14 August, 2025
सोयाबीनवरील किडींचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन शेतकऱ्यांनी घ्यावी योग्य काळजी
हिंगोली (जिमाका), दि. 14 : जिल्ह्यात आयोजित मासिक चर्चासत्र व प्रक्षेत्र भेटी दरम्यान पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा व चक्री भुंगा या किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे प्रसार रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी पिकाची वेळीच काळजी घेणे आवश्यक आहे.
रोगाची लक्षणे : पानाच्या मुख्य शिरीपाशी विखुरलेल्या अवस्थेत पिवळ्या रंगाचे चट्टे अथवा अनियमित पट्टे दिसतात. त्यानंतर पाने जसे जसे परिपक्व होत जातात तसे तसे त्यावर गंजलेले तांबूस रंगाचे पट्टे दिसतात. जास्त प्रादुर्भाव असल्यास पाने अरुंद होतात व मुरगळतात. लहान अवस्थेत प्रादुर्भाव झाल्यास पूर्ण झाड पिवळे पडते. प्रादुर्भावग्रस्त झाडांना फुले आणि शेंगा कमी लागतात. दाण्यांचा आकार राहतो. शेंगा दाणे विरहीत राहून पोचट होतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येते.
उपाययोजना : सोयाबीन पिकावर पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाचा प्रसार मुख्यत: पांढरी माशी या रसशोषक किडीद्वारे केला जातो. याच्या नियंत्रणासाठी प्रादुर्भावग्रस्त झाडे उपटून त्यांना जाळून किंवा जमिनीत पुरुन नष्ट करावीत. पांढरी माशी आकर्षित करण्यासाठी पिवळे चिकट सापळे प्रती एकरी 10 याप्रमाणे लावावेत. आर्थिक नुकसान पातळीपेक्षा जास्त प्रादुर्भाव दिसून आल्यास पांढरी माशी आणि पिवळ्या मोझॅक विषाणूचे एकात्मिक व्यवस्थापनासाठी अलिका, टॅगेटा, इरुका, अनोलिका, झपॅक यापैकी एका रासायनिक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच स्पेरटो, अरजित यापैकी एका रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 5 ग्रॅम साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच सोलोमन या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 7 मिली साध्या पंपाद्वारे फवारणी करावी.
चक्री भुंगा किडीची लक्षणे : या किडीची मादी भुंगा पानाचे देठावर, फांदीवर किंवा खोडावर दोन चक्रकाप तयार करतो. यामध्ये मादी तीन छिद्र करते आणि त्यापैकी एकामध्ये अंडी घालते. त्यामुळे चक्राचे वरचा भाग वाळतो. अंड्यातून निघालेली अळी देठ, फांदी व खोड पोखरुन पोकळ करीत आहेत. अळी 19 ते 22 मि.मी. लांब गुळगुळीत पिवळसर रंगाची असते. सुरुवातीला किडग्रस्त झाड इतर झाडासारखे दिसत असल्यामुळे प्रादुर्भाव लक्षात येत नाही. चक्रीभुंभा किडीमुळे शेंगा धरण्याच्या प्रमाणात, दाण्याच्या संख्येत आणि वजनात 50 टक्केपर्यंत घट येऊ शकते.
उपाययोजना : चक्री भुंग्याच्या नियंत्रणासाठी प्रोफेक्स, प्रोफेक्स सुपर, प्रोफेनोफॉस इत्यादी रासायनिक किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यामध्ये साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच बेल्ट, काल्डन इत्यादी रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 15 मि.ली. साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. तसेच हॉस्टथॉक्स, ट्रायडेम या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 12.5 मिली साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. टॉर्नेडो, एथिऑन या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 15.30 मि.ली. साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. कोराजन या रासायनिक किटकनाशकाची प्रती 10 लिटर पाण्यात 3 मि.ली. साध्या पंपाद्वारे फवारणी करावी. फवारणीसाठी किटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी.
वरील उपाययोजनांचा तात्काळ अवलंब करुन सोयाबीन पिकाचे संरक्षण करावे, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment