07 August, 2025
‘घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ मोहिमेत ग्रामस्थांनी उत्स्फूर्त सहभाग घ्यावा - मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश
हिंगोली, दि. 7(जिमाका) : जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या माध्यमातून शुक्रवार (दि.8)पासून 15 ऑगस्ट 2025 या कालावधीत ‘घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसोबत ही मोहीम जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांनी या मोहिमेत उत्स्फूर्तपणे सहभागी होण्याचे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश यांनी केले आहे.
जलशक्ती व सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने देशभरात ‘घरोघरी तिरंगा, घरोघरी स्वच्छता’ स्वातंत्र्याचा उत्सव, स्वच्छतेसोबत (हर घर तिरंगा, हर घर स्वच्छता : स्वतंत्रता का उत्सव, स्वच्छता के संग) या टॅगलाईन अंतर्गत स्वातंत्र्य दिन विशेष मोहीम राबविण्यात येत आहे.
या मोहिमेचे उद्दिष्ट स्वातंत्र्याचा उत्सव लोकसहभागातून साजरा करणे आणि त्याचवेळी स्वच्छता, सुजलता व आरोग्याची जोड देणे असा असून, या पार्श्वभूमीवर मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश व उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) संजय कुलकर्णी यांनी जिल्ह्यातील सर्व ग्रामस्थ, ग्रामपंचायती, ग्राम पाणीपुरवठा व स्वच्छता समिती, बचत गट संघ, पंचायत राज इंस्टिस्ट्यूट, शालेय विद्यार्थी व स्वयंसेवकांना मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) व जल जीवन मिशन अंतर्गत गावांमध्ये स्वच्छ सुजल गाव प्रतिज्ञा, सार्वजनिक स्वच्छता मोहीम, पाणी, स्वच्छता व आरोग्य या मालमत्तांची स्वच्छता करणे, जनजागृतीबाबत उपक्रम राबविणे, जलसंवर्धनाचे उपक्रम, 15 ऑगस्ट रोजी अमृत सरोवर व सार्वजनिक ठिकाणी ध्वजारोहण समारंभ आयोजित करण्यात येणार आहे.
या मोहिमेसाठी ‘हर घर स्वच्छता’ व ‘हर घरी तिरंगा’ हे हॅशटॅग वापरून समाजमाध्यमांवर जनजागृती करण्यात येणार आहे. प्रत्येक गावातील प्रत्येक नागरिकाने यात सक्रिय सहभाग नोंदवून ही संकल्पना प्रत्यक्षात उतरवावी, असे आवाहन करण्यात आले आहे. जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद हिंगोली यांच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात ही मोहीम व्यापक स्वरूपात राबविली जाणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंजली रमेश यांनी सांगितले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment