04 August, 2025

अवैध ठरलेली 4 हजार 975 जन्म नोंदणी प्रमाणपत्रे रद्द

* रद्द करण्यात आलेली जन्म नोंदणी प्रमाणपत्रांची यादी जिल्ह्याचे संकेतस्थळावर प्रसिद्ध * रद्द झालेले प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये 15 दिवसाच्या आत जमा करून नवीन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याकरिता संबंधित तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज करावेत हिंगोली (जिमाका),दि.०४: महाराष्ट्र जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 मधील सुधारणा अधिसूचना दि. 11 ऑगस्ट 2023 च्या अनुषंगाने हिंगोली जिल्ह्यातील जन्म-मृत्यू नोंदणी अधिनियम, 1969 च्या कलम 15 अन्वये अवैध ठरलेली 4 हजार 975 जन्म नोंदणी प्रमाणपत्रे रद्द करण्यात आली आहेत. त्याचा तपशील खालीलप्रमाणे आहे. जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली या यंत्रणेमार्फत 2 हजार 693 प्रमाणपत्रे देण्यात आली होती. त्यापैकी 1 हजार 835 प्रमाणपत्रे वैध ठरविण्यात आली आहेत तर 858 प्रमाणपत्रे अवैध ठरविण्यात आली आहेत. अवैध ठरवण्यात आलेली 858 प्रमाणपत्रे एका वर्षावरील जन्म नोंदणीच्या अनुषंगाने कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या वैधानिक आदेशाशिवाय जन्म नोंदणी प्रमाणपत्रे निर्गत केली असल्याने रद्द करण्यात आली आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक सामान्य रुग्णालय हिंगोली या यंत्रणेमार्फत 12 हजार 326 प्रमाणपत्रे देण्यात आली होती. त्यापैकी 9 हजार 885 प्रमाणपत्रे वैध ठरवण्यात आली आहेत. तर 2 हजार 441 प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आली आहेत. अवैध ठरविण्यात आलेली 2 हजार 441 प्रमाणपत्रे ही एका वर्षावरील जन्म नोंदणीच्या अनुषंगाने कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्या वैधानिक आदेशाशिवाय जन्म नोंदणी प्रमाणपत्रे निर्गत केली असल्याने रद्द करण्यात आली आहेत. सह आयुक्त नगर पालिका प्रशासन जिल्हाधिकारी कार्यालय हिंगोली या यंत्रणेमार्फत 996 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली होती. ही सर्व प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आली आहेत. अवैध ठरवण्यात आलेली 996 प्रमाणपत्रे ही एका वर्षावरील जन्म नोंदणीच्या अनुषंगाने कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याऐवजी नायब तहसीलदार यांनी निर्गत केलेल्या आदेशानुसार जन्म नोंदणी प्रमाणपत्र निर्गत केल्यामुळे रद्द करण्यात आली आहेत. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जिल्हा परिषद हिंगोली या यंत्रणेमार्फत 680 प्रमाणपत्रे वितरित करण्यात आली होती. ही सर्व प्रमाणपत्रे अवैध ठरवण्यात आली आहेत. अवैध ठरवण्यात आलेली 680 प्रमाणपत्रे ही एका वर्षावरील जन्म नोंदणीच्या अनुषंगाने कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार यांच्याऐवजी नायब तहसीलदार यांनी निर्गत केलेल्या आदेशानुसार जन्म नोंदणी प्रमाणपत्र निर्गत केल्यामुळे रद्द करण्यात आली आहेत. अशाप्रकारे हिंगोली जिल्ह्यात जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 मधील सुधारणा अधिसूचना दि. 11 ऑगस्ट, 2023 नंतर निर्गमित 16 हजार 695 जन्म नोंदणी प्रमाणपत्रापैकी 11 हजार 720 प्रमाणपत्रे वैध आढळून आली आहेत. तर अवैध ठरविण्यात आलेली 4 हजार 975 जन्म नोंदणी प्रमाणपत्रे जन्म मृत्यू नोंदणी अधिनियम 1969 च्या कलम 15 अन्वये रद्द करण्यात आलेली आहेत. रद्द करण्यात आलेली जन्म नोंदणी प्रमाणपत्रांची यादी जिल्ह्याचे संकेतस्थळ Hingoli.nic.in यावर प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी जिल्ह्याच्या Hingoli.nic.in या संकेतस्थळाला भेट देवून आपले जन्म-मृत्यू प्रमाणपत्र तपासून घ्यावेत. आपले जन्म-मृत्यू प्रमाणपत्र रद्द झालेले असल्यास रद्द झालेले प्रमाणपत्र तहसील कार्यालयामध्ये 15 दिवसाच्या आत जमा करावेत व नवीन जन्म-मृत्यू प्रमाणपत्र मिळण्याकरिता संबंधित तहसीलदार यांच्याकडे रितसर अर्ज करुन प्रमाणपत्र मिळण्याची कार्यवाही करावी. रद्द झालेली प्रमाणपत्रे 15 दिवसांच्या आत संबंधित तहसील कार्यालयात जमा न केल्यास पुन्हा नव्याने जन्म नोंदणी प्रमाणपत्र मिळणार नाही, अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविले आहे. *******

No comments: