21 August, 2025
उद्योग विभागाच्या विकास आयुक्तांकडून जिल्हाधिकारी राहुल गुप्ता सन्मानित
• मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेची 103 टक्के उद्दिष्ट पूर्तता
हिंगोली (जिमाका), दि. 21 : मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम राज्यातील युवक-युवतींना उद्योजकतेसाठी प्रोत्साहन देणे, त्यांना स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देऊन स्थानिक पातळीवर रोजगार निर्मिती व्हावी या उद्देशाने राज्य शासनाने ही महत्त्वाकांक्षी योजना दि. 1 ऑगस्ट, 2019 पासून कार्यान्वित करण्यात आली आहे.
या योजनेंतर्गत 2024-2025 या आर्थिक वर्षासाठी हिंगोली जिल्ह्यास 503 कर्ज प्रकरणाचे लक्ष्यांक देण्यात आले होते. जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राने 31 मार्च 2025 अखेर 520 कर्ज प्रस्ताव मंजूर करुन 103.38 टक्के लक्ष्यांक पूर्ती केल्यामुळे हिंगोली जिल्हा राज्यात 12 व्या स्थानी आला आहे. या कार्याची दखल घेऊन उद्योग विभागाचे विकास आयुक्त दीपेंद्र सिंह कुशवाह यांनी जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांना प्रशस्तीपत्र देत सन्मानित केले आहे.
हे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, उद्योग निरीक्षक एस. एस. दुलेवाड, श्रीमती एस.एस. सवराते, अधीक्षक पी. व्ही. मेंढे, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक तसेच जिल्ह्यातील सर्व बँकेच्या शाखा व्यवस्थापकांनी काम केले आहे.
सन 2025-2026 या आर्थिक वर्षासाठी जिल्ह्यास 1 हजार कर्ज प्रकरणाचे उद्दिष्ट प्राप्त झाले आहे. नवउद्योजकांनी या योजनेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment