12 August, 2025
मंजूर नियतव्ययाच्या अधीन राहून चालू वर्षाचे परिपूर्ण प्रस्ताव तात्काळ सादर करावेत - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता
• आकांक्षीत तालुकाअंतर्गत सर्व कामाची माहिती पोर्टलवर अपडेट करावी
• शासकीय कामाशी निगडीत सर्व मोजणी तात्काळ पूर्ण करावी
• कालबाह्य सामग्रीचे तात्काळ निर्लेखन करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत मंजूर नियतव्ययाच्या अधीन राहून विविध विकास योजनांचे निधी मागणीचे परिपूर्ण प्रस्ताव जीओ टॅगसह तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी आढावा बैठकीत दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी गं. गो. चितळे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचे रमेश भडके यांच्यासह सर्व विभागप्रमुख यावेळी उपस्थित होते.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2025-26 अंतर्गत विविध विकास योजनांचे परिपूर्ण प्रस्ताव वेळेत करणार नाहीत त्यांच्यावर कारवाई करावी. ज्या यंत्रणेचे दायित्वाचे प्रस्ताव आय-पास प्रणालीवर अपलोड करुन लवकर प्राप्त होतील, त्या यंत्रणांना प्राधान्यक्रमानुसार निधी वितरीत करण्यात येईल. इमारती व रस्त्याला युनिक आयडी देण्यात येणार आहे. त्यासाठी सर्व यंत्रणांनी विविध विकास कामाचे जिओ टॅगसह प्रस्ताव सादर करावेत. आरोग्य विभागांनी ई-औषधी पोर्टलवर स्टॉक अपलोड केल्याशिवाय निधी वितरीत करण्यात येणार नाही, असे निर्देश जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी दिले.
यावेळी महावितरण, पोलीस, जिल्हा परिषद, पशुसंवर्धन विभाग, कृषि विभाग, जिल्हा आरोग्य विभाग, महिला व बालकल्याण, महिला व बालविकास विभाग, वन विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, सार्वजनिक बांधकाम विभाग यासह विविध विभागांच्या प्रस्तावाबाबत चर्चा करण्यात आली. बैठकीत प्रशासनाच्या विविध विभागांना त्यांच्या जबाबदाऱ्या वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.
आकांक्षीत तालुकाअंतर्गत सर्व कामाची माहिती पोर्टलवर अपडेट करावी
निती आयोगाच्या निर्देशांकानुसार आकांक्षीत तालुका हिंगोलीसाठी तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार सर्व यंत्रणांनी वेळेत कामे पूर्ण करावेत. केलेल्या कामाची माहिती पोर्टलवर वेळोवेळी अपडेट करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी यावेळी दिले.
शासकीय कामाशी निगडीत सर्व मोजणी तात्काळ पूर्ण करावी
भूमिअभिलेख विभागाने शासकीय कामाशी निगडीत सर्व मोजणी तात्काळ पूर्ण करुन प्रलंबित प्रकरणे निकाली काढावेत. त्याचा तारीखनिहाय अहवाल सादर करावा. मोजणीनंतर हद्द निश्चितीची कार्यवाही करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी भूमि अभिलेख विभागाच्या आढावा बैठकीत जिल्हा अधीक्षक व तालुका अधीक्षकांना दिल्या.
कालबाह्य सामग्रीचे तात्काळ निर्लेखन करावेत
प्रशासकीय इमारतीतील सर्व विभाग प्रमुखांनी कालबाह्य झालेली सामग्री, वस्तू, यंत्राचे तात्काळ निर्लेखन करुन जिल्हाधिकारी कार्यालयास अवगत करावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी सर्व विभागप्रमुखाच्या बैठकीत दिले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment