20 August, 2025

जिल्हाधिकाऱ्यांची हट्टा येथील स्मार्ट प्रकल्पाला प्रक्षेत्र भेट

हिंगोली, दि. 20 (जिमाका) : मा. बाळासाहेब ठाकरे कृषि व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पांतर्गत जिल्ह्यात मंजुरी मिळालेल्या विविध समुदाय आधारित संस्थांच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आज वसमत तालुक्यातील हट्टा येथील हट्टावाला फार्मर प्रोड्युसर कंपनी लि.ला प्रक्षेत्र भेट दिली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी तथा प्रकल्प संचालक (आत्मा) राजेंद्र कदम, जिल्हा अंमलबजावणी कक्षाचे स्मार्ट नोडल अधिकारी गोविंद बंटेवाड, पुरवठा व मूल्यसाखळी तज्ञ तथा कृषि व्यवसाय सल्लागार जी. एच. कच्छवे, तसेच कंपनीचे संचालक फहिमोद्दीन सिद्दिकी आदी मान्यवर उपस्थित होते. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी कंपनीच्या गोदाम बांधकाम व मशिनरी शेड बांधकामाची पाहणी केली. ही कामे मानकानुसार व नियोजित कालावधीत पूर्ण होण्यासाठी आवश्यक सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या. त्यानंतर त्यांनी मंजूर उपप्रकल्पांतर्गत स्थापन होणाऱ्या अत्याधुनिक यंत्रणांची माहिती घेतली. यात दाल मिल (2 टीपीएच) रंगीत सॉर्टरसह स्वयंचलित आणि बेसन मिल पीन मिल 1 टीपीएच यंत्रणांचा समावेश असून, या यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनावर मूल्यवृद्धी करण्याची मोठी संधी उपलब्ध होणार असल्याचे सांगितले. या यंत्रणांची कार्यप्रणाली, क्षमता, तसेच शेतकरी उत्पादक कंपनीमार्फत स्थानिक शेतकऱ्यांना मिळणारे लाभ याबाबत संचालक मंडळाशी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी चर्चा केली. त्यांनी प्रकल्प शक्य तितक्या लवकर कार्यान्वित व्हावा यावर भर देत कंपनी संचालकांना यंत्रणा स्थापनेसाठी आणि व्यापारी व्यवहारिकदृष्ट्या आवश्यक बाबींच्या गतीमान अंमलबजावणीसाठी मार्गदर्शन केले. या भेटीदरम्यान त्यांनी संस्थेकडून उभारण्यात येत असलेल्या मूलभूत सुविधा व आधुनिक प्रक्रिया यंत्रणेची सविस्तर पाहणी करून शेतकरी हिताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. या प्रक्षेत्र भेटीदरम्यान कंपनीसमोरील वीजपुरवठा समस्येचीही जिल्हाधिकाऱ्यांनी दखल घेतली. त्यांनी महावितरण यंत्रणेचे अभियंता श्री. चाकूरकर यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधून, कंपनीसाठी आवश्यक असलेला एक्सप्रेस फिडर त्वरीत उपलब्ध करून देण्याच्या स्पष्ट सूचना दिल्या. यामुळे प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेली ऊर्जा उपलब्ध होणार असून, उत्पादन प्रक्रियेतील अडचणी दूर होण्यास मदत होईल. या भेटीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी उपस्थित संचालकांशी संवाद साधत शेतकऱ्यांना उत्पादक संस्थांद्वारे थेट बाजारपेठेशी जोडून, त्यांचा आर्थिक स्तर उंचावण्याचे उद्दिष्ट साध्य करण्याबाबत भर दिला. त्यांनी कंपनीचे संचालक मंडळ व शेतकरी यांना गुणवत्तापूर्ण उत्पादन, बाजारपेठेत स्पर्धात्मक दर, तसेच ब्रॅंडिंग व पॅकेजिंगवर भर देण्याचे आवाहन केले. या भेटीमुळे हट्टा येथील स्मार्ट प्रकल्पाच्या कामांना गती मिळणार असून, शेतकरी उत्पादक कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यातील शेतकऱ्यांना कृषि उत्पादनात मूल्यवर्धन, रोजगारनिर्मिती व आर्थिक सबलीकरणाचा मोठा फायदा होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. *****

No comments: