06 August, 2025
जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेचा पालक सचिव रिचा बागला यांच्याकडून आढावा
*निधी विनियोगाबाबत योग्य नियोजन करा - पालक सचिव रिचा बागला*
हिंगोली, दि.६ (जिमाका): जिल्हा वार्षिक (सर्वसाधारण) योजनेत २०२५-२६ मध्ये प्राप्त झालेला ९३.३० कोटी रुपयांच्या निधी विनियोगाबाबत योग्य नियोजन करण्याचे निर्देश वित्त विभागाच्या प्रधान सचिव तथा जिल्ह्याच्या पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात दूरदृष्यप्रणालीद्वारे आयोजित आढावा बैठकीत पालक सचिव श्रीमती बागला बोलत होत्या.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती अंजली रमेश, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, जिल्हा नियोजन अधिकारी श्रीमती अनिता लव्हारे, समाज विभागाच्या सहायक आयुक्त श्रीमती गिता गुट्टे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे यांच्यासह विविध विभाग प्रमुख उपस्थित होते.
सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी विकासकामांना प्रशासकीय मान्यता प्राप्त झालेल्या आहेत, त्याला निधी वितरीत करताना प्राधान्य द्यावे. या प्राप्त निधीचे वितरण करताना पालकमंत्री नरहरी झिरवाळ यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींनी सूचविलेल्या विकासकामांना प्राधान्य देण्याच्या सूचना पालक सचिव श्रीमती रिचा बागला यांनी दिल्या.
जिल्ह्यातील विविध विकासकामांवर खर्च करण्यात येणारे अंदाजपत्रक तयार करून पडताळणी करून योग्य ती कारवाई करताना पालक मंत्री नरहरी झिरवाळ यांना याबाबत माहिती पाठविण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले.
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रथम प्राधान्यक्रमावर असलेल्या विकासप्रकल्पांची पालक सचिवांना माहिती दिली. त्यामध्ये प्रामुख्याने उर्ध्व पैनगंगा प्रकल्प, शक्तिपीठ महामार्ग, गुरुत्वाकर्षण लहरींचा अभ्यास करणा-या लिगो, साखळी डँम यासह प्रशासकीय सुधारणा १५० दिवसांच्या टप्पा-२च्या शासन निर्णयाप्रमाणे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीबाबत तसेच जिल्ह्यातील विविध प्रकल्पांसाठी लागणा-या भूसंपादनाबाबत त्यांनी माहिती दिली.
याशिवाय भारत नेट, महानेटव्दारे जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती इंटरनेटने जोडण्यात येत असून, काही तांत्रिक अडचणी उद्भवत असल्या तरीही हे काम लवकरच पूर्ण करण्याचा प्रयत्न करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले.
तसेच मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी ३.० योजनेतर्गंत महावितरणकडून करण्यात येणा-या कामाचीही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी माहिती दिली.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment