05 August, 2025

नवउद्योजकांसाठी ‘मैत्री’ कक्षाकडून शासकीय मार्गदर्शन सेवा

· *उद्योग सुरू करण्यास मोफत सल्ला व सहाय्य उपलब्ध* हिंगोली,दि.05(जिमाका): राज्यातील नवउद्योजक, लघु व मध्यम उद्योग तसेच निर्यात क्षेत्रात कार्यरत व्यावसायिकांना शासकीय योजनांचा लाभ मिळावा आणि उद्योग स्थापनेसाठी आवश्यक मार्गदर्शन एकाच ठिकाणी मिळावे, या उद्देशाने महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागामार्फत ‘मैत्री’ या विशेष कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या कक्षामार्फत एक मोफत कॉल सेंटर सेवा सुरु करण्यात आली असून, त्याचा लाभ नवोदित व सध्या कार्यरत असलेल्या उद्योजकांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक यांनी केले आहे. राज्यात नवीन उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, उद्योगासाठी आवश्यक परवाने, लायसन्स, नाहरकत प्रमाणपत्र मिळण्याची माहिती, विविध शासकीय योजनांतर्गत अनुदान, सवलती व प्रोत्साहन, चालू उद्योगांना भेडसावणाऱ्या अडचणींबाबत सल्ला व सहाय्य, उत्पादनाची निर्यात करण्यासंबंधी माहिती आणि निर्यातदारांसाठी शासनाच्या सवलती व विशेष योजना याबाबत ‘मैत्री’ कक्षाद्वारे मुख्य सेवा देण्यात येतात. अधिक माहितीसाठी सोमवार ते शुक्रवारी १८०० २३३ २०३३, मुंबई कार्यालय क्रमांक ०२२-२२६२२३२२ / ०२२-२२६२२३६१ यावर सकाळी 10 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत ५.३० संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील सर्व उद्योजक, उद्योग संघटना, शैक्षणिक संस्था, स्टार्टअप्स आणि स्थानिक तरुण व्यावसायिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे. *****

No comments: