07 August, 2025

आंतरराष्ट्रीय मानवी तस्करीविरोधी दिनानिमित्त वडद येथे जनजागृती

*बालविवाह प्रतिबंध, चाईल्ड हेल्पलाईन व संरक्षण उपाययोजनांवर मार्गदर्शन* हिंगोली, दि. ७ (जिमाका): आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी प्रतिबंध दिनानिमित्त वडद येथील जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा बाल संरक्षण कक्ष, इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म संस्था आणि दामिनी पथक यांच्या संयुक्त विद्यमाने जनजागृती कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात बाल कल्याण समितीचे सदस्य श्री. पी.आर. हेंबाडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, दामिनी पथकाच्या आरती साळवे, राहुल शिरसाट उपस्थित होते. बालविवाह प्रतिबंधक कायद्याबाबत माहिती दिली. मुलीचे 18 आणि मुलाचे 21 वर्षांपूर्वी विवाह केल्यास तो कायद्याने गुन्हा ठरतो. गुन्हेगारास एक लाख रुपये दंड व दोन वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा होऊ शकते. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ग्रामसेवक व बाल विकास प्रकल्प अधिकारी यांची जबाबदारी ठरवण्यात आली आहे. ग्रामस्तरावर ग्राम बाल संरक्षण समिती स्थापन करण्यात आली असून सरपंच हे अध्यक्ष व अंगणवाडी सेविका सदस्य सचिव असल्याचे जिल्हा बाल संरक्षण अधिकारी श्रीमती सरस्वती कोरडे यांनी सांगितले. विद्यार्थ्यांना ‘गुड’ व ‘बॅड टच’बाबत दामिनी पथकाच्या श्रीमती आरती साळवे यांनी मार्गदर्शन केले. उमंग शिशुगृहाचे अधीक्षक राहुल शिरसाट यांनी चाईल्ड हेल्पलाईन 1098 आणि शिशुगृहाविषयी माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ते रामप्रसाद मुडे यांनी जिल्हा महिला व बाल विकास विभागाच्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना, दत्तक विधान व अनाथ प्रमाणपत्र योजनांची माहिती दिली. इन्स्टिट्यूट ऑफ सोशल अवेअरनेस अँड रिफॉर्म संस्थेच्या प्रकल्प समन्वयक अनिता भगत यांनी संस्थेच्या कार्याची माहिती दिली. विद्यार्थ्यांकडून बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञेची शपथ घेतली गेली. कार्यक्रमास बाल कल्याण समितीचे सदस्य, सामाजिक कार्यकर्ते, आयएसएआर संस्थेचे पदाधिकारी, शाळेचे शिक्षक, कर्मचारी, गावातील सरपंच, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

No comments: