28 August, 2025

गणेशोत्सव काळात अन्न सुरक्षा नियमांचे पालन करावे – अन्न व औषध प्रशासनाचे आवाहन

हिंगोली, दि. २८ (जिमाका): गणेशोत्सव तसेच दिवाळीपर्यंत होणाऱ्या विविध सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर अन्न व औषध प्रशासनाने नागरिक व गणेश मंडळांना अन्नसुरक्षेची विशेष काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. गणेश मंडळांनी प्रसाद तयार करताना स्वच्छतेचे नियम पाळावेत, प्रसाद झाकून ठेवावा, शिळे अन्न वाटू नये, प्रसाद बनविणाऱ्या व्यक्तींनी हातमोजे, मास्क, अॅप्रन वापरावा तसेच संसर्गजन्य आजार असलेल्या व्यक्तींनी प्रसाद हाताळू नये, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रसाद वाटपासाठी मंडळांनी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ अंतर्गत https://foscos.fssai.gov.in या संकेतस्थळावर नोंदणी करणे आवश्यक आहे. नागरिकांनी मिठाई व अन्नपदार्थ खरेदी करताना ताजेपणा, परवाना/नोंदणीधारक दुकाने, बॅच नंबर, बेस्ट बिफोर व एक्सपायरी दिनांक तपासावेत. उघड्यावरचे अन्न व भडक खाद्यरंग असलेली मिठाई खरेदी टाळावी, तर खवा-माव्याची मिठाई २४ तासांच्या आतच सेवन करावी. नागरिकांना कोणतीही शंका असल्यास अन्न व औषध प्रशासन, परभणी कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन सहायक आयुक्त (अन्न) श्री. अ.ए. चौधरी यांनी केले आहे.

No comments: