21 August, 2025

शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षेचा निकाल जाहीर

हिंगोली (जिमाका), दि. 21 : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत शासकीय संगणक टंकलेखन प्रमाणपत्र परीक्षा जून 2025 मध्ये इंग्रजी 30 व 40 श.प्र.मि. विषयाची परीक्षा दि. 18 ते 24 जून, 2025 या कालावधीत आणि मराठी व हिंदी 30 व 40 श.प्र.मि. या विषयाची परीक्षा दि. 30 जून ते 4 जुलै, 2025 या कालावधीत ऑनलाईन पध्दतीने घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल दि. 19 ऑगस्ट, 2025 रोजी ऑनलाईन पध्दतीने जाहीर करण्यात आला आहे. या परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रिंट घेता येईल. विद्यार्थ्यांची प्रमाणपत्रे, गुणपत्रके डिजिटल स्वाक्षरीने ऑनलाईन स्वरुपात संबंधित संस्थांच्या लॉगिनला उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. या प्रमाणपत्रांची छपाई संस्थांनी कलर प्रिंटद्वारे 100 जीएसम कागदावर करुन विद्यार्थ्यांना वितरीत करावे. तसेच संबंधित विद्यार्थ्यास सॉफ्टकॉपी पीडीएफ स्वरुपात देण्यात यावी. जेणे करुन विद्यार्थ्यांना भविष्यात प्रमाणपत्राच्या आवश्यकतेनुसार प्रमाणपत्र कलर प्रिंटरद्वारे कागदावर छपाई करुन घेता येईल, संस्थांनी संबंधित विद्यार्थ्यास प्रमाणपत्र, गुणपत्रके वितरीत केलेली पोहोच दप्तरी जतन करुन ठेवावी. निकाल जाहीर झालेल्या दिनांकापासून 10 दिवसात परीक्षार्थींने गुण पडताळणी व उत्तरपत्रिकेच्या छायांकित प्रतीसाठी संस्थेतून विहित नमुन्यात ऑनलाईन अर्ज करणे आवश्यक आहे. गुण पडताळणीसाठी प्रती विषय 100 रुपयाप्रमाणे व छायाप्रती मिळण्यासाठी प्रती विषय 400 रुपयाप्रमाणे रक्कम ऑनलाईन पध्दतीने दि. 29 ऑगस्ट, 2025 पर्यंत भरण्यात यावेत. गुण पडताळणी व छायाप्रती प्राप्त झाल्यानंतर कार्यालयीन पाच दिवसात पुनर्मुल्यांकनासाठी प्रती विषय 600 रुपयाप्रमाणे ऑनलाईन पध्दतीने रक्कम भरुन अर्ज करावेत. यानंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही, याची नोंद घ्यावी. याबाबतच्या सविस्तर सूचना परिषदेच्या www.mscepune.in या संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत, अशी माहिती महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या आयुक्तांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे. ******

No comments: