सचिव रिचा बागला यांनी यावेळी दिल्या. तसेच विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वेळापत्रक तयार करून प्रत्येक टप्प्यातील कामांची प्रगती सातत्याने तपासण्यात यावी, अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या. श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी जिल्हा प्रशासनामार्फत तयार करण्यात येणाऱ्या आराखड्याबाबत तसेच भाविक व पर्यटकांना आदर्श सुविधा देण्यासाठी काय करता येईल, याची माहिती जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिली. तसेच वास्तुविशारद प्रदीप देशपांडे यांनीही औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकासासाठी आराखड्याबाबत माहिती दिली. *****

No comments: