06 August, 2025
जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्याकडून श्रीक्षेत्र औंढा नागनाथ तीर्थक्षेत्र विकास आराखड्याचा आढावा
हिंगोली, दि. ६ (जिमाका): महाराष्ट्रातील प्रमुख ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रापैकी असलेल्या श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्याचा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सविस्तर आढावा घेतला.
यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता डी.जी. पोत्रे, संस्थानचे अध्यक्ष तथा तहसीलदार हरिष गाडे, भारतीय पुरातत्व विभागाचे सहायक संचालक श्री. गोटे, पुजारी शेखर मनोहर भोपी, महंत सुरेश गिरी, वद्रमाक्ष पाठक, विकासक यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
या बैठकीत औंढा नागनाथ परिसरातील पायाभूत सुविधा, भाविकांसाठी आवश्यक सुविधा, वाहतूक व्यवस्था, स्वच्छता, सौंदर्यीकरण, तसेच पर्यावरणपूरक विकास यावर विशेष चर्चा करण्यात आली.
भाविकांना अधिक चांगल्या सुविधा मिळाव्यात यासाठी प्रस्तावित विकासकामांमध्ये कोणताही विलंब होऊ नये. धार्मिक, ऐतिहासिक आणि पर्यटन दृष्टिकोनातून या तीर्थक्षेत्राचा योग्य तो विकास करून औंढा नागनाथ हे जागतिक स्तरावर ओळखले जाणारे आकर्षण बनावे, यावर भर दिला जाईल, असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी निर्देश दिले.
तसेच विकास आराखड्याच्या अंमलबजावणीसाठी वेळापत्रक तयार करून प्रत्येक टप्प्यातील कामांची प्रगती सातत्याने तपासण्यात यावी, अशा सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.
श्रीक्षेत्र औंढा नागनाथच्या सर्वांगीण विकासासाठी प्रशासन कटिबद्ध असून भाविक व पर्यटकांना आदर्श सुविधा देण्याचा प्रयत्न सुरु असल्याचे जिल्हाधिकारी गुप्ता यांनी यावेळी सांगितले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment