13 August, 2025

हिंगोली हा दूध निर्यात करणारा जिल्हा होणे आवश्यक – जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

हिंगोली, दि. 13 (जिमाका): जिल्ह्यात दररोज 30 हजार लिटरपेक्षा जास्त दूध बाहेरून येत असल्याने आता शेतकऱ्यांनी सामूहिक प्रयत्न करून हिंगोली हा दुधात स्वयंपूर्ण व निर्यात करणारा जिल्हा व्हावा, असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी केले. यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त सखाराम खुणे, तहसीलदार शारदा दळवी, शासकीय डेअरी मिल्क अधिकारी शिवाजी गिनगिने, जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक सुजीत झोडगे, बँक ऑफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक शालिकराम जाधव, तसेच हेरिटेज फूड्स लिमिटेडचे वरिष्ठ अधिकारी व विविध मान्यवर उपस्थित होते. वसमत तालुक्यातील पांगरा शिंदे येथील रोकडेश्वर मंगल कार्यालयात हेरिटेज दूध उत्पादक शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी गुप्ता म्हणाले की, जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी जनावरे पाळून दुग्ध व्यवसायाकडे वळावे, शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन दूध उत्पादन वाढवावे. बँकांनीही शेतकऱ्यांना आवश्यक कर्जपुरवठा करावा आणि पशुसंवर्धन विभागाने आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अग्रणी बँकेचे जिल्हा व्यवस्थापक सुजीत झोडगे यांनी शेतकऱ्यांना दूध उत्पादनासाठी सर्व बँका मदत करण्यास तयार असल्याचे सांगितले. जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त शिवाजीराव खुणे यांनी सकस व संतुलित आहार, हिरवा व वाळलेला चारा देऊन जनावरांचे दूध उत्पादन वाढवण्याचे मार्गदर्शन केले. वसमत तहसीलदार शारदा दळवी यांनी वित्तपुरवठा करताना सिबिल रेकॉर्डसोबतच शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष क्षमतेलाही प्राधान्य देण्याचे आवाहन बँकांना केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विलास शिंदे यांनी केले तर आभार प्रदर्शन रमेश चेंडके यांनी मानले. मेळावा यशस्वी करण्यासाठी ज्ञानेश्वर वानखेडे व साईनाथ शिंदे यांनी विशेष प्रयत्न केले. *****

No comments: