05 August, 2025

प्रधानमंत्री पीक विमा योजनेला 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ

*शेतकऱ्यांनी योजनेत मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता* हिंगोली,दि.05(जिमाका): राज्य शासन खरीप हंगाम 2025 मध्ये प्रधानमंत्री पीक विमा योजना राज्यातील सर्व जिल्ह्यात राबवित आहे. या योजनेत कर्जदार व बिगर कर्जदार शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी आता 31 ऑगस्टपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी या योजनेत सहभागी होऊन आपले पीक संरक्षित करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यामध्ये गत वर्षीच्या तुलनेत कमी सहभाग, शेतकऱ्यांकडे ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नसणे, प्रधान मंत्री फसल बीमा योजना पोर्टल सेवेतील व्यत्यय, आधार व आपले सेवा केंद्र सर्व्हरवरील व्यत्यय, जिल्ह्याच्या भूमी अभिलेख पोर्टलच्या तांत्रिक/सेवेतील व्यत्यय इत्यादीमुळे शेतकऱ्यांच्या योजनेतील सहभागावर होणारा परिणाम लक्षात घेऊन केंद्र शासनाने नुकतीच योजनेत बिगर कर्जदार शेतकऱ्यांना सहभागी होण्यासाठी दि.14 तर कर्जदार शेतकऱ्यांना दि.31 ऑगस्ट, 2025 पर्यंत विशेष बाब म्हणून मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजना या पोर्टल https://pmfby.gov.in वर स्वतः तसेच बँक, विमा कंपनीचे एजंट, क्रॉप इन्शुरन्स अॅप व सामूहिक सेवा केंद्रामार्फत योजनेत नोंदणी करावी. अधिक माहितीसाठी संबंधीत पीक विमा कंपनीचे कार्यालय, तहसिलदार, तालुका कृषि अधिकारी, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *****

No comments: