08 August, 2025

जिल्ह्यातील उद्योगविषयक अडचणी सोडविण्यासाठी समिती गठीत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

• उद्योग सुलभीकरणासाठी ‘एक खिडकी योजना’ कार्यान्वित करणार • महिन्यातून दोन वेळा जिल्हाधिकारी घेणार आढावा बैठक • उद्योग निरीक्षक यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती हिंगोली, दि.8(जिमाका): जिल्ह्यातील औद्योगिक विकासात अडथळा ठरणाऱ्या विविध समस्या दूर करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने ‘एक खिडकी योजना’ प्रभावीपणे राबविण्याचा निर्णय घेतला आहे. उद्योजकांचा विविध विभागांसोबत समन्वय साधण्यासाठी विशेष जिल्हा उद्योग अडचण निवारण समिती गठीत करण्यात आली आहे. त्यासाठी उद्योग निरीक्षकांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केल्यामुळे उद्योजकांनी त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी इतरत्र जाण्याची गरज नसल्याचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. यावेळी जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, उद्योग निरीक्षक श्रीमती सुदेशना सरपाते, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नंदकिशोर तोष्णीवाल, औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामले, दिलीप चव्हाण, सुमित चौधरी, अनिल राठेाड, रमेश पंडीत, गजानन मगर यांच्यासह विविध उद्योजक यावेळी उपस्थित होते. या समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी राहुल गुप्ता हे असून, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक अनिल कदम, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, नगर परिषद, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता, महावितरणचे अधीक्षक अभियंता, ग्रामीण पाणीपुरवठा विभाग, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, शिखर बँकेचे व्यवस्थापक, नाबार्डचे महाप्रबंधक असतील. उद्योगपतींच्या समस्या एकाच ठिकाणी नोंदवून त्वरित निवारण करणे हे या समितीचे प्रमुख उद्दिष्ट आहे. जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या व चौथ्या शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात उद्योजकांसोबत विशेष आढावा बैठक घेण्यात येणार आहे. उद्योगपतींनी आपल्या अडचणी लेखी स्वरूपात नोडल अधिकारी यांच्याकडे सादर कराव्यात, जेणेकरून त्या बैठकीत मांडून निवारण करता येईल, असे आवाहन जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी उद्योजकांना केले. व्यापारी व गुंतवणूकदारांनी ‘एकखिडकी संपर्क सूत्रा’द्वारे थेट नोडल अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. उत्पादनासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचा पुरवठा, वीज व पाणीपुरवठा, रस्ते सुविधा, परवाने, कर सवलत, पर्यावरण परवानगी, सुरक्षाव्यवस्था, तसेच चोरी रोखण्यासाठी पोलीस गस्त वाढविणे अशा सर्व प्रकारच्या मुद्द्यांचा यात समावेश असेल. औद्योगिक व व्यापारी भागात अलीकडेच चोरीच्या घटना वाढल्याने पोलीस विभागाला गस्त वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच, वीजपुरवठा खंडित होणे, पाण्याची कमतरता, रस्त्यांची दुरवस्था, अग्निशमन साधनांची कमतरता, वाहतूक सुलभ करणे, कचरा व्यवस्थापन यांसारख्या पायाभूत सुविधा सुधारण्यासाठी संबंधित विभागांशी समन्वय साधून तातडीने उपाय केले जाणार आहेत. जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्रांमध्ये गुंतवणुकीची संधी वाढविण्यासाठी नवीन उद्योग प्रस्ताव सादर करण्यास प्रोत्साहन देण्यात येत आहे. यामुळे स्थानिक युवकांसाठी रोजगार निर्मिती होईल. उद्योगपती आणि व्यापाऱ्यांनी आपल्या सर्व अडचणी नोडल अधिकारी किंवा जिल्हा उद्योग केंद्रामार्फत सादर कराव्यात. प्रशासन सर्व विभागांचा समन्वय साधून त्या त्वरित सोडविण्यास प्राधान्य देण्यात येईल असे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सांगितले. *****

No comments: