22 August, 2025

रोजगार मेळाव्यात 96 उमेदवारांची निवड

हिंगोली (जिमाका), दि. 22 : जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार उमेदवारांसाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, मॉडेल करिअर सेंटर व तोष्णीवाल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, सेनगाव यांच्या संयुक्त विद्यमाने नुकताच सेनगाव येथील तोष्णीवाल महाविद्यालयात "पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला होता. या मेळाव्यास जिल्ह्यातील दहावी, बारावी, आयटीआय, डिप्लोमा, पदवी व पदव्युत्तर या पात्रतेच्या 233 उमेदवारांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 96 उमेदवारांची प्राथमिक निवड करण्यात आली आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. जी. तळणीकर हे होते. तर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य आर. व्ही. बोथीकर, महाविद्यालयीन विकास समितीचे अध्यक्ष रमन तोष्णीवाल, कौशल्य विकास विभागाचे सहायक आयुक्त बालाजी मरे, डॉ. आर. ए. जोशी, डॉ. वाय. एस. नलवार यांची प्रमुख उपस्थिती होती. या रोजगार मेळाव्यात महाराष्ट्रातील विविध नामांकीत कंपनीचे उद्योजक उपस्थित होते. तसेच जिल्ह्यात विविध महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती देण्यासाठी विविध महामंडळाचे स्टॉल लावण्यात आले होते. या मेळाव्यात मार्गदर्शन करताना प्राचार्य बोथीकर यांनी मुलाखतीचे ठोकताळे सांगत करियरसाठी स्वत:चे गाव सोडून उमेदवारांनी मिळेल तेथे नोकरी मिळवावी आणि स्वत:ची क्षमता सिद्ध करावी, असा मंत्र दिला. रमण तोष्णीवाल यांनी आपल्या परिसरातील कामाच्या मागणीनुसार स्वत: रोजगार मिळवत युवकांनी रोजगार निर्मिती करणारे बनावे, असे आवाहन केले. सहायक आयुक्त बालाजी मरे यांनी साचेबद्ध सरकारी नोकरीची अपेक्षा न बाळगता खाजगी क्षेत्रातील संधीचे सोने करावेत, असा सल्ला दिला. अध्यक्षीय समारोपात डॉ. तळणीकर यांनी रोजगार मेळावे ही युवकांसाठी चालून आलेली संधी आहे. या संधीचे सोने करावे, असे आवाहन केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. टी. यु. केंद्रे यांनी तर आभार डॉ. डी. जी. सावंत यांनी मानले. या कार्यक्रमांच्या यशस्वीतेसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता हिंगोली या कार्यालयाचे नवनाथ टोनपे, राजाभाऊ कदम, नागेश निरदुडे, रमेश जाधव, पवन पांडे, प्रवीण राठोड, अभिजीत अलोने आणि तोष्णीवाल महाविद्यालयाचे प्राध्यापक ए. पी. नाईक, डॉ. एन. एस. बजाज, डॉ. पी. एन. तोतला, डी.डी.थोरात, एस. एस. मरकड, डी. पी. तडस, एन. एस. गायकवाड, के. एस. पवार, एच. टी. शिंदे, इतर शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. *****

No comments: