22 August, 2025
कृषी अधिकाऱ्यांना केळी पिकाबाबत प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि. 22 : कृषी विभाग हिंगोली अंतर्गत सर्व मंडळ कृषी अधिकारी तसेच सहाय्यक कृषी अधिकारी यांचे केळी पिकावरील एकात्मिक कीड व रोग सर्वेक्षण (हॉर्ट सॅप) या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रम आज तोंडापूर येथील कृषि विज्ञान केंद्रामध्ये यशस्वीपणे संपन्न झाला.
या कार्यक्रमास कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, पशुविज्ञान विभागाचे डॉ. कैलास गीते, वाशिम कृषी विज्ञान केंद्राचे डॉ. डी. एन. इंगोले उपस्थित होते.
प्रशिक्षणात कृषी विज्ञान केंद्राचे पीक संरक्षण विषयाचे तज्ञ प्रा. अजयकुमार सुगावे यांनी केळी पिकातील प्रमुख कीड व रोग तसेच त्यावरील एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन केले.
कृषी विज्ञान केंद्राचे वरिष्ठ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी आपल्या मार्गदर्शनात कृषी विज्ञान केंद्रात उपलब्ध असलेल्या विविध निविष्ठांची माहिती दिली. तसेच कृषी विभाग आणि कृषि विज्ञान केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने शेतकऱ्यांच्या विकासासाठी एकत्रित काम झाल्यास अधिक चांगला परिणाम साधता येईल, असे सांगितले. तसेच बैलपोळ्याच्या सणानिमित्त हिंगोलीतील सर्व शेतकरी व कृषी विभागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शुभेच्छा दिल्या.
या प्रशिक्षणाला हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व वसमत मंडळातील कृषी अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. कैलास गीते यांनी आभार प्रदर्शन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी राहुल जाधव व आकाश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment