14 August, 2025
डाक विभागातर्फे दीन दयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षेचे आयोजन
हिंगोली(जिमाका),दि.14 : परभणी डाक विभागातर्फे दीन दयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना स्पर्धा परीक्षा 2025-26 चे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये भाग घेण्याची अंतिम गुरुवार, दिनांक 18 सप्टेंबर, 2025 आहे. परभणी डाक विभागांतर्गत येणाऱ्या परभणी, हिंगोली आणि जालना जिल्ह्यांतील जास्तीत जास्त शाळांनी यामध्ये सहभाग नोंदवावा, असे आवाहन डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे.
ही स्पर्धा फक्त इयत्ता 6 वी ते 9 वीच्या विद्यार्थ्यासाठी असून स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांचे पोस्टात फिलाटेली डिपॉझिट अकाउंट असणे आवश्यक आहे. हे खाते फक्त 200 रुपयात उघडता येईल. जर यापूर्वीच फिलाटेली डिपॉझिट अकाऊंट उघडलेले असल्यास नवीन खाते उघडण्याची आवश्यकता नाही. ही स्पर्धा 2 टप्प्यांची असेल. पहिल्या टप्प्यामध्ये सप्टेंबर महिन्याच्या शेवटी डाक विभागातर्फे 50 गुणांची लेखी परीक्षा घेण्यात येईल आणि या परीक्षेचे मूल्यमापन राज्यस्तरावर केले जाईल. त्याआधारे इयत्ता 6 वी ते 9 वीच्या प्रत्येक इयत्तेच्या राज्यस्तरावरील गुणवत्ता यादीनुसार निवडलेल्या विद्यार्थ्यांना फिलाटेली प्रोजेक्ट तयार करण्यासाठी कळविण्यात येईल. या फिलाटेली प्रोजेक्टच्या आधारे राज्यस्तरावर विद्यार्थ्यांची अंतिम निवड होईल. अंतिम निवड झालेल्या विद्यार्थ्यांना 6 हजार रुपयाची शिष्यवृत्ती, प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येईल.
गेल्या 2 वर्षांमध्ये परभणी डाक विभागामध्ये एकूण 11 विद्यार्थ्यांनी ही शिष्यवृत्ती पटकावलेली असून यावर्षीही दीन दयाळ स्पर्श फिलाटेली शिष्यवृत्ती योजना 2025-26 स्पर्धा परीक्षेमध्ये सर्व शाळांनी सहभाग नोंदवून आपल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना भारतीय डाक विभागाची शिष्यवृत्ती पटकवण्याची संधी द्यावी, असे आवाहन परभणी विभागाचे डाक अधीक्षक सतीश पाठक यांनी केले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी सहाय्यक डाक अधीक्षक (मुख्यालय) पवन मोरे, व कार्यालयीन सहाय्यक श्रीपाद कुंभारकर यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन डाक विभाग परभणी तर्फे करण्यात आले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment