14 August, 2025

सेनगाव येथे जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते 25 क्षय रुग्णांना मोफत पोषण आहार किट वाटप

हिंगोली, दि.14 (जिमाका): सेनगाव तालुक्यात क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमांतर्गत क्षयरुग्णांना पोषण आहारासाठी उपचारादरम्यान निक्षय मित्र स्वखर्चातून पोषण आहार किट दिली जाणार आहे. आज या उपक्रमाचा एक भाग म्हणून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते 25 क्षयरुग्णांना मोफत पोषण आहार कीटचे सेनगाव येथे वाटप करण्यात आले. क्षय रुग्णांना पोषण आहाराचा आधार देऊन निक्षय मित्र होण्याचे आवाहन करून क्षयरोग हा समाजातून समूळ उच्चाटन होण्यासाठी सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावे. दोन आठवड्याचा खोकला असेल तर त्वरित डॉक्टराशी संपर्क साधून तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी यावेळी केले. यावेळी उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, उपजिल्हाधिकारी (सा. प्र.) अनिल माचेवाड, तहसीलदार सखाराम मांडवगडे, गट विकास अधिकारी श्री. कांबळे, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी तथा जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सतीश रुणवाल यांच्या उपस्थितीमध्ये तहसील कार्यालयात पोषण आहार किटचे वाटप करण्यात आले. यासाठी तालुका आरोग्य अधिकारी, सर्व वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व आरोग्य कर्मचारी यांनी 41 क्षय रुग्णांना पोषण आहार कीटबाबत दत्तक घेतले आहे. या अनुषंगाने नियोजन करण्यात येत असून, त्यापैकी आज 25 क्षय रुग्णांना मोफत किट वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वखर्चातून वाटप करण्यात आले. या कीटमध्ये प्रत्येकी एक किलो तेल, शेंगदाणे, मूग डाळ, गहू, साखर आणि प्रोटीनचा डबा असा समावेश आहे. यावेळी बैठकीत सर्व तलाठी, मंडळ अधिकारी, पंचायत समिती तसेच तालुका आरोग्य अधिकारी-कर्मचारी व तालुकास्तरावरील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. *****

No comments: