11 August, 2025
रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून हिंगोली जिल्ह्याचे प्रशासकीय नेतृत्व मुलींच्या हाती
नेतृत्व गुण विकसित होण्यासाठी जिल्हा परिषदेचा अभिनव उपक्रम
- जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• जिल्ह्यातील आठ मुलींना उपलब्ध करुन दिली एक दिवस अधिकारी होण्याची संधी
• मुलींनी मानले प्रशासनाचे आभार
हिंगोली, (जिमाका), दि. 11 : जिल्ह्यातील मुलींचे जन्मदर वाढविणे, बालविवाहाचे प्रमाण कमी करणे, मुलींमध्ये जिद्द, प्रेरणा व नेतृत्व गुणांचा विकास तसेच त्यांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ शालेय मुलींना जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक, विभागीय वन अधिकारी या पदावर एक दिवस मानद अधिकारी होण्याची संधी मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांच्या प्रेरणेतून उपलब्ध करुन देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यात मुला-मुलींचे लिंग गुणोत्तर वाढावे, बालविवाह निर्मूलन व महिलांचे सक्षमीकरण व्हावे या उपाययोजनाचा एक भाग म्हणून रक्षाबंधन सणाचे औचित्य साधून मुलींचा सन्मान होण्यासाठी व जिल्ह्यातील सर्व मुलींचे मनोधैर्य वाढविण्यासाठी आज दिनांक 11 ऑगस्ट रोजी रोजी जिल्हा प्रशासन हिंगोली यांच्या संकल्पनेतून हिंगोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातून एका मुलीस आमंत्रित करण्यात आले. त्यांचा सर्वप्रथम सत्कार करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले. माननीय जिल्हा सत्र न्यायाधीश, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक, अपर जिल्हाधिकारी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी, विभागीय वन अधिकारी ही पदे भूषविलेल्या विद्यार्थिंनींचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते त्यांचा योग्य सन्मान करून त्यांना त्यांच्या खुर्चीत बसून सन्मानित करण्यात आले. तसेच प्रत्येक तालुक्यातून एक कर्तृत्त्ववान मुलीचे नाव एका गावातील रस्त्याला देऊन सन्मान करण्यात आला.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता व मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी त्यांचा अमूल्य वेळ देऊन सन्मान करत विविध खाते प्रमुख म्हणून त्यांचे कामकाज कसे चालते, कसे निर्णय घ्यावे याबाबत माहिती दिली. त्यांनी काही संकल्पना मांडली.
मुली व महिलांन सशक्त करण्यासाठी व मुलींचे जन्मदर वाढविण्यासाठी जिल्ह्यातील आठ शालेय विद्यार्थींनींना विविध पदे भूषविण्याची संधी देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी दिली. तसेच जिल्ह्यातील पाच गावांच्या रस्त्त्यांना जिल्ह्यातील कर्तृत्ववान मुलीचे नावे देण्यात आले आहेत. मुलीचे जन्मदर वाढविण्यासाठी रुग्णालयामध्ये जन्मलेल्या मुलींचे स्वागत करण्यासाठी गुड्डा-गुड्डी बोर्ड अभियानही राबविण्यात येत असल्याची माहिती अंजली रमेश यांनी दिली.
आज भानखेडा येथील विद्यार्थिंनी कावेरी कोटकर यांनी जिल्हाधिकारी यांच्या खूचिर्त बसून जिल्हाधिकारी पदाची संधी उपलब्ध झाल्यास आरोग्य, महिला सक्षमीकरण, मुलीमुलीमधील भेदभाव दूर करणे, पिण्याची पाण्याची व्यवस्था करण्यावर भर देण्यात येईल, असे सांगून शाळेच्या विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची खुर्ची बहाल करुन मनोधैर्य वाढविले असल्याचे सांगितले. तसेच कावेरी कोटकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आलेली निवेदने स्वीकारुन काम करण्याचा अनुभव घेतला.
मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका साकारलेली विद्यार्थिंनी आदिती पवार यांनी भविष्यात मला अधिकारी पदाची संधी मिळाल्यास आरोग्य, पोषण, स्वच्छता, अंगणवाडी केंद्रे विकसित करणे ही कामे करण्याची तसेच डॉक्टर बनून शासकीय रुग्णालयात गरीब रुग्णांची सेवा करण्याचा मनोदय व्यक्त केला.
पोलीस अधीक्षकांची भूमिका साकारलेली प्रणित राऊत हिने माझ्या देशातील प्रत्येक मुलीच्या हक्काचे संरक्षण करणे, गुन्हेगाराला कडक शिक्षा करण्यात येईल, असे सांगितले.
न्यायाधीशाची भूमिका साकारलेली प्रणाली आठवले यांनी पुरावे तपासून नि:पक्षपातीपणे न्याय देण्याचे काम करण्यात येईल, असे सांगितले.
अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भूमिका साकारलेली वैभवी सुर्यवंशी हिने जिल्ह्यात गुणवत्तापूर्ण शिक्षण, स्मार्ट शाळा, आरोग्य आणि शंभर टक्के जलजीवन मिशनच्या माध्यमातून घरोघरी पाणी उपलब्ध करणे, रेन वाटर हार्वेस्टींग यासारखे उपक्रमावर भर दिला जाईल, असे सांगितले.
अपर पोलीस अधीक्षक यांची भूमिका साकारलेली अंजली मोहिते यांनी लोकांना समान न्याय, महिला व बालकांचे संरक्षण, सार्वजनिक उत्सवामध्ये होणारे जाती व धर्मातील तेढ कमी करण्यासाठी व गोरगरिबांना न्याय देण्याचे काम करणार असल्याचे सांगितली.
विभागीय वन अधिकारी यांची भूमिका साकारलेली वैष्णवी डांगे यांनी हिंगोली जिल्हा निसर्गरम्य, वृक्षांचे संवर्धन, जतन करणे आणि प्रत्येक शाळा, महाविद्यालये तसेच जिल्ह्यातील प्रत्येक व्यक्तीला एक झाड लावण्यासाठी प्रोत्साहित करण्यात येईल, असे सांगितले.
अपर जिल्हाधिकारी यांची भूमिका साकारणारी आर्या चव्हाण यांनी शासन, प्रशासन जनतेसाठी सहल उपलब्ध व्हावे, पारदर्शक काम व्हावे यासाठी काम करणार असल्याचे सांगून मला एक दिवस अधिकारी पदावर काम करण्याची संधी उपलब्ध करुन दिल्यामुळे प्रशासनाचे आभार मानले.
यावेळी उप मुख्य कार्यकारी अधिकारी केशव गड्डापोड व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांनी मुलींचे जन्मदर वाढविण्यासाठी व त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी हे अभियान राबविण्यात येत असल्याची माहिती दिली.
शेवटी जिल्हा परिषद हिंगोली येथे त्यांचे मनोगत जाणून घेऊन समारोप करण्यात आला. यासाठी उप मुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत केशव गडापोड, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी नियोजन केले. उपक्रमाचे यशस्वीतेसाठी हिंगोलीचे गटविकास अधिकारी विष्णु भोजे, माधव कोकाटे, मधुकर राऊत, संदीप अन्नदाते व इतर अधिकारी कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment