22 August, 2025

जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी घेतला उद्योग विभागाचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 22 : उद्योग विभागाच्या अडी-अडचणी एकाच क्षेत्राखाली सोडविण्यासाठी आज जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक घेण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी उद्योजक, व्यापारी संघटना यांच्या अडचणी जाणून घेऊन त्या तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना संबंधित विभागाला दिल्या. उद्योगाविषयी उद्योजकांच्या तक्रारी एक खिडकीद्वारे सोडविण्यासाठी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक तथा नोडल अधिकारी यांच्याकडे आपले निवेदन सादर करावे, अशा सूचनाही दिल्या. राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे,त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी स्थानिक पातळीवर उपलब्ध करुन देवून रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजना ही महत्वकांक्षी योजना कार्यान्वित केली आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर उद्योजकात वाढ होण्यासाठी आज झालेल्या डीएलटीएफसी बैठकीमध्ये 158 कर्ज प्रस्तावांना मंजुरीही देण्यात आली आहे. या बैठकीस जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, खादी ग्रामोद्योग अधिकारी, उद्योग संघटनेचे सचिव प्रवीण सोनी, नंदकिशोर तोष्णीवाल, अनिल नैनवाणी यांच्यासह जिल्ह्यातील उद्योजक, विविध उद्योग संघटनेचे पदाधिकारी, व्यापारी संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. *****

No comments: