22 August, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या नावीन्यपूर्ण उपक्रमांचे महसूलमंत्र्यांनी केले कौतुक

•हिंगोली जिल्ह्याचे प्रशासन लोकाभिमुख करा - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे हिंगोली, दि.२२: महसूल विभागाने सेवा वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. ‘सेवा दूत’ प्रणालीद्वारे लोकांना आवश्यक कागदपत्रे आणि खर्चाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल, अशी व्यवस्था केल्यामुळे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे कौतुक केले. महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी हिंगोली जिल्ह्याचा दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. अप्पर मुख्य सचिव विकास खारगे आणि हिंगोली जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्यासह उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे आणि प्रतीक्षा भुते यांच्यासह महसूल विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. सरकारी जागांवर धनदांडग्यांनी केलेल्या अतिक्रमणांवर विशेष लक्ष द्या, अशी सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. त्यांनी गुरुवारी हिंगोली जिल्ह्याचा आढावा घेतला. ते म्हणाले,"नागपूर पॅटर्न" नुसार गावांना भेटी देऊन लोकांच्या अडचणी जाणून घेतल्या पाहिजेत. बैठकीत महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, की महसूल खात्याने केवळ प्रशासकीय काम न करता, लोकांच्या अडचणी समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांच्या मनात प्रशासनाबद्दल विश्वास निर्माण केला पाहिजे, असे सांगून जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील सर्वात महत्त्वाचे पाच विषय प्राधान्याने हाताळावे आणि तहसीलदारांनीही वेगवेगळ्या किमान पाच विषयांवर काम करावे, असे निर्देश त्यांनी दिले. यामुळे अनेक प्रश्न मार्गी लागतील आणि प्रशासकीय कामाला गती मिळेल. ​अप्पर मुख्य सचिव विकास खारगे यांनी बेकायदेशीर वाहतूक करणाऱ्यांवर नियमांनुसार दंड आकारला जात नाही, अशी तक्रार नेहमीच विधानसभेत होते. त्यामुळे, अवैध उत्खनन आणि वाहतूक करणाऱ्यांवर बाजार दराच्या पाचपट दंड आकारला जावा. तर तीन वेळा गौण खनिजाची चोरी करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यासाठी एमपीडीए लावण्याबाबत नियोजन करण्याच्या सूचनाही दिल्या. •​ *प्रशासनात पारदर्शकता आणि तंत्रज्ञानाचा वापर* ​महसूल विभागाने सेवा वितरणात पारदर्शकता आणण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढवावा. ‘सेवा दूत’ प्रणालीद्वारे लोकांना आवश्यक कागदपत्रे आणि खर्चाची माहिती एका क्लिकवर उपलब्ध होईल.अशी व्यवस्था केल्याने त्यांनी हिंगोली जिल्हाधिकारी राहूल गुप्ता यांचे कौतुक केले. तसेच, ‘थम आणि फेस ॲप’ पद्धतीचा वापर करून प्रशासकीय कामकाज अधिक सोपे आणि जलद करण्यात यावे. ‘संजय गांधी निराधार’ आणि ‘श्रावणबाळ सेवा’ योजनेच्या लाभार्थ्यांचे आधारकार्ड लिंक करून त्यांना डीबीटीद्वारे पेन्शन मिळेल याची खात्री करण्यासाठी तलाठ्यांना घरोघरी पाठवण्याचे निर्देशही बावनकुळे यांनी दिले. • *​प्रलंबित खटले ९० दिवसांत निकाली काढा* ​अर्धन्यायिक खटल्यांमध्ये स्पष्ट आणि जलद निर्णय घेण्यासाठी ९० दिवसांत सर्व प्रलंबित खटले निकाली काढा. छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियानसारखे अभिनव कार्यक्रम राबवून लोकांचे प्रश्न त्यांच्या दारातच सोडवावे,असेही निर्देश महसूल मंत्र्यांनी दिले. *******

No comments: