29 August, 2025
सोयाबीनवर पिवळा मोझॅक; * वेळीच व्यवस्थापन करण्याचा तज्ञांचा सल्ला
हिंगोली(जिमाका), दि. 29 : वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाअंतर्गत कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांच्या संयुक्त विद्यमाने दर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एका तालुक्यातील विविध शेतकऱ्यांच्या शेतावर जिल्हा मासिक चर्चासत्रांतर्गत प्रक्षेत्र भेटीचे आयोजन करण्यात येते. त्यानुसार या महिन्यात सेनगाव तालुक्यात विद्यापीठ शास्त्रज्ञ व कृषी अधिकाऱ्यांच्या चमूने पुसेगाव, रिधोरा व सेनगाव शिवारातील सोयाबीन कापूस, तूर, हळद, केळी अशा विविध प्रक्षेत्रावर भेटीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी शास्त्रज्ञांच्या व अधिकाऱ्यांच्या चमूने पुसेगाव येथील सोयाबीन प्रक्षेत्रावर भेट दिली असता त्या ठिकाणी पिवळा मोझॅक म्हणजेच केवडा या विषाणूजन्य रोगाने प्रादुर्भावग्रस्त सोयाबीनची झाडे दिसून आली.
यावेळी उपस्थित शेतकऱ्यांना संबंधित प्रादुर्भावग्रस्त झाडे निदर्शनास आणून हा रोग विषाणूजन्य आहे आणि तो पांढरी माशी या रस शोषण करणाऱ्या किडींमार्फत पसरतो. या रोगाला वेळीच ओळखून उपाययोजना नाही केल्यास हा रोग मोठ्या प्रमाणात पसरून पूर्ण शेत प्रादुर्भावग्रस्त करतो व त्यामुळे झाडांना फुले, शेंगा कमी लागतात आणि पर्यायाने उत्पन्नात मोठी घट येण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्व शेतकऱ्यांनी या रोगाचे वेळेत नियोजन करणे गरजेचे आहे, असे शास्त्रज्ञांनी सांगितले.
व्यवस्थापनासाठी पिवळा मोझॅक(केवडा) झालेली पाने, झाडे दिसून येताच ती वेळोवेळी तात्काळ समूळ काढून बांधावर न फेकता जाळून अथवा जमिनीत पुरून टाकावीत. जेणेकरून निरोगी झाडांवर होणारा किडीचा व रोगांचा प्रसार कमी करणे शक्य होईल. रोगाच्या प्रसारास कारणीभूत असलेल्या पांढरी माशीच्या व्यवस्थापनासाठी पिकावर रोगाची लक्षणे दिसताच किंवा प्रतिबंधात्मक उपाय म्हणून फ्लोनिकॅमीड 50 टक्के डब्ल्यूजी 80 ग्रॅम (4 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा थायमिथोक्झाम 12.6 टक्के + लॅम्बडा सिहॅलोथ्रीन 9.6 टक्के झेडसी 50 मिली (2.5 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा असिटामिप्रीड 25 टक्के + बाइफेन्थ्रीन 25 टक्के डब्ल्यूजी 100 ग्रॅम (5 ग्रॅम प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) किंवा बीटा साइफ्लुथ्रीन 8.49 टक्के + इमिडाक्लोप्रीड 19.81 टक्के ओडी 140 मिली (7 मिली प्रती 10 लिटर पाण्यात साध्या पंपाने) यापैकी एका किटकनाशकाची फवारणी प्रती एकर या प्रमाणात करावी. पांढऱ्या माशीचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी पिकामध्ये प्रती एकरी 10 पिवळे चिकट सापळे लावावेत. तसेच फवारणीसाठी कीटकनाशकाची व पाण्याची शिफारस केलेली मात्राच वापरावी, असे आवाहन तज्ञांमार्फत करण्यात आले.
या चमूमध्ये विद्यापीठातर्फे विस्तार कृषि विद्यावेता डॉ. गजानन गडदे, कीटकशास्त्रज्ञ डॉ. दिगंबर पटाईत हे तर कृषी विभागातर्फे उपसंचालक (कृषी) प्रसाद हजारे, उपविभागीय कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे, तालुका कृषी अधिकारी नित्यानंद काळे आणि शिवप्रसाद संगेकर हे सहभागी झाले होते.
***
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment