08 August, 2025

_केंद्र सरकारची 11वी वर्षपूर्ती_ औंढा नागनाथ येथे सोमवारी चित्र प्रदर्शनाचे आयोजन

• विविध विभागांच्‍यावतीने शासकीय योजनांचे स्टाल्स उभारणार हिंगोली, दि.08(जिमाका): केंद्र सरकारची 11 वर्षे-सेवा सुशासन आणि गरीब कल्याणाची या संकल्पनेवर आधारित सरकारच्यावतीने देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. या अभियानातंर्गंत केंद्र सरकारच्या माहिती प्रसारण मंत्रालयाच्या नांदेड येथील केंद्रीय संचार ब्यूरोच्यावतीने आठवे ज्योर्तिलिंग असलेल्‍या औंढा नागनाथ मंदिर संस्‍थानच्‍या सहकार्याने येथील भक्‍तनिवास-2 येथे सोमवारपासून तीन दिवस मल्टिमिडीया चित्र प्रदर्शन भरविण्यात येत आहे. हे प्रदर्शन सर्वांसाठी मोफत खुले असणार आहे. या कार्यक्रमाचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते होणार असून, यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्‍ता, केंद्रीय संचार ब्‍यूरोचे प्रसिद्धी प्रमुख सु‍मि‍त दोडल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, जिल्‍हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्‍ण कोकाटे, विभागीय वन अधिकारी डॉ. राजेंद्र नाळे, उपविभागीय अधि‍कारी समाधान घुटूकडे, औंढा नागनाथ संस्‍थानचे प्रशासक तथा तहसिलदार हरिष गाडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, गट विकास अधिकारी श्री. कल्हारे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गजानन चव्‍हाण, बालविकास प्रकल्प अधिकारी श्रीमती संगीता इंगळे, डॉ. विजय निलावार सद्भाव सेवा संस्‍थेचे डॉ. अभय भरतीया आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने विविध क्षेत्रांमध्ये केलेली उल्लेखनीय कामगिरी आणि देशाचा जलदगतीने केलेला विकास तसेच जनतेच्या कल्याणासाठी सरकारकडून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती या प्रदर्शनातून देण्यात येणार आहे. तसेच भारतीय स्वातंत्र्य आणि फाळणी स्‍मृतींवर आधारित चित्रांचा समावेशही असणार आहे. एलईडी वॉलच्या तसेच विविध विभागांच्‍यावतीने शासकीय योजना आणि उपक्रमांची माहिती देण्‍यात येणार आहे. यात जिल्‍हा परिषदेच्‍या आरोग्‍य विभागाच्‍यावतीने मोफत आरोग्‍य तपासणी, महिला व बालकल्‍याण विभागाचे पोषण आहार तर पंचायत समितीच्‍यावीने ग्रामविकास विभागाच्‍या योजनांचे स्‍टॉल्स लावण्‍यात येणार आहेत. भारतीय डाक विभाग आणि‍ भारतीय स्‍टेट बॅंकेच्‍यावतीने योजनांची माहिती असलेल्‍या दालन येथे असणार आहे. एक झाड आईच्या नावे अभि‍यानातंर्गत वन विभागाच्‍यावतीने बेल, पिंपळ, वड आदी पर्यावरणपूरक आणि‍ धार्मिक महत्त्व असलेल्‍या वृक्षाचे वितरण करण्‍यात येणार आहे. सेल्फी बुथ, 360 डिग्री फोटो बुथ या प्रदर्शनाचे आकर्षण असणार आहे. या प्रदर्शनास मोठ्या संख्येने नागरिक आणि भाविकांनी भेट देण्याचे आवाहन केंद्रीय संचार ब्‍यूरो तसेच नागनाथ मंदिर संस्‍थानच्‍यावतीने करण्‍यात आले आहे. *****

No comments: