14 August, 2025

अवयव दान मोहिमेअंतर्गत बहिर्जी विद्यालयात रांगोळी व पोस्टरद्वारे जनजागृती

हिंगोली, दि. 14 (जिमाका): सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या मार्गदर्शनाखाली 3 ते 15 ऑगस्ट दरम्यान राज्यभर ‘अवयवदान पंधरवडा’ राबविण्यात येत आहे. या अभियानाचा एक भाग म्हणून वसमत येथील बहिर्जी विद्यालयात अवयव दानाबाबत जनजागृतीसाठी विद्यार्थ्यांनी रांगोळी व पोस्टर बनवून अवयवदानाचा संदेश दिला. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके व जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. गंगाधर काळे व तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप काळे यांच्या नियोजनाखाली हा उपक्रम पार पडला. ग्रामीण व शहरी भागात अवयवदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी आरोग्य विभागामार्फत विविध जनजागृती उपक्रम राबविले जात आहेत. या कार्यक्रमात बहिर्जी विद्यालयाचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग, विद्यार्थी तसेच राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी यांनी सक्रिय सहभाग घेऊन कार्यक्रम यशस्वी केला. *****

No comments: