11 August, 2025
मंगल कार्यालयात बालविवाह झाल्यास परवाने होणार रद्द - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला महिला व बाल विकास विभागाच्या कामकाजाचा आढावा
हिंगोली(जिमाका), दि. 11 : जिल्ह्यातील कोणत्याही मंगल कार्यालयात बालविवाह झाल्यास त्याचा परवाना रद्द करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले आहेत.
बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 नुसार आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा बाल संरक्षण कक्ष, जिल्हा कृति दल, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व, बाल विवाह निमूर्लन जिल्हा कृती दल व बाल कल्याण समिती त्रैमासिक कामकाज आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता म्हणाले, ज्या गावात बालविवाह होईल त्या गावास/ग्रामपंचायतीस जिल्हा वार्षिक निधीतून निधी देण्यात येणार नाही. तसेच 10 दिवसापेक्षा जास्त दिवस शाळेत गैरहजर राहणाऱ्या बालिकांची माहिती शिक्षण विभागाने महिला व बाल विकास विभाग हिंगोली यांच्याकडे देण्यात यावी. तसेच जिल्ह्यातील प्रत्येक गावात 15 ऑगस्ट रोजी होणाऱ्या ग्राम सभेमध्ये गावात बालविवाह होणार नाही याबाबत ठराव मंजूर करुन घेण्यात यावा व त्याची एक प्रत जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयास देण्यात यावी अशा सूचना त्यांनी यावेळी दिल्या.
या बैठकीमध्ये कक्षाने राबविलेले विविध जनजागृती कार्यक्रम, मिशन वात्सल्य पोर्टल, एनसीपीसीआर पोर्टल, घर पोर्टल, पीएम केअर पोर्टल, गती शक्ती पोर्टल व केअरींग पोर्टल या सर्व पोर्टलवरती भरण्यात येणाऱ्या माहितीबाबत, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व या योजनेबाबत, बालविवाह निर्मूलनासाठी निवडण्यात आलेल्या 50 गावांमध्ये ग्राम बाल संरक्षण समितीच्या माध्यमातून घेण्यात येणारे विविध कार्यक्रम तसेच जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासाठी आखलेल्या योजना तसेच जिल्हा कृती दल बैठक, चाईल्ड हेल्पलाईन (1098) कामकाजाची माहिती सदस्य सचिव तथा जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी एस.आर. दरपलवार यांनी बैठकीत दिली.
या बैठकीस मोहन भोसले, व्ही.एस.भोजे, शिक्षण विभाग, विवेक वाकडे, प्रकाश साबळे, एच.बी.पोपळघट, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी एस.जी.फड, डॉ.बालाजी भाकरे, डॉ.पी.एन.फोपसे, ए.आर.बोथीकर, बाल न्याय मंडळ सदस्य सत्यशीला तांगडे, अशोक खुपसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी बाळासाहेब झिंजाडे, गटविकास अधिकारी अमितकुमार मुंडे, प्रफुल्ल लोटेवाड, सहायक गटविकास अधिकारी पी. एस. बोंढारे, उज्वल शिक्षण प्रसारक मंडळाचे चंद्रकांत पाईकराव, उमंग शिशुगृह हिंगोलीचे अधीक्षक राहुल सिरसाट, युनिसेफ एसबीसी-3 चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक बाळु राठोड, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, सदस्य परसराम हेंबाडे, किरण करडेकर, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडीत, चाईल्ड हेल्पलाईन प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे व कर्मचारी उपस्थित होते.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment