29 August, 2025
‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा उपक्रम जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेऊन यशस्वी करावा - निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड
• ‘श्रीगणेशा आरोग्याचा’उपक्रमातून जिल्ह्यात होणार नागरिकांची आरोग्य तपासणी
• मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधी कक्षाचा पुढाकार
हिंगोली (जिमाका), दि.29 : गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला आहे. हे अभियान जिल्ह्यात जास्तीत जास्त आरोग्य शिबिरे घेऊन यशस्वी करावा, अशा सूचना निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी आयोजित बैठकीत दिल्या.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य शिबिराच्या पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ.चक्रधर मुंगल, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ. प्रकाश जाधव, डॉ. बालाजी भाकरे, डॉ.मोहसीन खान, मुख्यमंत्री सहाय्यता कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.नामदेव कोरडे, गणेश मंडळाचे प्रतिनिधी कल्याणराव देशमुख, सचिन इंगळे, नागेश संगेकर, संतोष शेंडगे आदी उपस्थित होते.
सार्वजनिक गणेश मंडळाचे सहकार्य घेऊन जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट ते 5 सप्टेंबर, 2025 या कालावधीत जास्तीत जास्त आरोग्य शिबिराचे आयोजन करावे. या शिबिरामध्ये विविध तपासणीसह मुख्यमंत्री सहायता निधी व शासन आरोग्यविषयी राबवित असलेल्या विविध योजनेची जनजागृती करावी, अशा सूचना यावेळी श्री. बोधवड यांनी दिल्या.
यावेळी माहिती देताना डॉ. कोरडे म्हणाले, मुख्यमंत्री श्री.देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून संपूर्ण महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने ‘श्रीगणेशा आरोग्याचा’ या विशेष मोहिमेअंतर्गत मोफत आरोग्य तपासणी शिबिरे आयोजित करण्यात येणार आहेत. गणेशोत्सवाच्या मंगलमय वातावरणात नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाने हा महत्त्वपूर्ण उपक्रम हाती घेतला असून महात्मा फुले जन आरोग्य योजनेत नोंदणीकृत रुग्णालये, मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्ष, महात्मा फुले जन आरोग्य योजना, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा रुग्णालय, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र तसेच धर्मादाय रुग्णालयांशी यांच्या सहकार्याने जिल्ह्यात जवळपास 200 आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात येणार आहेत. या कक्षाच्यावतीने गणेश मंडळांशी संपर्क साधून भव्य आरोग्य शिबिरे राबवली जात आहेत. मंडपांमध्ये किंवा जवळपास उभारण्यात येणाऱ्या शिबिरांमध्ये गणेशभक्त आणि स्थानिक नागरिक यांची मोफत आरोग्य तपासणी केली जाणार आहे. आरोग्य तपासणीच्या माध्यमातून उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयरोग, कर्करोग आदी आजारांचे लवकर निदान करून वेळेत उपचार मिळण्याची सोय होणार आहे. तसेच या शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांना केंद्र व राज्य शासनाच्या आरोग्य योजनांची माहिती दिली जाणार आहे. ‘श्री गणेशा आरोग्याचा’ या उपक्रमातून हजारो नागरिकांना त्यांच्या आरोग्याची मोफत तपासणी करण्याची संधी मिळत असून, या उपक्रमात सर्व नागरिकांनी सहभागी होऊन लाभ घ्यावा, असे आवाहन येथील मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रूग्णालय मदत कक्षाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नामदेव कोरडे यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)

No comments:
Post a Comment